top of page

 

सं पा द की य 

बदल हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे. अगदी लक्षावधी वर्षांपासून माणसं बदलांना सामोरी जात आली आहेत. बदल कोणताही असला तरी त्यानंतर येणारा संक्रमणाचा सुरुवातीचा काळ सहसा आव्हानात्मक असतो. तरीही दररोज, लोक आपलं खात्रीचं, हक्काचं ठिकाण सोडून अनोळखी प्रांतात जात राहतात. नव्या नात्यांमध्ये गुंतत राहतात. नव्याने स्वतःला शोधत राहतात. नव्याने रुजतच राहतात. रुजणं हा स्थायीभाव असल्यासारखं. आपल्यापैकी प्रत्येकानं हा नव्यानं रुजण्याचा प्रवास कधीतरी केलेला आहे. मामबोच्या यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी आम्ही याच संकल्पेनवर आधारीत साहित्याचं आवाहन केलं आणि त्याला उदंड प्रतिसादही लाभला. ‘नव्यानं रुजताना’ संकल्पनेवर आधारीत ‘मामबो’चा हा दिवाळी अंक आपल्यासमोर सादर करताना मला आत्यंतिक आनंद होत आहे. 

 

अंकामध्ये कथा, कविता, मुलाखत, व्यक्तिचित्र अशा विविध साहित्यकृती आहेतच; पण बहुतांशी साहित्य हे व्यक्तिगत अनुभवांवर आधारीत ललित लेख आहेत. या सर्व लेखांमध्ये कमालीचा सच्चेपणाही आहे. वेगवेगळी आयुष्यं जगत असतानाही कितीतरी प्रवासांमध्ये खूप साधर्म्य आहे. आणि कुठेतरी एकसारखे असलेले हे अनेकांचे प्रवास स्वतःमध्ये एक वेगळेपण सुद्धा जपताहेत. अर्थात अंकामध्ये ही संकल्पना सोडून इतर विषयांवरील दर्जेदार लेखनही आहेच. 

 

बऱ्याच जणांनी या लेखांच्या माध्यमातून स्वतःला अतिशय जवळचे असलेले अनुभव, हृद्य आठवणी मांडल्या. स्वतःचा कितीतरी वर्षांचा प्रवास, मनात जपून ठेवलेलं मोकळेपणानं मांडलं. सुप्तावस्थेत गेलेले काही हात थोड्या पाठपुराव्यानं लिहिते झाले. काहींनी वेगळ्या वाटा चोखाळून पाहिल्या. माझ्यासाठी अंक सर्वांसमोर मांडण्याही आधीच यामध्ये अंकाचं काही अंशी यश आहे. 

अंक तडीस नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावलाय, त्या प्रत्येकाचे आभार मानणं खरंतर अशक्यप्राय आहे. 

 

सायली भागली-दामले हिनं (मामबो परिवाराची सभासद नसूनही) अंकातील साहित्यासाठी सर्वसमावेशक असं मुखपृष्ठ तयार करून दिलं आहे. यात दिवाळीच्या पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या तर आहेतच; पण त्याचबरोबर अंकामधल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि विषयही डोकावताहेत. अंकातील सर्व लेखांचं प्रतिनिधित्व करणं जमलं नसलं तरी या चित्रामध्ये आईच्या कडेवर बसलेली भावना जोशीची ‘आभा’, सिनिअर हाउसिंगमधला उमेशचा ‘राव’, मोहनाच्या ‘बाबाच्या’ हातांतली प्राजक्ता(अजित)ची ‘आसावरी’, मधू शिरगावकरची ‘मनी’, वेलींना लगडलेली ‘जांभळं’, निमिषच्या लेखातली युवराजची बॅट, गौतमचा पासपोर्ट, प्रियाची भरलेली बॅग, अनिलच्या ‘साराचा मेनोरा’, अरुण देशपांडेंचं पेन, राजश्रीचं मॅरॅथॉन मेडल, प्राजक्ताची झाडं-मुळं, विवेकदादांच्या सप्तपदीतलं पाऊल हे सारं इतस्ततः विखुरलेलं दिसेल. इतक्या देखण्या कलाकृतीसाठी सायलीचे आणि चि. मैत्राचे (तिच्या आईला हे चित्र पूर्ण करायला दिल्याबद्दल) मनःपूर्वक आभार!

