top of page

 

इंजिनीअरिंग ते फिल्ममेकिंग; एक रोमांचक प्रवास

 

मुलाखत : आशय जावडेकर 

शब्दांकन: अमृता हर्डीकर 

अगदी चिमुरड्या, लहान मुलांना विचारलं, “मोठेपणी तूला कोण व्हायचंय?” तर पटकन उत्तर मिळतं,“बस ड्रॉयव्हर”,“ विदूषक”, “ऍस्ट्रोनॉट”, “डान्सर”, “टीचर”, “गायक”, “पायलट”. ह्या महत्त्वाकांक्षा नसतात, निरागस इच्छा असतात फक्त.  त्या व्यवसायाबद्दलचं आकर्षण, त्या भवतीचं वलय, त्या भूमिका पार पाडत असताना येणारी मजा त्या चिमुरड्यांना भावलेली असते. पण दहावी बारावीमध्ये जेव्हा करिअर निवडायची वेळ येते तेव्हा व्यवहारिक जगाची समज आलेली असते, आणि आर्थिक स्थैर्य, सामाजिक पत, किंवा आई वडिलांनी आखून दिलेल्या चाकोरीबध्द मुद्द्यांचा विचार करून करिअरचा निर्णय घेतला जातो.

 

शाळा- कॉलेजात अभयास सांभाळत, करिअर आणि भविष्याचा विचार करत आपण अंगी असलेल्या अनेक कला कौशल्यांना तारेवरची कसरत करतच हळुवारपणे सांभाळलेलं असतं. त्या कला कौशल्यांभवती विणलेली स्वप्न आपण पुढेही अनेक वर्ष, अनेक दशकं सांभाळून ठेवतो, कधी जमेल तशी त्यांना आपल्या आयुष्यात “हौस” किंवा “हॉबीज” नावाच्या कप्प्यात जागा करून देतो. एलिमेंटरी, इंटरमीजिएटच्या परीक्षांमध्ये उत्तम यश मिळूनही पुढे जे जे स्कुल ऑफ आर्टस्ची स्वप्न सोडून दिलेली असतात, कुणी संगीत विशारद असूनही गाणं दृष्टीआड झालेलं असतं, खेळातली गती एकदा सुटली कि सुटतच गेलेली असते, व्यावसायिक नाट्य क्षेत्रात जम बसवता आला नाही म्हणून पोटापाण्याच्या व्यवहारात स्वतःला अडकवून घेतलेलं असतं.

 

अशी अनेक अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असतात किंवा कदाचित आपण स्वतःही ह्या यादीतलेच होऊन गेलेले असतो. संसार, व्यवहार, कुटुंब, आयुष्यातले इतर उतार चढाव घडत असताना आपल्या स्वप्नांशी जोडलेली नाळ आपल्याला अधून मधून खुणावत असते. आणि मग कधीतरी अनपेक्षितपणे कुणीतरी असं भेटतं ज्याला स्वतःच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये आणि सुप्तस्वप्नांमध्ये रेखीव पूल आखता आले आहेत, ज्याने स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत, स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी निर्धाराने वाट खणलेली आहे. आपल्या ह्या दिवाळी अंकासाठी “नव्याने रुजताना” ह्या विषयावर साहित्याचं आव्हान झालं आणि वाटलं अशा एखाद्या सुवर्णमध्य शोधलेल्या व्यक्तीबद्दल लिहावं.

 

२९ जून २०१९ मध्ये DNA नावाचा मराठी चित्रपट, अमेरिकेतल्या आठ शहरांमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा त्या सिनेमाने ‘अमेरिकेतला पहिला मराठी सिनेमा’ असा विक्रम केला. साहजिकच त्याचा लेखक दिग्दर्शक आशय जावडेकर बद्दल अमेरिकेतल्या मराठी आणि भारतीय लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. ह्या आधी २०१७ मध्ये आशयचा ‘Shanks’ नावाचा पहिला चित्रपट अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये प्रदर्शित झाला होता, तसंच इटलीच्या बर्गामो फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट सिनेमाचं नामांकन देखील मिळालं. पण मुख्य म्हणजे ‘Shanks’ मध्ये साधं, सात्विक, शाकाहारी, मराठमोळं जेवण ज्या नजाकतीने प्रस्तुत केलं गेलं, त्यामुळे जगभरातले अनेक खवैय्ये असं मराठमोळं जेवण कुठे मिळेल ह्या शोधात निघाले. ‘Shanks’ किंवा ‘DNA’, दोन्हीही सिनेमांमधले नायक, मराठी बोलत असले, महाराष्ट्रात जन्मलेले असले तरी त्यांची विश्व, त्यांच्या कथा, ह्या स्थलांतरित मराठी माणसाचे आयुष्य रंगवतात. ही पात्र बोलतात, वागतात ती अमेरिकेत राहणाऱ्या लोकांसारखी. (भारतात  दिवाळी नंतर अमेझॉनवर ‘DNA’ आणि ‘Shanks’ हे दोन्हीही चित्रपट पाहायला उपलब्ध होतील.)

