top of page

 

प्र ती क्षा

 

वैष्णवी अंदूरकर

एका विस्तीर्ण कोरड्या पठारावर 

एकच झाड; निष्पर्ण..शुष्क 

कधीतरी लसलसून डवरल्याची

साक्ष देणाऱ्या वाळक्या फांद्या.

रखरखीत तापल्या उन्हात

आजूबाजूचं सगळंच जळून गेलं तरी 

तग धरून बसलेलं एकुलतं एक झाड.

न राहवून विचारलंच शेवटी, 

“ इतकी आस जगण्याची?”

थरथरलं जरा,

झुळूकही नसतांना वाऱ्याची. 

“खूप खूप वर्षांपूर्वी, 

वचन देऊन गेलाय एक पक्षी…

परत येण्याचं…

म्हणून फक्त..त्याच्यासाठी…”

काय बोलू?

अवघड असतेच प्रतीक्षा

आणि त्याहून बांधिलकी..

माझ्या डोळ्यातला पाऊस 

झाडाच्या खांद्यावर…

तेवढीच ओल त्याच्यासाठी 

समजून घेतल्याची..

जवळीक वेदनेशीही असतेच की..

वैष्णवी अंदूरकर

FB_IMG_1566393185613.jpg

कोल्हापूरला वास्तव्य. व्यवसायाने उद्योजिका. "ग्लॅडियन्स ऑटोमेशन प्रा.लि. या कंपनीची सीइओ. तीन काव्यसंग्रहांचा "काव्यत्रयी" हा काव्यसंच गेल्या वर्षी प्रकाशित झाला आहे. सर्व कलांचा आस्वाद घेणं आवडतं. नाचणं, गाणं, खेळणं, लिहीणं, वाचणं सगळंच  आवडतं.

bottom of page