top of page

 

स प्त प दी

विवेक देशपांडे

“नाही! तुला करावंच लागेल हं रिया!"

“नाही आई, प्लीज, नको बळजोरी करूस मला, प्रश्न माझ्या आयुष्याचा आहे! आणि प्लीज रडू नकोस. बाबा, तुम्ही सुद्धा?"

"आता मी कंटाळले रिया, पिकलं पान आम्ही, कधी गळणार नेम नाही, आम्हाला सुखाने वैकुंठास जाऊ दे गं!"

"काय गं तीच ती मरायची भाषा आई! मी आहे तुमच्यासाठी."

"मला जास्त काही बोलायचं नाही रिया, मी तुझा बाप आहे, आजवर मी कधी तुझ्यावर माझी मतं लादली आहेत? तुझ्या मतांचा अनादर केलाय? लेक सुखात राहावी असं आईबापांना वाटणं गैर आहे का?"

"पटतंय बाबा तुमचं मला, पण असं..."

"असं कुणीही पकडून आणला की त्याच्याबरोबर बोहल्यावर उभं राहायचं म्हणजे काय भातुकली आहे? असंच म्हणायचंय ना तुला?"

"नाही हो बाबा, पण तुम्ही तुमच्या लेकीबद्दल इतकं उथळपणे कसा निर्णय घ्याल, मला कळत का नाही हे? आता अठ्ठावीस वर्षांची झालीय की मी ही! पण...माझ्या मनाची तयारी? त्याचं काय?"

आई उसळली, 

"पुरे झाली थेरं तुमची, ह्या नव्या पिढीत तुझ्यासारखे वारा प्यायलेले अन् भरकटणारे खूप झाले म्हणूनच सगळी पिढी बिथरलेली, थिल्लर वाटते मला तर. उगाच शिकवलं तुम्हाला, तरी मी म्हणत होते यांना नका कॉलेजात घालू, शेवटी व्हायचं तेच झालं ना? अं, बोला की आता?"

दुखऱ्या जखमेची खपली आईने काढलीच! टचकन पाणी आलं डोळ्यात रियाच्या. असा काय गुन्हा केला होता तिने? देखण्या चिरागच्या प्रेमात पडली होती... हा गुन्हा? पडत नाही कुणी

प्रेमात? तारुण्यसुलभ भावना नाही ही? किती खुली चर्चा होते आजकाल मुलामुलींमध्ये या सनसनाटी बातम्यांवर, गॉसिप्सना उधाण येतं कॉलेज कट्ट्यांवर, कॅन्टिनमध्ये! 

खिन्न होऊन रिया तिच्या खोलीत आली, दार लोटून खुर्चीत बसली. खिडकीतून आत येणाऱ्या वेलीवरची  जुईची फुले कोमेजल्यासारखी वाटली तिला.

****

पहिला दिवस होता त्यांच्या भेटीचा. ती बॅडमिंटन खेळत असताना तो टक लावून बघत बसला होता, ती सफाईदार बॅकहँड प्लेसिंग करून ईशाला दमवत होती, निर्दयीपणे फोरहँड स्मॅशेस मारत होती, पाहतापाहता...गेम रिया!

पुढच्या गेमला कोर्ट बदललं तर तो तिच्या हाफकडे आला, बेंचवर आ वासून बघत होता नुसता. शटलकॅाक बेंचखाली पडलं, रियाने रॅकेटनेच खूण केली, त्याने शटल तिला दिलं ते तिच्या डोळ्यात बघतच !

मग मात्र तिच्या मनाने दखल घेतली त्याची. उत्साहाने तिने दुसरा गेमही खिशात घातला, कोर्ट सोडलं, नॅपकीनने घाम पुसला, बाटलीतलं पाणी प्यायली,रबरबँड काढून मान झटकली, तिचे तपकिरी केस सळाळत तिच्या खांद्यावरून मागेपुढे विखुरले, रॅकेट कव्हरमध्ये घालून खांद्याला लटकवत ईशाबरोबर ती हसत निघाली अन्. मागून आवाज आला,

"हॅलो, एक्स्क्यूज मी..."

"सॉरी?"

"कॅन आय कीप धिस?"

त्याच्या हातात रियाने झोडपून चुरगळलेलं शटलकॉक होतं ! ईशा अन् रिया खळाळून हसल्या. मग खोडकर नजरेने रिया त्याला म्हणाली,

"ठेव की ! पण काय करणार त्याचं, हे घेऊन खेळणार? ऑलरेडी मी ते क्रश केलेलं आहे!"

कपाळावर रुळणाऱ्या बटा मानेच्या झटक्याने मागे करत तो देखणा मुलगा म्हणाला...

