top of page

 

मागील पानावरुन..

 

त्याच्या चित्रपटांसाठी अभिनेते निवडताना सुद्धा आशय त्यांच्याशी भरपूर गप्पा मारतो. त्यांच्या आवडी निवडी, त्यांची प्रेरणा स्थानं, त्यांचे छंद, त्यांना समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. कलाकाराची जडण घडण माहित असेल तर एखाद्या विशिष्ट पद्धतीने काम करून घेणं, त्याला समजावण्याचं काम सोपं होतं. आशयला जुने किंवा क्लासिक इंग्रजी सिनेमे खूप आवडतात हे त्याच्या बोलण्यातून जाणवतं. ‘ऑन द वॉटरफ्रन्ट’,‘अ स्ट्रीट कार नेम्ड डीझायर’ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक एलीया कझान कलाकारांना कसे हाताळावे ह्या बद्दल म्हणत, “Take an actor to dinner and talk to him about himself.” हा आलेख वरच्यावर आशयच्या बोलण्यात येऊन गेला आणि मला लक्षात आलं की त्याने फक्त प्रसिद्ध दिग्दर्शकांचे सिनेमे किंवा त्यांच्या पडद्यावरच्या कारामतींचा अभ्यास केलेला नाही, तर दिग्दर्शकांनी अवलंबलेल्या वेगवेगळ्या पद्धतींचा आणि संच हाताळणीचा सुद्धा अभ्यास केला आहे.

IMG_8732.JPG

DNA टीम बरोबर 

 

पण हे झालं  वेगवेगळ्या सहयोग्यांशी, कलाकारांशी, औपचारिक नातेबांधणीसाठी संवाद साधणं. अख्ख्या संचाला एका ध्येयासाठी प्रेरित करणं आणि एकत्र जोडून ठेवणं वेगळंच. खरंतर दिग्दर्शकाने संचातल्या सगळ्याच सदस्यांसाठी संवादपथ उघडे ठेवले पाहिजेत असंच आशयचं मत आहे. स्वतःच्या डोक्यातली गोष्ट, दृश्य, किंवा ती दृश्य कशी रंगवली गेली पाहिजेत ह्या बद्दलच्या अपेक्षा, दिग्दर्शकाला समर्थपणे कुणालाही नीट समजावता आल्या पाहिजेत. त्यासाठी मुळात स्वतः दिग्दर्शकाचे विचार आणि अपेक्षा स्पष्ट असल्या पाहिजेत. आपली गोष्ट किंवा आपलं स्वप्न हे संचातल्या अभिनेत्यांना, तांत्रिक गोष्टी सांभाळणाऱ्या किंवा प्रोडक्शन टीममधल्या सगळ्यांना नीट उलगडून सांगता आलं पाहिजे.

 

“Resistance is always the lack of clarity. Director should have very clear vision” असं आशयचं मत आहे. स्वतःच्या मनात किंवा डोळ्यापुढे महिनोंमहिने रुंजी घालणारी दृश्य टीममधल्या इतर साठ- सत्तर लोकांपर्यंत कशी पोचवणार? फक्त बोलण्यातून, मोठे मोठे आलेख देऊन ते शक्य होत नाही. आशय स्टोरीबोर्डचा वापर करून ते सगळ्यांपर्यंत पोचवतो. त्याचं म्हणणं आहे की उत्तम चित्रांचा स्टोरीबोर्डच असण्याची अजिबात गरज नाही. स्टिक फिगर आकृत्यांमधून सुद्धा स्वतःच्या अपेक्षा आणि कल्पना इतरांपर्यंत पोचवता येऊ शकतात. आणि अनेकवेळेला इतरांना त्या समजावताना, त्या बद्दलच्या प्रशनांची उत्तरं देतांना, स्वतःचा विचार आणखी ठाम होत जातो, नाहीतर त्यातल्या त्रुटी कळून त्या दुरुस्त करण्याची संधी मिळते.

 

टीम बांधणी बद्दलच्या आशयच्या सगळ्या बोलण्यातून मला असं संचित मिळालं की, आयडीयल टीम वगैरे काहीही मिळत नसतं. आपण एकत्र आणलेल्या लोकांना एक ध्येय, त्या ध्येयपुरतीमधली त्यांची जबाबदारी आणि मोलाचा वाटा समजावून दिला की सुसूत्रतेकडे आपोआपच प्रवास व्हायला लागतो.