अमेरिकेत स्वतःच्या हिमतीवर दोन व्यावसायिक चित्रपट करण्याचं धाडस करण्याआधी, आशयने अमेरिकेतल्या वास्तव्यात चार लघुपट केले आहेत.(गॅरेज सेल, विरंगुळा, केविन, द स्क्रिप्ट) हे लघुपट अनेक फेस्टिवल्समध्ये प्रदर्शित झाले, त्यांना दाद मिळाली, बक्षिसं मिळाली, ह्यामुळे आत्मविश्वास वाढून आशयच्या  सिनेमावेडाला स्फुरण मिळत गेलं असावं. पण गमतीची गोष्ट  अशी की, आशय पूर्णवेळ व्यावसायिक फिल्मवाला नाही. बारा वर्षाची त्याची ही फिल्मोग्राफी घडवत असतांना, आशय अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेर मध्ये केमिकल इंजिनियरिंगचे  पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत होता आणि त्यानंतर त्याच क्षेत्रातली नोकरी तो आजही करतो आहे.

 

मॅन्युफॅक्चरींग जॉब आणि चित्रपट लेखक-दिग्दर्शक-निर्माता-संपादक अशा सगळ्या बहुरूपी टोप्या डोक्यावर चढवून आशय मनस्वी बागडत असतो. हे असं दोन भिन्न विश्वात रमणं, कार्यरत असणं, दोन्ही क्षेत्रात काहीतरी घडवण्याची उर्मी बाळगून ते घडवून आणणं, सांसारिक स्नेह आणि जबाबदाऱ्या सांभाळून,  ही तारेवरची कसरत तो कशी काय पार पाडतो,  हा कुतूहलाचा विषय आहे!  हे जाणून घेण्यासाठी त्याच्याबरोबर मी आणि शिरीन म्हाडेश्वरने गप्पा मारल्या. (मुलाखत म्हणणं खूपच औपचारिक वाटेल) गप्पांच्या ओघात आशयने दिलेली उत्तरं, त्याची निरीक्षणं, त्याच्या आठवणी आणि अनुभवांचं संचित मी इथे ह्या लेखात मांडते आहे.

Copy of DNA 1200x628_3.jpg

DNA पोस्टर 

 

अर्थातच, आशयची सृजनप्रक्रिया कुठून उगम पावली आहे हे जाणून घ्यायची मला उत्सुकता होती म्हणून आम्ही त्याच्या बालपणाविषयी बोललो. त्याचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत पण घरी नाटक, सिनेमाविषयी भरपूर जिव्हाळा आहे. आशयने खूप लहानपणापासून त्याच्या बाबांना नाटकात काम करताना, नाटक दिग्दर्शित करताना पाहिलं आहे. नाटक बसवण्याची सगळी प्रक्रिया त्याला प्रचंड आवडली होती आणि मोठं होऊन आपल्याला असं काहीतरी करायला आवडेल असं त्याला तेव्हाच वाटून गेलं होतं.

 

त्याच्याच शब्दात सांगायचं तर तो म्हणाला, “मला लोकांसमोर परफॉर्म करायला आवडायचं. मी लहान असताना जादूचे प्रयोग करायचो. खूप एंजॉय करायचो.” आशयच्या अगदी लहानपणापासून थिएटरमध्ये जाऊन एकत्र चित्रपट बघण्याची घरात पद्धतच होती.

पण चित्रपट निव्वळ करमणूक म्हणून न बघता, चित्रपट तंत्रज्ञानाची, कथेविषयी, आई वडिलांबरोबर चर्चा घडत असे आणि त्यामुळे चित्रपटाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तेव्हापासून तयार होत गेला. आशयचे एक चुलत आजोबा (मामीचे वडील) प्रभात सिनेमामध्ये काम करायचे. आशयला प्रोजेक्शनिस्टच्या खोलीतून, चित्रपट कसा प्रदर्शित होतो, नक्की त्या खोलीत काय काय होतं, ज्यामुळे पडद्यावर चित्र झळकत राहतात हे पाहण्याची खूप उत्सुकता होती. आठ नऊ वर्षाचा असताना अख्खा “Jurassic Park” हा सिनेमा त्याने प्रोजेक्शन रूममधून प्रोजेक्शनिस्टच्या शेजारी बसून बघितला तेव्हा त्याची उत्सुकता साकार झाली! आणि कदाचित त्याच्या मनात एक वेगळा ध्यास वसवून गेली.