"आय हॅव अ बिग क्रश ऑन यू... तू क्रश केलेलं शटलकॉक आपल्या पहिल्या भेटीचं सुव्हेनीयर म्हणून मला जपून ठेवायला आवडेल!"

असं म्हणून तो लाघवी स्मित देत वळला.

रिया अन् ईशा आ वासून बघतच राहिल्या. मग भानावर येऊन रिया ओरडली,

"हे ... मिस्टर... "

"चिराग, चिराग म्हणतात मला." तो गर्रकन वळून म्हणाला.

"चिराग असो की कंदील...मिस्टर, डोंट ट्राय टू बी स्मार्ट!"

गळ्याजवळ शर्टाच्या आत शटलकॉक सारत तो पुन्हा चार्मिंग हसला.

"वॉव, यू आर स्पाइसी, आय लाइक इट!"

रात्री घरी पलंगावर लोळताना रियाच्या मनातून काही केल्या हा प्रसंग जात नव्हता. दुसऱ्या दिवशी ईशाने तिला हळूच चिडवायला सुरुवात केली, तो तर वर्गात अँगल साधून तिच्याकडेच बघत बसे. हळूहळू कानोकानी होऊन हा क्रश चांगलाच चघळला जाऊ लागला. गॅदरिंगच्या मॅचमध्ये तर चिरागने जाहीर करून टाकलं की, रिया चिअरलीडर असेल तर आपली टीम जिंकणारच!

झालं, सगळ्या वर्गाने इज्जतका सवाल केल्यामुळे रियाला नेतृत्व करावंच लागलं, त्यांच्या टीमने फायनल मारली, चिरागने घणाघाती सेंच्युरी ठोकली. टीमने चिरागला डोक्यावर घेतलेलं, चिरागच्या डोक्यावर कप. ग्राउंडला फेरी मारून सगळे मुलींसमोर आल्यावर चिराग उतरला, मानेत वाकून रियाला हॅट हातात घेऊन कुर्निसात करत म्हणाला,

"थॅंक्स अ लॉट फॉर द इन्स्पिरेशन! ही सेंच्युरी तुला अर्पण!"

टाळ्यांचा, शिट्यांचा एकच धमाका  उडाला. रिया लाजून लालेलाल झाली.

पुढचं सगळं मग तसं अटळच ना?

प्रेमकहाणी सुरू झाली.

डिबेटमध्ये सिलेक्शन होऊन इंटरकॉलेजिएट कॉम्पिटिशनसाठी रियाची निवड झाली. चांगली तयारी करून आत्मविश्वासाने रिया प्रतिस्पर्ध्याचे मुद्दे खोडून काढत होती, टाळ्या पडत होत्या. पण तिचा चिराग दिसत नव्हता, तिची नजर त्याला हॉलमध्ये शोधत असताना ती मुद्दा विसरली, थोडी अडखळली.

"कमॉन, गो अहेड, यू हॅव राइटली पुट इट! "

उभा राहून टाळ्या वाजवत एक उंचापुरा नीटस मुलगा तिला म्हणाला. भानावर येऊन ग्लासातलं पाणी पिऊन ती पुन्हा त्वेषाने बोलू लागली, मुद्दा विसरला तरी तिने चतुराईने भाषण पूर्ण केलं, पण... डॅमेज वॉज डन ! त्या एका क्षणाने घात केला, लय तुटली होती... तिचा दुसरा क्रमांक आला !

टाळ्यांच्या गोंगाटात तो उमदा मुलगा  ओरडला, "अभिनंदन ! "

ती गर्दी कापत बाहेर येऊन त्याला शोधेपर्यंत तो दिसेनासा झाला होता. तेवढ्यात चिराग आला.

"सॉरी, सॉरी डिअर, थोडा उशीर झाला! काँग्रॅट्स! "

नुसतं लपून छपून भेटणं, त्या भेटींचा आवेग सोसणं असह्य झाल्यावर ती चिरागला म्हणाली, 

"काय रे? कधी सांगायचं घरी? आता परीक्षा झाली की संपलं ग्रॅज्युएशन ! घरचे मागे लागतील."

"सांगून टाक की बिनधास्त तुझ्या आईबाबांना, म्हण त्यांना की, मी सर्वात देखण्या मुलाची राणी होणार, स्थळंबिळं बघू नका! माझ्या घरी तर काही सांगायचीच गरज नाही, माझी निवड ते आनंदाने स्वीकारणार!" तो खळाळून हसत म्हणाला.

"चिराग, गंभीर हो रे जरा ! काय करणार तू पुढे, शिकणार का? लग्न कधी करायचं आपण, साखरपुडा? कोलकात्याहून तुझे आईबाबा आले तेव्हा तू मला भेटायला चल म्हणून हात ओढत घेऊन गेलास, तुझ्या आईबाबांना मी भेटले, मग माझ्या घरच्यांनी कधी भेटायचं?"