 

आशयच्या सहयोग्यांबद्दल बोलायला लागल्यापासून माझ्या मनात सतत एक प्रश्न डोकावत होता. मी खूप कुतूहलाने विचारलं की चित्रपट निर्मिती हे त्याचं आणि मधुरा (त्याच्या बायकोचं) दोघांचं स्वप्न आहे का? तर तो हसला. म्हणाला, “नाही, तिला माझी सिनेमाबद्दलची पॅशन कळते, मी चित्रपटांसाठी जगतो, हे तिने स्वीकारलंय. आणि ती मला समजून घेते. चित्रपट निर्मिती हे तिचं स्वप्न नाही पण ती ह्या सगळ्या प्रोसेसचा भाग आहे.”

आशयच्या आईवडिलांनी त्याचं हे झपाटलेपण, त्याचा हा “कंट्रोलड मॅडनेस” स्वीकारला आहे आणि अंगवळणी पाडून घेतला आहे. पण आशयला स्वतःच्या मुलीला पुरेसा वेळ देता येत नाही ह्याची खंत वाटते. सध्या ती बहुतांश जबाबदारी मधुराची आहे. ज्याची सुखाची कल्पना म्हणजे मोठ्या पडद्यावर व्यत्ययहीन जुने क्लासिक सिनेमा बघणे आहे, जो गाडीतल्या दररोजच्या प्रवासातल्या ‘मोकळ्या’ वेळात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं वाद्यसंगीत ऐकत, मनात दृश्यनिर्मिती घडवत असतो, ज्याची थेरपीची  कल्पना सुद्धा चित्रपट बघणे, त्यांचा विचार करणे आहे, अशा चित्रपटवेड्या माणसाचे सांसारिक स्नेह सांभाळणारी सगळीच मंडळी त्याच्यावर मनोमन प्रेम करत असणार असं वाटतं. आणि आशयच्या आयुष्यात, अशी मंडळी आहेत ही त्याच्यासाठी खूप मोठी जमेची बाजू आहे.

763C0CD6-7125-4865-A73B-05E168D29522.JPG

१. पत्नी मधुरा आणि मुलगी अंजोर बरोबर  

२. अंजोरला घेऊन SHANKSचं एडिटिंग करताना 

 

हे सगळं ऐकून आशयच्या ध्येयपूर्तीच्या मार्गावर सगळं गोड गोड, छान, सकारत्मक घडत राहिलं आहे असंच वाटतं. पण गोष्टींच्या जगतातपण असं घडत नाही तर खऱ्या आयुष्यात कसं घडेल? चार वर्ष पीएचडीच्या अभ्यासात घालवल्यावर आशयच्या प्रोफेसरने, “फक्त मास्टर्स डिग्री घेऊन बाहेर पड, तुला काही पीएचडी मिळेल असं मला वाटत नाही.” असा धक्कादायक बॉम्ब त्याच्यावर टाकला होता. पाचवं वर्ष पूर्ण  होऊन ग्रॅज्युएट व्हायला फक्त काही महिने उरलेले आणि आर्थिक गोष्टी कशा निभावून न्यायच्या हा प्रश्न निर्माण झालेला. पीएचडीकडे पाठ फिरवून, आशयने त्यावेळेला न्यू यॉर्क फिल्म स्कूलमध्ये ऍडमिशन घेण्याचा विचार केला होता. पण त्याने तीन चार महिन्यात काही व्हिडीओ आणि फिल्म एडिटिंगची कामं केली त्यातून डॉलर्स कमावले आणि पीएचडी स्वतःच्या पदरात पाडून घेतली.

 

तीन वर्षं गौतम आणि आशय ‘शिदोरी’ नावाच्या एका कथा, पटकथेवर काम करत होते. खूप प्रयत्न करूनही चित्रपट निर्मितीबद्दल त्यांच्या कानात नकार घंटाच वाजत होत्या. त्या गोष्टीचा नाद सोडूनच द्यायच्या तयारीत असताना आशयने मनावर घेतलं की आपले कष्ट वाया घालवायचे नाहीत. तीच कथा वेगळ्या रूपात सजवून ‘Shanks ‘ हा चित्रपट जन्माला आला आणि  ‘Not Just Entertainment’  ह्या स्वतःच्या प्रोडक्शन कंपनीची निर्मिती आशयने केली. स्वतःच्या कामावरचा विश्वास आणि चिकाटीमुळे, सतत नकार ऐकूनही निराश न होता त्यातूनच आशयने काहीतरी नवीन निर्माण केलं.