 

उमेश वानखडे, मोहना जोगळेकर, प्रियदर्शन मनोहर, मधुराणी सप्रे, अमृता हर्डीकर यांनी दिवाळी अंक समितीमध्ये माझ्यासोबत गेले काही महिने सातत्याने काम केलं. विशेष म्हणजे कधीही कुणी ‘हा एक व्यावसायिक अंक नाही, मग एवढं काम का करायचं’ अशा विवंचना मांडल्या नाहीत. कार्यकालीन आणि सांसारिक जबाबदाऱ्या असतानाही प्रत्येकानं आपापली भूमिका अगदी चोख बजावली. मामबोचे संस्थापक या नात्यानं प्रियदर्शन मनोहर यांनी हा अंक माझ्या नेतृत्वाखाली मला हवा तसा बनवण्याची मुभा दिली. मधुराणीनं ‘आसावरी’ कथेसाठी तिच्या गोड मुलीचे (रावी) कथेच्या विषयाला साजेसे आणि काळजाचा ठोका चुकेल असे सुंदर फोटो काढून दिले (म्हणजे चक्क तिला छान पारंपरिक वेषात तयार करून, हातात परडी घेऊन फुलं वेचायला लावली!!). मोहनाची शिस्त, काटेकोरपणा आणि अमृताची कल्पकता यामधून बरंच काही शिकायला मिळालं. उमेशचा खास उल्लेख करणं इथे अपरिहार्य आहे. तुम्हाला जे करायचंय तेच विशेष स्पष्टीकरण न देता तिलाही दिसतंय, अशा व्यक्तीसोबत काम करायला मिळणं खूप सुदैवाचं असतं. उमेश हा यातीलच एक म्हणता येईल. निव्वळ ‘त्याचं योगदान महत्त्वाचं होतं’ असं म्हणून आभार मानले तर त्यानं अंकासाठी जे काही केलंय त्यापासून त्याला दूर केल्यासारखं होईल. असा मित्र आणि सहकारी प्रत्येकाला आपापल्या कार्यस्थळी लाभो. 

 

शैलेश देशपांडे हा एक जातिवंत चित्रकार, ज्यानं वेळेचा अभाव असतानाही काही मोजक्या साहित्याचे विषय समजावून घेऊन, त्यात स्वतःला उमजलेलं कसोशीनं पेरून, स्वतःच्या चित्रांनी त्या कथा आणि लेख एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. (*ज्या चित्रांना वेगळं क्रेडिट दिलेलं नाही, ती सर्व इंटरनेटवरून घेतलेली कॉपीराईट फ्री चित्रं आहेत. त्यावर आम्ही पुढे प्रक्रिया करुन जलरंग चित्राचा भास द्यायचा प्रयत्न केला आहे.) ज्येष्ठ लेखक अनंत मनोहर यांच्या प्रश्नोत्तर मालिकेचं संकलन करण्याचं क्लिष्ट काम गौतम पंगूनं अगदी हसतमुखानं स्वीकारलं. वैष्णवी अंदूरकरनं साहित्य निवडण्यामध्ये मोलाचा हातभार लावला. प्राजक्ता पाडगावकर, मिलिंद केळकर, अस्मिता अत्रे आणि इतरही अनेक जणांनी या ना त्या मार्गाने अंकासाठी मदत केली. प्रिया साठे. मामबो मध्ये मिळालेली एक अतिशय जवळची मैत्रीण. अंकाच्या कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग न घेताही ती नेहमीच, अगदी नेहमीच पाठीशी उभी राहिली आहे. तिची मैत्री, तिच्याकडून येणारं मानसिक पाठबळ आणि त्याव्यतिरिक्तही ती जे जे काही करते ते सगळं अंकापुरतं मर्यादित नाही. आणि अखेरीस, अंकामध्ये मौलिक योगदान केलेले सर्व लेखक ज्यांच्यामुळं हा अंक परिपूर्ण झाला. औपचारिक आभार नाही, पण सर्वांना स्वरूपची आंबा हिममलई तो बनती है!  

*इथं आणखी एका व्यक्तीचे खास आभार मानावेसे वाटतात त्या म्हणजे सायली राजाध्यक्ष! २०१४-२०१७ या काळात 'डिजिटल दिवाळी-एक 'नेट' का दिवाळी अंक' या नावानं त्यांनी एक अतिशय सुंदर दिवाळी अंक मराठी वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून दिला. मी खूप आवडीनं या चारही वर्षांचे अंक तर वाचलेच; पण यावर्षीचा मामबो दिवाळी अंक बनवताना ढोबळ मानानं त्यांच्या अंकाकडून निश्चितच प्रेरणा घेतली आहे. 

 

कला, मग ती कोणतीही असो, ती माणसातल्या ‘माणसाला’ जिवंत ठेवते. फांदीवर घाव घालावा आणि त्या चिरेतूनही पालवी फुटावी अशी. कलेच्या प्रेमाखातर अन् निव्वळ स्वानंदासाठी काम करणारे लोक ह्या अन्वये मला भेटले याचं प्रचंड समाधान आहे. 

 

सर्वांच्या अविरत कष्टांमधून साकारलेला हा अंक तुमच्याकडे सुपूर्त करतेय. आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची आम्ही आतुरतेनं वाट पाहत आहोत. 

 

ही दिवाळी आपल्या सर्वांच्या मनात ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ घेऊन येवो या शुभेच्छांसहित,  

शिरीन म्हाडेश्वर

891682_10151561998511151_91312306_o_edit
bottom of page