"अगं...किती प्रश्न एकाच वेळी?"

मग गंभीर होऊन तो म्हणाला, 

"मला एमबीए करायचंय. सिरियसली! मग खूप अव्हेन्यूज ओपन होतात, नोकऱ्याही पटापट अन् भरघोस पगाराच्या मिळतात."

तिला हे कळत होतं, पटत होतं, योग्यच निर्णय चिरागचा. तिची अस्वस्थता पाहून त्याने तिला स्कूटरवर बसवलं अन् सरळ तिच्या घरी ते दोघं आले. तिच्या आईबाबांना चरणस्पर्श करून त्याने सगळं सांगितलं अन् एमबीए केलं की आम्ही लग्न करणार हेही सांगून तो मोकळा झाला. आईबाबांनी खोदून खोदून त्याची चौकशी केली, प्रश्न विचारले, मोकळ्या मनाने त्याने सगळी उत्तरं दिली, त्याच्या आईबाबांना रिया पसंत असल्याचं सांगितलं. तो गेल्यावर आई बाबा त्याच्या वाटेकडे बघत होते. विनयशील आहे पोरगा, महत्त्वाकांक्षी आहे असं ते पुटपुटत होते. रियाला समाधानाने त्या रात्री गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशीपासून गंभीरपणे अभ्यास सुरू करून सर्वांनी परीक्षा दिल्या. रिझल्ट लागल्यावर सगळी पांगापांग झाली. चिराग तिला भेटून पत्रं लिहिण्याचं वचन देऊन मुंबईला एम.बी.ए. करायला गेला. रियाने एम. एस. सी. ला ऍडमिशन घेतली.

दोन वर्षं भुर्रकन गेली. पत्रांनी प्रेमज्योत तेवत राहिली.

चिराग फर्स्टक्लास पास झाला, "कँम्पस इंटरव्ह्यू सुरू होतायत, सगळं पक्कं झालं की मी येतो", असं चिरागने कळवून दोनेक महिने लोटले. एम. एस. सी. ला युनिव्हर्सिटीत पहिली आलेल्या रियाला प्रिन्सिपलनी आपल्याच कॉलेजात जॉईन हो म्हणून आनंदाने ऑफर दिली. लग्न होईस्तोवर बरंय  म्हणून रियाने लेक्चररची पोस्ट घेतली. वक्तृत्व हाडातच असल्याने रिया विद्यार्थ्यांची लाडकी टीचर झाली.

हळूहळू चिरागच्या पत्रांचा ओघ कमी झाला. दोन वर्ष सरली, रियाला काळजी वाटू लागली. आई बाबा सारखे धोशा लावू लागले. रिया बेचैन झाली. चार पाच वर्षात तिच्या बरोबरीचे सगळे मित्र मैत्रिणी पांगले होते, कुणाची लग्नं होऊन गेली होती, आता बोलायला कोणी उरलं नव्हतं. तिला चिरागच्या नावाने चिडवायलाही कुणी राहिलं नाही. काळ किती वेगाने धावतो. सत्तावीस वर्षांची एकुलती एक, देखणी, बुद्धिमान अविवाहित मुलगी घरात असल्याने आईची आधीची कुजबुज आता मोठ्या भांडणात रूपांतरित होऊ लागली. बाबा अस्वस्थपणे अंगणात रात्रीबेरात्री शतपावली करू लागले. रियाला का हे समजत नव्हतं? पण प्रेम वेडंच असतं.

एके दिवशी बाबांनी अल्टिमेटम दिला,

"रिया, इनफ, एक महिन्यात तुम्हा  दोघांचं  मला लग्न लावायचंय, मी जबाबदारीतून मोकळा व्हायला हवं आता. चिरागला बोलाव."

आणि मग... तो जीवघेणा शोध. मुंबईला रिया स्वतः जाऊन आली, कॉलेजात कळलं चिरागने कुठे दिल्लीत जॉब घेतला असावा. निश्चित माहिती नाही. कॉलेजबाहेर येताना त्याच्या मित्रांचा शोध घेतला तिने. एका ज्युनियरने नाव सांगितलेल्या मुलाकडे ती गेली...

"चिराग? ओह ! तू रिया वाटतं... नाही माहीत चिरागबद्दल. माझ्या कंपनीतच सिलेक्शन झालं होतं त्याचं. जॉईन व्हायला दोघे आलो होतो आम्ही, डोंट नो, ही डिडंट जॉईन, दिल्लीला चाललो म्हणाला. आर यू गोईंग टू मॅरी हिम? "

"ऑफ कोर्स आय अॅम!"