 

चित्रपट बघणं आणि त्या माध्यमाबद्दल आकर्षण असलं तरी आशयचं नाटकावर खरं प्रेम होतं. आशयने शाळेत असताना नाटकात काम केलंच पण सांगलीतून मुंबईला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आल्यावर त्याने नाटक करण्यासाठी संच जमवला, आल्फा टीव्ही मराठीच्या नाट्य स्पर्धेत भाग सुद्धा घेतला. पण त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असं नाटक वगैरे करण्याची प्रथा नव्हती किंवा ज्यांना हे करण्यात रस होता त्यांच्याकडे हे ‘असले उद्योग करायला वेळ कसा आहे!’ अशा संशयास्पद नजरेने बघत. मुंबईमध्ये प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटक करणाऱ्या इतक्या नावाजलेल्या नाट्य संस्था असूनही आशय त्या सगळ्यापासून लांबच होता.

घरात त्याची प्रतिभा जोपासणारं वातावरण असताना, नाटक सिनेमाबद्दल एवढं आकर्षण असून, त्याने कला शाखेचे सगळे विषय बाजूला ठेवून केमिकल  इंजिनिअरिंगकडे वळण्याचा निर्णय का घेतला? असा अगदी स्वाभाविक प्रश्न मला पडला होता. “पुणे मुंबई सारख्या शहरात जिथे हौशी रंगकर्मींसाठी भरपूर स्पर्धा आणि नाट्य संस्था कार्यरत आहेत, अशा शहरांमध्ये वाढलो असतो तर काय झालं असतं हे आता सांगता येणार नाही, पण  नाटक सिनेमाकडे मी कधीही करिअर म्हणून बघतच नव्हतो.” असं आशयचं अगदी ठाम उत्तर होतं. किंबहुना त्याचा गणिताचा पाया भक्कम आहे आणि केमिकल इंजिनिअरिंगच्या शिक्षणामुळेच तो चित्रपटासाठी लागणारं ऑप्टिमायझेशन किंवा व्हेरिएबल्सचा सखोल विचार करू शकतो आणि त्यांना सहज हाताळू शकतो, असा सकारात्मक विचारच समोर येतो.  

 

फिल्म स्कूल मध्ये न शिकल्याची खंत आशयच्या बोलण्यात जाणवत नाही कारण केमिकल इंजिनीअरिंगमधली पीएचडी करत असताना त्याने स्वतःची फिल्म शाळा भरवली होती, आणि त्या शाळेत तो कॅमेराची भाषा अवगत करत गेला. पीएचडीच्या अभ्यासाबरोबर दररोज एक, अशा हिशोबाने त्याने चार वर्षात जवळ जवळ दीड हजार सिनेमे बघितले.

जगभरातले वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट;  नावाजलेले, ऑस्करसाठी नामांकित झालेले, ऑस्कर  जिंकलेले, जुने/ नवीन, लोकमान्यता मिळालेले, किंवा फक्त समीक्षकांनी नावाजलेले, काळाच्या पुढचे किंवा पुरोगामी/ प्रोग्रेसिव्ह असे सगळे सिनेमा कॉलेजच्या लायब्ररीमधून आणून पहिले, अभ्यासले. काही वेळेला त्याच्या यादीमधल्या सिनेमाच्या शोधात डेलावेरपासून चार चार तास लांब छोट्या गावातल्या लायब्ररीमधून त्याची डीव्हीडी आणून आशयने तो सिनेमा पहिला आहे. स्वतःची स्वप्न, ध्येय ह्यांना फक्त मनात गोंजारत न बसता त्यांच्यासाठी पाऊलवाट शोधत राहणं म्हणजे काय ह्याचा छान प्रत्यय आशयच्या ह्या सिनेशाळेच्या उदाहरणातून मिळतो.

