top of page

 

शि व प्र ता प    

शैलेश देशपांडे 

वृत्त: पंचचामर

लक्षण: ज र ज र ज ग (जभान राजभा जभा न राजभा जभान ग), यति ८ व्या अक्षरावर

चाल: शिवतांडव स्तोत्र

करे फुशारकी बडी कराल दाढ फासुनी
"जिवे चढे हयानिशी धरेन हात बांधुनी,
बसा फिकीर सोडुनी खुशाल सिंह आसनी"
पहाड काय चालला अफाट सैन्य घेऊनी

तरा तरा भरा भरा विराट नागरी सुभा
मदांध खान ठाकला बखेड मांडला उभा
म्हणे "चुहा पहाडका" वकील पंत शाहणा 
"बहूत धास्त खाइला, पहाल जावली वना,

पिता समान स्थानसे क्षमा करावि पामरा,
मुलूख, राखल्या धना तुम्हास देत सत्वरा,
दहा दहा शरीरका बरोबरी असे धरा
दहा दहा शरावरी परी सुदूर अंतरा"

"लढायला तयार व्हा सुवर्ण संधि साधण्या
तहान रक्त लागली हवा बळी सुखावण्या
नृसिंह रूप आठवा, हिरण्य कश्यपू वधा"
उमा सिवा स बोलली "असेंन साथिला सदा"

करून सील चालला सिवा प्रसाद घेऊनी
सला न मानणे उगी, धजावणे, स्मरे मनी
मऱ्हाट राज्य साधण्या उपाय हाच जाणुनी
भले बुरे घडे क्षणी भवानि नेइ तारूनी

बळे उफाळली दया गळ्यास खान भेटण्या
(सला नको गिला नको, स्मरा वडील बांधवा)
"उगाच का मिरsवतो स्वत:च शेखिया बढ्या
चला समोर पातशा क्षमा करेल गल्तिया"

सिवास दाबले उरा कट्यार वार मारला
करार पार मोडला जरी वरी खरारला 
सिवा करी नखे धरी भरा भरा घुसे वसा
बिचूव वार घातला अनेकदा भसा भसा

(हिरण्य कश्यपू जणू मधो मधी विभागला)
करी गलाबला रिपू दगा दगा दगा दिला
हस्डून मुंड राजिया परsतला गडा तळा
सुसज्ज मावळे रणा खुणेस भांड वाजला

त्वरेच भेटतो धुळी धरील शस्त्र  तोच तो
असूर सैन्य आहुती स्वराज्य याग प्राशतो
गलीत गात्र भारता कली युगात राखला
जसे वधे समाग्रजा तसाच भीम शोभला

 

वृत्त बद्ध काव्यातील हृस्व दीर्घ शैथिल्याचा भरपूर फायदा घेतलाय.  अक्षर जसे उच्चारायचे तसेच लिहले आहे. आधी प्रदर्शित शिवाष्टकातील  "चपळ पळापळ गाठुन भेटुन खान मदांधसि मारियले" ह्या काव्य कल्पनेचा हा विस्तार होय.

उपसंहार


बहुतेक सर्व वर्णन हे "सभासद बखर" वर्णनावर (१) आधारीत आहे. हे वर्णन म्हणजे बखर साहित्यातील युद्ध वर्णनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे, इतिहासाची आवड नसली तरी साहित्याच्या आवडीखातर वाचण्याइतका!
भेटीस चिलखत घालून - सील करून जावे हा कृष्णाजी बंककर ह्यांचा सल्ला हा "अफजलखान वध" (२) या पोवाड्याच्या आधारे आहे. हा पोवाडा सहज उपलब्ध आहे.  ब. मो. पुरंदरे ह्यांच्या राजा शिवछत्रपती मधे सुद्धा मिळेल. बाकी साहित्यात (ह्या) सल्ल्याचा तसा वेगळा उल्लेख नसला तरी महाराजांनी चिलखत घातले होते हे स्पष्टपणे समोर येतेच. 