"आर यू सीरियस?"

ती संतापाने पाय आपटत निघून आली. कलकत्त्याला गेली तर त्याच्या बाबांनी कलकत्ता दोन महिन्यांपूर्वी सोडलं होतं.  शेजाऱ्यांनाही ठावठिकाणा माहीत नव्हता. तिचे डोळे भरून आले. कुठे शोधू चिराग तुला!

****

किती वेळ ती टेबलावर हात अन् त्यावर  डोकं ठेवून झोपली होती तिला कळलंच नाही. दिवा लागला. खांद्यावर हात पडताच रिया दचकली. बाबांचा स्पर्श तिला जाणवला. ती डोळे पुसत उभी राहिली. बाबांनी तिला छातीशी धरलं. तिचे हुंदके थांबेपर्यंत ते तिची पाठ थोपटत होते.

"असं का झालं हो बाबा? मला नाही करायचं कुणा दुसऱ्याशी लग्न."

बाबा काही बोलले नाही. आणलेल्या ट्रे मधून त्यांनी दोन वाफाळत्या चहाचे मग उचलले, रियाला चहा देऊन ते तिच्या बाजूच्या खुर्चीत बसले.

"बेटा, तुझ्या प्रेमाबद्दल मला नितांत आदर आहे, त्याच्याही. पण कसं असतं, त्याने संपर्क केला नाहीय हे मला एक वर्षापासून खटकत आलं."

"नसेल केला ! अभ्यासामुळे किंवा लक्ष विचलित होऊ नये म्हणून, किंवा चांगली नोकरी मिळावी याची धडपड करण्यात गुंतला असेल म्हणून. पण..."

"असंही असू शकतंच ना , की, तुझ्यातलं त्याचं स्वारस्य कमी झालं असेल. त्याला दुसरी कुणी अजून सुंदर बुद्धिमान  मुलगी आवडून तो तिच्याकडे आकर्षित झाला असेल. "

"बाबा..."

"ऐक, ऐक, शांतपणे ऐक... असं असू शकतंच ना? तुलाही आजवर दुसरा कुठला चांगला मुलगा आवडला असू शकतो, तू दुसऱ्या कुणात गुंतू शकते असंही घडू शकतं.''

"मी? शक्य नाही बाबा!"

" ठीक आहे, तू नाही, त्याच्याबद्दल तू कशी खात्री देऊ शकतेस? आपण वाईटात वाईट गृहीत धरूया, की , त्याचं दुसऱ्या कुणावर प्रेम जडलं असेल, तो परदेशी गेला असेल, मेला असेल .. काहीही! 

म्हणून काय आपण आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून घ्यायची? आमचा आधार तोकडा, जन्माचा साथीदार हवा बेटा, आज नाही कळणार तुला हे पण... पटेल तेव्हा पुलाखालून बरंच पाणी गेलं असेल वाहून, अन् अत्यंत चांगली स्थळं हातून सुटून गेल्यावर प्रौढावस्थेत कोमेजलेल्या मनाने लग्न करणं शहाणपणाचं नाहीय. मानसिक, शारीरिक गरजांची पूर्ती ठराविक वयात व्हायला हवी, तरच वार्धक्य समाधानकारक जातं. बघ, माझं ऐकलं तर तुला पश्चात्ताप होणार नाही. आता हे पहा, किती चांगलं स्थळ आलंय, मुलगा फर्स्ट अॅटेम्प्टमध्ये आय.ए. एस. परीक्षा व मुलाखत पास झालाय. त्याचे वडील अन् मी एकेकाळी मित्र होतो, सज्जन लोक आहेत. एकदा भेट त्याला, उद्या बोलावलंय मी घरी. जमलं तर लग्न उरकण्याची त्यांना घाई आहे. नुकतंच इंदिरा गांधींचे निधन झाले आहे त्यामुळे परिस्थिती सामान्य झाल्यानंतर त्याची पोस्टिंग येईल. त्यामुळे तो आता तुला  बघायला येतोय. जबरदस्ती नाही, पण सकारात्मक, खुल्या दिलाने भेट. हा बघ, हा त्याचा फोटो ठेवलाय."

ती काहीच बोलली नाही, बाबा निघून गेले.

पत्त्याच्या कॅटमधला एक पत्ता सहज हातात धरून खेळावं तशी रिया त्या मुलाचा फोटो घेऊन शून्य नजरेने खिडकीबाहेरच्या चांदण्याकडे बघत खेळत बसली होती. अंगठा अन् मधल्या बोटात तो फोटो वाकवून तिने सोडला, तो उडून कुठेतरी पडला, पत्त्याच्या डावातला जोकर जणू. खिन्न होऊन तिने मान टेबलवर ठेवली. तिच्या व चिरागच्या सहवासातील एक एक आठवणींचा चित्रपट तिच्या डोळ्यांसमोरून सरकू लागला.