 

आशयला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा  आहे आणि त्याच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. आशयने अमेरिकेत केलेले दोन्ही चित्रपट अनेक फेस्टिवल्समध्ये बक्षिसपात्र ठरले असले तरी ते लोकप्रिय नाहीत. भारतीय प्रेक्षकांच्या व्यावसायिक चित्रपटांकडून असणाऱ्या अपेक्षा ह्या चित्रपटातून पूर्ण होतीलच ह्याची खात्री नाही आणि मुख्यतः हे दोन्ही सिनेमे मराठीत घडत असल्यामुळे सगळ्याच भारतीय किंवा अभारतीय लोकांना ते सहज उपलब्ध नाहीत. (ऍमेझॉन वर प्रदर्शित होत असले तरी उपलब्धता हा मी वैयक्तिक रुचीच्या अनुषंगाने वापरलेला शब्द आहे.) केमिकल इंजिनीअर ते फिल्ममेकर असा प्रवास घडवून आणला असला तरी ह्या दोन्ही भूमिकांचा खरा विस्तार होण्याकरता, स्वतःच्या नवीन स्वप्नांचा पाठपुरावा करत आशयला दोन्ही पैकी एक भूमिका निवडायला लागेल. नाहीतर एका मर्यादित अवाक्यातच त्याला काम करत राहिला लागेल. स्वतःच्या कलाकृतींचा आवाका वाढवायला आशयला व्यावसायिक अभिनेते, तंत्रज्ञ, निर्माते ह्यांच्याबरोबर काम करायला लागेल. काहीवेळेला स्वतःच्या कलाकृतीवरचे नियंत्रण सैल करून, त्याला व्यावसायिक गणितात बसवावे लागेल.

 

हे स्वप्नांचा पाठपुरावा करणं पण खूप आवाहनात्मक आहे. नवीन काही साध्य झाल्यावर, अंतिम ध्येयपण बदलत राहतात आणि त्या अनुषंगाने नवीन बदल करत राहावे लागतात. आव्हानांना झेलून, स्वतःच्या मनात नवीन स्वप्न रुजवत, स्वतःमध्ये नवीन बदल घडवून आणायला लागतात. जणू ह्या सगळ्या प्रक्रियेचा विचार करूनच, आशयने त्याच्या विचारांचं, गुणांचं संक्षिप्त रूप त्याच्या फिल्म कंपनीच्या लोगोमध्ये समाविष्ट करून टाकलं आहे. सातत्य/ persistence, नावीन्य/novelty आणि रचना/structure. ह्या तीन गुणांच्या साथीने त्याला जो लांबचा पल्ला गाठायचा आहे तो प्रवास सुखकर तर घडेलच पण अनेक यशोचिन्ह गोळा करत, ‘नव्याने रुजत’ तो पुढे चालत राहील... ह्या त्याच्या पुढच्या प्रवासाला अनेक अनेक शुभेच्छा.

 

त्याचा हा प्रवास वाचून, वाचकांना त्यांच्या मनातल्या सुप्त स्वप्नांना पुन्हा जागं करून काही नवीन करावसं वाटलं तर माझ्या ह्या लेखाचं सार्थक झालं ह्याचं मला समाधान मिळेल.

शब्दांकन: अमृता हर्डीकर 

IMG_20191011_090721.jpg

वाचनाची आणि लिहिण्याची मला मनापासून आवड आहे. आंतरिक संक्रमण, पालकत्व, व्यक्तिचित्र, देशांतराचे  अनुभव, अशा काही विषयांवर मला लिहायला आवडतं. नियमित किंवा शिस्तबद्ध लिहणं मला जमत नाही. माम्बोवर नियमित वेगवेगळ्या विषयावर लिहीणाऱ्या लेखकांमुळे, गजर वाजल्यासारखी सतत मनात ही जाणीव जिवंत राहते, प्रेरणा मिळते. यंदाच्या दिवाळीत, सुख समृद्धी बरोबरच आपल्या मानसीक, सामाजिक, आणि वैचारिक कक्षा  समृद्ध करणारं लेखन आपल्या सगळ्यांना वाचायला, उपभोगायला मिळो, ह्याच माझ्या शुभेच्छा आणि सदिच्छा!

bottom of page