top of page

 

मामबोबद्दल  

'माझा मराठीचा बोल' म्हणजेच 'मामबो' हा मराठी साहित्यप्रेमींचा फेसबूकवरील एक समूह आहे. दि. ७ जुलै २०१६ रोजी अमेरिकेतील श्री. प्रियदर्शन मनोहर यांनी 'माझा मराठीचा बोल ' या समूहाची स्थापना केली.


मराठी साहित्य चळवळ अमेरिकेतही उत्साहाने चालविली जाते.विविध समारंभात, संमेलनात सहभागी झालेल्या तिथल्या मराठीप्रेमी रसिकमंडळींशी वारंवार चर्चा करताना आपण फेसबूकवर असा एक समूह स्थापन करावा ही कल्पना सुचल्यावर श्री. मनोहर यांनी या कल्पनेचा पाठपुरावा केला.प्रथम त्यांच्या साठ- सत्तर स्नेह्यांना या समूहावर आमंत्रित केलं, ज्यांनी नंतर त्यांच्याही स्नेह्यांना सामील करून घेतलं.
बरेच हौशी अन् अनुभवी लोक मामबोचे सभासद झाले. ह्यातलाच मीही एक. अमेरिकेतल्या एका स्नेह्याने मला इथे आमंत्रित केले.

सभासदांनी सातत्याने लिहावं यासाठी या समूहावर प्रोत्साहन दिलं जातं. ललित, कथा, दीर्घकथा, लघुकादंबरी, कविता, विडंबन, आध्यात्म, चारोळ्या, मुक्तछंद, पुस्तक परीक्षण/ओळख, अनुवाद, विनोदी साहित्य अशा सर्व प्रकारच्या साहित्याचा सतत ओघ असल्यामुळे रोज या समूहावर नजर फिरवली की एक वेगळाच आनंद मिळतो. अनेक लेखांना हिरीरीने वाचक प्रतिक्रिया देतात, मूळ लेखकालाही या प्रतिक्रिया समृद्ध करतात. एकमेकांच्या मार्गदर्शक सूचनांचा , दाखवलेल्या चुकांचाही खिलाडू वृत्तीने स्वीकार केला जातो.

 

आजच्या घडीस समूहात ३८८ सभासद आहेत. समूहाचे  व्यवस्थापक (ऍडमिन)देखील आपल्या कल्पनेने रंग भरतात. साहित्यात दर्जा, नाविन्य राखण्यासाठी ऍडमिन कधी स्वतःच्या संकल्पना सादर करतो, त्यावरही सुंदर लिखाण केल्या गेलंय. कित्येक ऍडमिननी  निद्रिस्त सभासदांचा पिच्छा पुरवून त्यांना लिहितं केलंय. तर, मायबोलीच्या संवर्धनासाठी उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती करण्याचं हे वैभवशाली तीर्थक्षेत्र आहे. या समूहावर येण्याआधी  मी फारसा लिहीत नव्हतो, फारतर कॉलेजच्या बॅचच्या व्हॉट्सऍप ग्रूपवर थोडंफार लिहिलं असेल मी. सगळी नियमावली वाचून, धीर एकवटून मी इथे लिहायला सुरुवात केली आणि मिळालेलं प्रोत्साहन पाहून वाटलं, खरंच,मला अशा समूहाची नितांत आवश्यकता होती.इथल्या उत्साहवर्धक सुंदर प्रतिक्रिया, लेखनशैलीबद्दल, मांडणीबद्दल निरोगी, उपयुक्त, मौलिक टीका, व्याकरण, शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करून निर्दोष लेखन कसे करावे याबद्दल दिलेला तळमळीचा सल्ला या सर्वांनी मला समृद्ध केलं. माझं हे मनोगत प्रतिनिधिक आहे, समूहावरील बव्हंशी सभासद माझ्या मताशी सहमत असतील.

'माझा मराठीचा बोल ' वर मुंबई, पुणे, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ कोकण या महाराष्ट्रातल्या प्रांताबरोबरच.. गुजरात, कर्नाटक, गोवा, आंध्र, तेलंगण या राज्यातील लोकही सामील आहेत, तसेच, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जपान,अमेरिका, कॅनडास्थित माय मराठीवर प्रेम करणारे सभासदही आहेत. असे म्हणतात की बोलीभाषा बारा कोसांवर ( साधारण पन्नास किलोमीटरवर)  बदलते.  वेगवेगळ्या प्रांतातल्या सभासदांच्या स्थानिक बोलीभाषेचे प्रतिबिंब पडलेले लेख वाचताना मोठी मौज वाटते. लेखनाचा बाज, प्रांतागणिक प्रचलित असलेल्या सुरेख म्हणी, वाक् प्रचारांचा समृद्ध करणारा मिलाफ इथे पहायला मिळतो.

माझा मराठीचा बोल तीन वर्षांचा झाला, या कालावधीत सभासद एकमेकांशी परिचित झाले, मामबोची स्नेहसंमेलने झाली, सदस्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी झाल्या. हे जणू एक वैश्विक कुटुंबच झालं म्हणा ना ! 'माझा मराठीचा बोल ' या समूहाचा हा तिसरा दिवाळी अंक आहे. या वर्षी इ-दिवाळी अंक काढला आहे, ज्यामुळे, सभासद  नसणाऱ्यांनाही नेटवरून हा अंक वाचून मामबो बद्दल माहिती व्हावी हा प्रामाणिक हेतू.

या दिवाळी अंकाच्या निमित्ताने मामबो परिवारातर्फे मी वाचकांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो.

डॉ. विवेक देशपांडे

bottom of page