 

थकून झोपलेल्या रियाला आई हलवून उठवत होती. दचकून ती धडपडत उठली.

"रिया, ए रिया... पोरीनं घोर लावताय बाई जीवाला... ऊठ बरं बाळ, अगं, दहा वाजले रात्रीचे, काय दशा करून घेतलीस बघ, चल जेवण वाढून आणलंय, किती हाका मारल्या खालून आम्ही, तुझे बाबा म्हणाले, तू तिथेच ताट घेऊन जा तिचं, नाही येणार ती खाली. चल बघू, जेवून घे चार घास. काय अवतार झालाय केसांचा, डोळे काय सुजलेयत रडून. थांब तुझे केस विंचरून देते. लांब केस ठेवायची हौस किती, त्याची काळजी घ्यावी लागते तशीच, काय भुरळ घातली मेल्याने, माझ्या गोड पोरीचं वाट्टोळं करून टाकलं, कीड लागो मेल्याला. अगं, ऊठ गं पोरी आता, चार घास खाऊन घे, आम्ही दोघंही उपाशी आहोत, चतुर्थी आहे, नवालाच चंद्रोदय झाला, तू उपवास घडवणार बघ आम्हाला..."

आईची अखंड बडबड थांबणार नाही हे जाणून रिया तटकन उठली. बाथरूममधून फ्रेश होऊन आली. टेबलावरच्या ताटातली भाजीपोळी, आमटी भात चिवडू लागली. घास घशाखाली सरकेना.

"अगं, असं नको वागू पोरी, एकुलती एक तू आमची. तू अशी निराश राहिली तर आम्हाला गोड लागेल का? काय मांडे मनात रचले होते आम्ही दोघांनी, तुझं लग्न थाटात करणार, सगळ्या नातेवाईकांना आहेर करणार. अशी कशी दृष्ट लागली आमच्या स्वप्नाला, देव जाणे. आता थकलो गं आम्ही दोघे, महादेवाला जाऊन यायचं तर हल्ली गुडघे आवाज करू लागतात, जबाबदारीचं काम असतं बाई तरणीताठी लेक घरात असणं. आमची काही कीव..."

आईचा बांध फुटला, डोळ्याला पदर लावून ती खांदे घुसळत मुसमुसू लागली. रिया अस्वस्थ झाली. कसंबसं ताट संपवून ती हात धुऊन आली.

"आई, शांत हो, मी बरी आहे, नको जीवाला इतका घोर लावून घेऊ. चल बरं, उठा, बाबा, तूम्ही जेवून घ्या. चला मी वाढते."

आईला हाताला धरून उठवत  जिन्यातून खाली येताना तिने आईकडे पाहिलं, पार खचलेली अशी आई तिने बघितली नव्हती कधी, तिला कससंच झालं. बाबा अंगणात आरामखुर्चीत चंद्राकडे बघत हरवले होते. रात्री  आवर्जून रेडिओवर ' आपली आवड ' ऐकणारे आपले बाबा असे मूक, हतबल झालेले पाहून ती अस्वस्थ झाली.

"चला बाबा, आई जेवून घ्या.मी वाढते, खरंच काळजी करू नका माझी, मी सावरतेय, तुमची माया, तुमचे संस्कार इतके का तकलादू आहेत ? नका काळजी करू इतकी."

"फोटो पाहिलास बेटा?"

"नाही अजून, बघते."

"बरं, बघ सावकाश." हळूच आईकडे बघत बाबा म्हणाले.

जेवणं झाल्यावर टेबल आवरून रिया वर आली. तिचं डोकं जड झालं होतं. दिवा मालवून ती पलंगावर पडली, काहीतरी गालाला टोचलं, तर तो त्या मुलाचा फोटो होता. तिने उचलून टेबलावर ठेवला. उशीवर मान ठेवली अन् अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कधीतरी उशीरा तिला झोप लागली. पहाटेचा गार वारा सुटल्यावर ती जागी झाली. फ्रेश होऊन सलवार कमीज घालून ती खाली आली, बाबांना सांगितलं, मी फिरून येते. घराबाहेर पडली, पक्ष्यांच्या चिवचिवाटात, पहाटेचा गार वारा अंगावर झेलताना तिच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. गाणं गुणगुणत ती एकटीच निघाली. नदीकाठी आली, महादेवाला बाहेरूनच हात जोडले, पुलावरून कॉलेजकडे आली. कॉलेज कॅम्पस तिला नेहमी सचेत करत असे. तिथली वनराई, टुमदार इमारत, प्ले ग्राउंड, प्रोफेसरांचे बंगले, पायवाटा.... किती पायवाटा त्यांनी तुडवल्या होत्या ! मंझिल दूरच राहिली. प्रिन्सिपल वाटवे सरांच्या बंगल्याच्या कुंपणावरून तगरीची टवटवीत दवाने भिजून जड झालेली फांदी बाहेर झुकली होती, तिने अलगद एक फूल हात उंच करून खुडले. त्या झटक्याने पानांवरच्या थंडगार दवाचा शिडकावा तिच्या चेहऱ्यावर झाला. तिला प्रसन्न वाटलं.