 

“Fortune favors the Brave” असं म्हणतात तसं निव्वळ योगायोगाने,  आशयच्या पीएचडीचं काम थोडं रेंगाळतय असं वाटतंय तेव्हाच, डेलावेअर युनिव्हर्सिटीला एक मोठं अनुदान मिळालं आणि त्यातून एका नवीन मल्टिमीडिया सेंटरची स्थापना झाली. आशयच्या शब्दात सांगायचं तर “ह्या मल्टिमीडिया सेंटरमध्ये इंडस्ट्री ग्रेड equipment होतं, आम्हाला सहजपणे ते वापरायला मिळालं आणि त्यावरच मला film editing शिकायला मिळालं.” आशयच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉईंट होता. केमिकल इंजिनीअरिंगमध्ये मेजर आणि फिल्म मेकिंगमध्ये मायनर करण्याची संधी त्याला अमेरिकन विद्यापीठात सहजासहजी साध्य करता आली. चित्रपट बघण्याच्या आणि अभ्यासण्याच्या प्रक्रियेला, तंत्रज्ञान शिकण्याची जोड मिळाली. त्याच काळात आशय त्याचे लघुपट बनवायला लागला.

 

'फिल्म करायला फिल्म बघायला पाहिजेत' किंवा थियरी शिकायची आणि लगेच प्रॅक्टिकल करून बघायचं, असं त्याने मांडलेलं साधं समीकरण आहे. पण लघुपट बनवायला लागणं पण योगायोगाने झालं. डेलावेर युनीव्हर्सीटीत आशयने वडिलांनी लिहिलेलं एक नाटक बसवायला घेतलं होतं. वेगवेगळ्या कलाकारांच्या तालमींच्या वेळा जुळवून आणण्यात जो स्वतःचा वेळ खर्च होतो, तो वेळ, कलाकृतीचे माध्यम बदलून सत्कारणी लावता येईल आणि शिवाय खूपच मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोचता येईल असं आशयच्या मनात आलं आणि तिथून लघुपटांचा प्रवास सुरु झाला.

23622461_10159407427520276_1110147353071

डेलावेअर युनिव्हर्सिटी मध्ये विद्यार्थी असताना 

 

ह्याच विषयावर बोलत असताना आशय म्हणाला, “डोळे उघडे ठेऊन कुठलही तंत्रज्ञान, कुठलीही टेकनॉलॉजि स्वीकारल्याने आत्मविश्वास वाढतोच.” पुढे स्पष्टीकरण देताना त्याने उदाहरण दिलं की आयफोन सारख्या छोट्याश्या कॅमेरावर आणि एडिटिंग सॉफ्टवेरवर सुद्धा चित्रपट बनवता येणं शक्य आहे. एका गूगल अकाउंटच्या जोरावर त्याच्या दोन्ही चित्रपटांच्या सबटायटलिंगसाठी त्याने गूगल ट्रान्सलेटचा वापर कसा केलाय, किंवा प्री प्रोडक्शनसाठी एक्सेल शीट्सचा किती किती वापर केला जाऊ शकतो अशा प्रकारची उदाहरणं देऊन तो त्याचं हे मत पटवून देत होता. “तंत्रज्ञान हाताशी असेल तर चित्रपट ही आर्थिक विवंचनेची बाब उरलेलीच नाही. गोष्टी सांगणं सहज सोपं आहे.” असंही तो म्हणाला.

 

पण फक्त तंत्रज्ञान हाताशी असणं, त्याचा वापर करता येऊ शकणं, एवढ्याच दोन गोष्टींच्या बळावर गोष्ट सांगता येत नाही, असं मला वाटतं. हे तंत्रज्ञान कित्येक लोकांना सहज उपलब्ध आहे आणि त्याचा वापर करून सहज सोप्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणारे पण असंख्य लोक जगभरात सातत्याने हा प्रयत्न करत असतात. पण त्यातल्या प्रत्येकालाच त्या प्रयत्नात यश मिळत नाही. कॅमेराच्या माध्यमातून गोष्ट सांगण्याचा स्वतःचा स्वतंत्र दृष्टिकोन असला पाहिजे, ते माध्यम केवळ शब्द आणि संवादाचं नाही त्यामुळे दृश्यांची भाषा बोलता आली पाहिजे, ती वाचता आली पाहिजे, संचातल्या इतरांना ती समजावून सांगता आली पाहिजे. ज्याच्याकडे हे कौशल्य आहे, तंत्रज्ञानाची जाण आहे, एखाद्या कलाकृतीची गरज समजून त्यासाठी योग्य लोक निवडणं, त्यांना जोडून ठेवणं, ही सगळी कौशल्य ज्याच्याकडे आहेत तोच एक सुसूत्र कलाकृती ह्या माध्यमातून घडवू शकतो.  आशयला, “गोष्टी सांगणं साधं आणि सोपं आहे.” असं वाटतं कारण त्याने त्यासाठी पुरेपूर परिश्रम घेतले आहेत.