भेटीच्या वेळी मारामारीस शिवाजी महाराजांनी आणि अफजलखानाने कोणती हत्यारे  वापरली ह्या विषयी (ऐतिहासिक साधनात) एकवाक्यता नाही.  सभासद बखरीत (१) अफजलखाना कडे जमदाड व महाराजांकडे वाघनखे व बिचवा, पोवाड्यात (२) अफजलखानाकडे कट्यार व महाराजांकडे वाघनखे व बिचवा, शिवभारतात (३) अफजल खानाकडे कट्यार आणि महाराजांकडे तलवार, तर जेधे शकावली-करीना (कुलवृत्तांत) (४) मधे महाराजांकडे वाघनखे असा उल्लेख आहे.

 

झालेल्या झटापटी विषयी सुद्धा "शिवभारत" आणि बखर वेगवेगळी माहिती देतात. कवी परमानंद लिहितो:   की खानाने मारलेली कट्यार महाराजांनीं पोट आकसून चुकवली, प्रतिहल्यात महाराजांनी खानाच्या पोटात तलवार आरपार घुसवली.  सभासद लिहतात: खानाने जमदाड चालवली, महाराजांना चिलखतामुळे इजा झाली नाही.  महाराजांनी चपळाईने डाव्या हातातील वाघनखे खानाच्या पोटात खुपसली (माऱ्याने चरबी बाहेर आली), व उजव्या हाताने बिचव्याचा मारा केला.

 

एरवी उपयोगी पडणारी ऐतिहासिक साधने (उदा. फारसी साधने) ह्या ठिकाणी निरुपयोगी ठरतात कारण, वृत्तांत सांगायला (ज्ञात इतिहासात) दुसऱ्या पक्षातील कोणीच शिल्लक राहिले नाही (कृष्णाजी भास्कर सोडून ?). 

 

काव्य/वृत्त सुलभ केलेले शब्द व इतर शब्दार्थ:

 

चढे हयानिशी - चढे घोडेनिशी - घोडयावरून न उतरताच
धास्त - धाशत - दहशत, भीणे
विराट नगरी - वाई
बखेड - बखेडा, तंटा
शरीरक - अंगरक्षक
सील - सील करणे, स्वसंरक्षणासाठी चिलखत घालणे
सला - तह
शेखिया- शेखी
जरी - जरीची कुडती, एक प्रकारचे चिलखत (जिराची म्हणजे लोखंडाची असावी, पण सभासद बखरीत "जरीची कुडती" असाच उल्लेख आहे.
दाड - जमदाड (यमदाढ) एक प्रकारचे तलवार वजा लांबीचे शस्त्र, ह्याचे पाते दुधारी असून नागमोडी आकारात वेडेवाकडे असते.
नखे - वाघनखे
बिचूव - बिचवा
गलाबला - गलबला, गोंधळ, कोलाहल
भांड - भांडे - तोफ
समाग्रज - सम अग्रज - दुर्योधन (सम हे  १०० पैकी एका कौरवाचे नाव, त्याचा अग्रज - मोठा भाऊ असा जो तो)

 

संदर्भ:

 

1) अनंत कृष्णाजी सभासद, सभासद बखर.
2) अज्ञानदास, अफजलखान वध (पोवाडा).
३) कवी परमानंद, शिवभारत.
४) जेधे शकावली-करीना, संपादन (डॉ. अ. रा. कुलकर्णी). 

 

शैलेश शंकर देशपांडे

26904701_10208947508078576_3587846141280

मी शैलेश देशपांडे. मूळचा साताऱ्याचा. गेली साधारण वीस वर्षं पुण्यात आणि तेवढीच वर्षं टाटा समूहाच्या टी आर डी डी सी ह्या संशोधन विभागात कार्यरत. विद्या वाचस्पती व पदव्योत्तर अभ्यासक्रम आय आय टी मुंबई मधून. जलरंगातील चित्रांची प्रदर्शने स्थानिक पातळीवर मधून अधून चालू असतात. निसर्गप्रेमी, डोंगर भटकंतीची विशेष आवड. शास्त्रीय आणि कलात्मक लिखाणाची व वाचनाची आवड. मामबो चा मार्च २०१७ पासून सभासद. 

bottom of page