" गुड मॉर्निंग माय यंगेस्ट कलीग! कमॉन, लेट्स हॅव टी!"

सरही वॉक घेऊन आले होते. 

"गुड मॉर्निंग सर!"

"अनघा, आज चहा बागेतच आण, बघ कोण आलंय!"

त्या सुंदर बागेत वेताच्या खुर्चीवर अप्रतिम चहाचे  घोट घेताना त्यांच्या गप्पा खूप रंगल्या. 

"थॅंक्स सर, मॅडम, फॉर द वंडरफुल टी, या घरी आता."

"लग्न ठरतंय म्हणे तुझं, बाबा सांगत होते काल, लग्नालाच येऊ की, पण आता काळजीच मला, तुझ्यासारखी पॉप्युलर टीचर कोण मिळणार? नाही का अनघा?"

"सर, ही फुलं खूप आवडली, कसलं झाड हे? इथं कुठे आधी पाहिलं नाही."

"केरळहून आणल्या त्याच्या बिया. मलाही वाटलं आधी रुजेल की नाही पण लागलं. आपल्या वातावरणात टिकेल का, किती ऊन सहन करेल , पाणी किती लागेल... अभ्यास करून लावलं, फुललं छान ! बी रुजायला मेहनत घ्यावी लागते रिया, वेळेवर खत, पाणी, सगळं बघावं लागतं, आणि अजून एक... झाड उगवलं ना, माळ्याच्या हाताचा मायेचा स्पर्श लागतो वेळोवेळी, ते हात बोलतात झाडाशी. मग काहीही रुजतं..."

सर तिच्याकडे रोखून पाहत होते. त्यांनाही माहीत असेल?

"गुड डे सर, छान, पॉझिटिव्ह  वाटलं तुम्हाला सकाळीच भेटून... येते!"

दुपारी चार वाजता साहिल आणि त्याचे आईबाबा आले. दिवाणखान्यात सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. रिया कामापुरतं बोलत होती, अवघडली होती,  'दाखवणे ' या प्रसंगाला ती पहिल्यांदाच सामोरी जात होती. त्याच्या आईच्या नजरेतून हे सुटलं नाही.

"रिया, साहिल... तुम्ही फिरून या बेटा, किंवा मोकळ्या गप्पा मारा कुठे बसून, आमच्यात काय बसता?"

साहिल उठला, रियाकडे बघताच रिया म्हणाली,

"आम्ही वरच बसतो, माझ्या खोलीत."

टेबलशी दोघं बसले. थोडा वेळ कुणी काहीच बोलेना.

"मस्त... सुरेख वास येतोय जुईचा, पर्फेक्ट रूम फॉर अ प्रोफेसर! आर्टिस्टिकली सजवलीय, कॉन्फिडंट व्यक्तीने सजवावी तशी. आवडलीच मला, अन् प्रोफेसरही मनापासून आवडली. हे काय? माझा फोटो ? पाहिलास की नाही काल?"

ती दचकली, त्याच्या दिलखुलासपणाची तिला दाद द्यावीशी वाटली, अन्  फोटो न पाहिल्यामुळे अपराधीही वाटलं जरा. तिने नकळत त्याला पाहून घेतलं.  

व्यायामाने सुघटित शरीर, तो ऑरा सगळं तिने टिपून घेतलं. ती ही खळाळून हसली. मग मोकळ्या गप्पा झाल्या. आय ए एस च्या ट्रेनिंग मधल्या गमती जमती, दिल्लीच्या फर्स्ट पोस्टिंग मधला ऑफिसचा पहिला दिवस, नाटकं, सिनेमा, इतिहास, साहित्य, काव्य... तो भरभरून बोलत होता, तीही खुलत होती, जुईच्या कळीसारखी. दोघांनी खाली येताच होकार दिला. रियाला आई बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद अन् समाधान पाहून बरं वाटलं.