लघुपट करत असतांनाच पुढे स्वतः चित्रपट बनवायचा निर्णय आशयच्या मनात होता. “First know your destination and then decide how to get there everyday.” असं एखाद्या मोटिवेशनल शिक्षकासारखं तो म्हणून गेला. मजेत असंही म्हणाला की, “मला 2034 साली काय करायचंय हे पण माहीत आहे!”

ऐकायला हे अवास्तव वाटत असलं तरी हे फक्त आशयच्या मनातले स्वप्नाळू बुडबुडे नाहीत. चित्रपटासारखी कलाकृती अमेरिकेत राहूनच घडवून आणायची तर त्यासाठी वेगवेगळ्या कौशल्याचे, वेगवेगळ्या क्षमतेचे, सहयोगी शोधावे लागणार आणि स्वतःच्या स्वप्नरंजनात त्यांना सहभागी करून घ्यावं लागणार ह्याची त्याला जाणीव आहे. सहयोगी शोधत असतांना, काय हवं आहे हे माहित नसेल किंवा शंका असेल तर नक्की काय नकोय ह्याची यादी करून, स्वतःसाठी एक स्पष्ट चौकट निर्माण करून घेणं गरजेचं आहे. सर्जसनशील, स्वतंत्र विचार करू शकणारी, विचारपूर्वक प्रतिप्रश्न करणारी, कल्पक लोकं निवडली तर स्वतःच्या कामाचा दर्जा आणि त्यातून मिळणारं समाधान वाढणार आहे, हा आशयचा दृष्टिकोन होता. 

 

आशयबरोबर कथा पटकथा लिहिणारा गौतम पंगू आणि छायाचित्रकार रवींद्रनाथन उन्नीकृष्णन हे दोघे त्याने निवडलेल्या अनेक सहयोग्याने पैकी दोन. गौतम हा सुद्धा केमिकल इंजिनीअर आहे. केमिकल इंजिनीअरिंगच्या पीएचडी थिसीस रायटिंग  टेक्निक मधून ह्या दोघांनी पटकथा लिहिण्याची त्यांची स्वतःची एक टेक्निक तयार केली आहे. त्यांच्या विचारप्रक्रियेत साम्य आहे आणि एकेकमेकांचा दृष्टिकोन त्यांना पटकन कळतो. एकमेकांपासून हजारो मैल लांब राहूनही ते एकत्र एका कथाबीजाचं विश्व फुलवू शकतात आणि सुसूत्र पटकथेत उतरवू शकतात. 

छायाचित्रकार उन्नीकृष्णनबरोबर काम करायला लागणं मात्र खूप सहजासहजी घडलं नाही. आशय आणि उन्नीला एकमेकांबरोबर काम करण्याचा विश्वास संपादन करायला पाच सहा वर्ष घालवावी लागली. DNA चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्याआधी सलग चार आठवडे, आशय दररोज, उन्नीकृष्णनशी तीन तीन तास फोनवर चित्रपटातल्या प्रत्येक दृश्य, प्रत्येक सीनबद्दल चर्चा करायचा, बोलायचा. त्यांच्या ह्या चर्चांमधून कामाबद्दलची वेव्हलेंग्थ तर जुळलीच पण माणूस म्हणूनही ते एकमेकांना उलगडत गेले. त्याचा परिणाम त्यांच्या कामात दिसून येतोच आणि त्याबद्दल आशय म्हणतो, "सेटवर, उन्नी अनेकदा मी न सांगता माझ्या मनातला शॉट लावून तयार असायचा. त्याच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीतून जी दृश्य त्याने सुचवली किंवा चित्रित केली ती सुद्धा माझ्या दृष्टिकोनाशी सुसंगत होतीच पण काहीवेळा माझ्या कल्पनेच्या पुढची होती." साधारणतः व्यावसायिक चित्रपट निर्मितीच्या सृजन प्रक्रियेत सहभागी लेखक, कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ हे एका शहरात, एका भौगोलिक अवकाशात एकत्र येऊन त्यांचं काम करतात. पण आशयने त्याचे सहयोगी निवडताना ह्या भौगोलिक सीमांचा कोणतंही बंधन आड येऊ दिलेलं नाही.

पुढे वाचा ..

bottom of page