लग्नाचा दिवस उजाडला तोच रियाला अस्वस्थ करत. का कोण जाणे. ईशा, स्नेहा... त्यांची लग्नं झालेली असूनही तिच्याकडे चार दिवसांपासून आलेल्या, गप्पा, थट्टा, जुन्या आठवणींना पूर आला होता, कुणीच चिरागचा विषय काढला नव्हता, रियाला बरं वाटलं. पण मग का तिला अस्वस्थ वाटत होतं?

वधूचा साजश्रृंगार करून कार्यालयाच्या खोलीतून ती आई, स्नेहा,ईशा,बरोबर बाहेर आली, तिचं देखणं रूप वधूच्या वेषात अधिकच उजळलं होतं. वऱ्हाडी मंडळी, साहिलचे मित्र हरखून गेले. एकाने ' वॉव ' केल्यावर तर ती लाजलीच. स्नेहा कुणाशी तरी बोलायला अचानक धावली,

"अरे, निनाद, माय गॉड, किती दिवसांनी भेटलास,  आधी नाही यायचंस?"

"अगं, रियाकडून नाही, साहिलकडून आलोय मी!"

रियाने दचकून त्याच्याकडे पाहिलं,अन् त्यांची ओझरती नजरानजर झाली. त्याने थम्स अप केलं. ती नुसतं खोटं ओळखीचं हसली. बोहल्यावर चढेपर्यंत तिच्या लक्षात आलं, हा तोच, आपण भाषण करताना अडखळलो तेव्हा आपल्याला चिअर अप करणारा, ती थम्स अपची स्टाईल त्याचीच. आपण भेटलोही नाही नंतर त्याला, त्यानेही कधी जवळीक नाही साधली. कदाचित चिराग... मग तिला अजून अस्वस्थ वाटू लागलं. कावरीबावरी होऊन ती इशा, स्नेहाशी बोलत, जो बघेल त्याच्याकडे बघत अस्वस्थपणे पाटावर उभी राहिली. साहिलच्या आई तिला बघत होत्या, त्यांना वाटलं, का बरं ही भेदरलेली, मनाविरुद्ध तर उभी नाहीय ना लग्नाला? छे ! एकुलती एक पोर आहे, घर सोडून जाणार म्हणून बावरणारच की. त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. मंगलाष्टकं झाली, हार घातले, ती साहिलची झाली! झाली? देव जाणे.

निनाद फोटो काढत होता, मस्करी करत होता, ती अस्वस्थ होत होती. लोक स्टेजवर येऊन हस्तांदोलन, शुभेच्छा, आशीर्वाद देऊन जात होते. थोडी गर्दी ओसरली, निनाद स्टेजवर आला, साहिलने त्याला कडकडून मिठी मारली.

"मीट माय I984आय ए एस बॅचमेट निनाद... रियाशी तुझी काय ओळख करून देणार? ती तर तुझी बॅचमेटच!"

"येस अँड अ व्हेरी रिमार्केबल गर्ल, सहजीवनाच्या शुभेच्छा रिया, सहज रुजशील नव्या घरात. चल, येतो साहिल, मस्त जेवण झालं, ट्रेन पकडायचीय. "

"ओके बडी, भेटू दिल्लीला आल्यावर, बाय, अँड थँक्स अ लॉट!"

निनाद गेल्यावरही रिया अस्वस्थ झाली. साहिलने तिचा हात हलकेच दाबला, त्याचे बाकी मित्र स्टेजवर आले होते, ती पुन्हा सस्मित झाली.

" चला, सप्तपदीला याsss " भटजी तारस्वरात ओरडले.

विधी सुरू झाला, थोडं शिथिल वातावरण अन् फक्त जवळचे नातलग असल्याने रियाचं दडपण थोडं कमी झालं. साहिलच्या हे लक्षात येत होतं. आता परीक्षा त्याची होती, पण त्याला खात्री होती, तो जिंकणार. आत्मविश्वासाच्या बळावरच तर तो इतक्या उंचीला पोचला होताना. त्याला समजून घेण्याची कुवत असलेली, समंजस साथ देणारी, बुद्धिमान अन् सुस्वरूप अशी ही  बायको फार फार आवडली होती. पाटावर सात सुपाऱ्या मांडलेल्या आहेत, प्रत्येक फेऱ्याच्या वेळी  मी मंत्रोच्चार करणार, ही सात वचनं तुम्ही कबूल करणार आहात, एकमेकांना.  त्याचा मी प्राकृतात अर्थ सांगणार तुम्हा दोघांना, मग रिया 

पायाच्या अंगठ्याने एक सुपारी  बाजूला सरकवेल, मग पुढचा फेरा! कळलं?

दोघांनी माना डोलावल्या.

तिच्या पदराची त्याच्या खांद्यावरच्या उपरण्याशी बांधलेली गाठ सांभाळत दोघे फेरा घालू लागले. गुरुजी मंत्र व अर्थ सांगत होते.

"एकमेकांना सुखी ठेवण्याचे वचन द्या."

साहिल मागून रियाला ऐकू जाईल इतकं हळू आवाजात बोलला,

"मी तर दिलंय तुला, तू उच्चारलं नाहीस तरी मी समजू शकतो."

ती चपापली, मान खाली घालत तिने थरथरत अंगठ्याने पहिली सुपारी बाजूला केली. गुरुजींनी त्यांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या.

"हं, दुसरा फेरा...

जावईबापू, आमच्या लेकीला खंबीर साथ द्यायचं वचन तुम्ही देताय आणि रिया तू त्यांना सर्वस्व अर्पण करून एकनिष्ठतेने व प्रामाणिकपणे आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतेयस. "

"मला सगळं माहीत आहे रिया, तुझ्याबद्दल व चिरागबद्दल, चिराग दिल्लीत मल्टिनॅशनल कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहे, त्याच्या कलीगशी त्यानं लग्न केलंय, सुखात आहेत दोघे. " साहिल पुटपुटला. थरथरत्या देहाने दुसरी सुपारी सरकवत रिया पुढच्या फेऱ्याला वळली.

पुढची वचने आणि फेरे होईपर्यंत साहिलने तिला सगळं सांगितलं.

"तुझी चिरागमध्ये इन्व्हॉल्व्हमेंट, त्याचं बेफिकीर वागणं, आताचा सुखी संसार, तुझं एकनिष्ठतेने त्याच्यावर प्रेम करणं ... या साऱ्यांबद्दल मला निनादने माहिती दिली. तरी तुझं स्थळ आल्यावर मी तुला भेटायचं ठरवलं रिया, आणि पहिल्या भेटीतच विश्वास वाटला की तूच मला हवीस सहचारिणी म्हणून. मला पुन्हा तुझ्या भूतकाळाबद्दल सांगण्याची गरज नाही, कारण मी त्यासहित तुझ्यावर प्रेम करतो."

"इतका विश्वास आहे तुला माझ्याबद्दल साहिल?"

"अर्थातच. मी खोटं बोलत नाही कधी."

 

"अहो जावईबापू, काय कुजबुजताय दोघं. सगळे फेरे पूर्ण करा की, हनीमूनला बसा निवांत एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून. इथे आम्हाला भुका लागल्यायत की हो."

मंडपात हशा पिकला, रियाला कुठे तोंड लपवू असं झालं. साहिल गंभीरपणे म्हणाला,

"अहो गुरुजी, तुम्हीच वचनं घ्यायला सांगता ना, मग घेऊ देत की आम्हाला आणाभाका, त्या फक्त आमच्यासाठी आहेत तुमच्यासाठी नाहीत."

पाहुणेरावळे पांगले. रात्री वऱ्हाड रवाना होणार होतं, म्हणून लक्ष्मीपूजन वरपक्षाच्या खोलीत ठेवलं होतं.​ उंबरठ्यावरून  कुंकवाने लाल झालेल्या पायाने  माप ओलांडून येताना रियाचा चेहरा प्रसन्न होता. तिच्या सासूबाईंना तो आनंदी चेहरा बघून समाधान लाभलं. रियाही पूर्ण निःशंक आणि आनंदी होती. नव्याने नव्या मातीत रुजताना रिया साहिलच्या संसाराचं बीज अत्यंत निष्कलंक आणि निरोगी होतं.

 

विवेक देशपांडे

 

VivekDeshpande.jpg

अहमदनगर येथे वास्तव्य. मूळ गाव बीड. व्यवसायाने बालरोगतज्ञ. पत्नी, मुले सगळेच डॉक्टर. स्वाभाविकपणे वैद्यकीय पेशा ही मूळ आवड. घरची शेतीवाडी आहे अन् लहानपणी शेती केल्यामुळे शेती, निसर्ग यात रुची आहे. आता शक्य होत नाही पण पूर्वी मराठी साहित्य वाचनाचा प्रचंड नाद होता. शास्त्रीय संगीत व सिनेसंगीत ऐकण्याचीही मला आवड आहे. 'माझा मराठीचा बोल ' या समूहात फेसबुक वर सामील झाल्यावर इथल्या लोकांचा परिचय, प्रोत्साहन यामुळे भीड चेपली, लिहू लागलो. ललित, कथा, काव्य हे आवडते लेखनप्रकार. इथे समविचारी मंडळी भेटली. या समूहात आपलेपणा आहे. प्रोत्साहन, मूल्यवान आणि परखड प्रतिक्रिया सभासद देतात.

bottom of page