top of page

 

ब ह र 

राजेश्वरी  किशोर 

मेघनाला आज सकाळी लवकरच जाग आली. खरंतर रात्री झोपतानाच तिने ठरवले होते. सकाळी उठायची अजिबात घाई करायची नाही. मस्तपैकी मऊ मऊ दुलईत कंटाळा येईपर्यंत लोळायचे. मोबाइल बघायचा नाही की घड्याळ बघायचे नाही. मोबाईलचा आवाज रात्रीच तिने बंद करून टाकला होता. कित्येक वर्षांपासून चाललेली धावपळ, टोलवाटोलवी आता तिला संपवायची होती. शांतपणे विचार करून आयुष्याचा मार्ग निवडायचा होता. तणावाचे जगणे आता सोडून द्यायचे होते. बाहेर पडायचे होते पण मार्ग सापडत नव्हता. आणि त्यासाठीच तिने चार वर्षे नोकरी करून काल राजीनामा दिला होता. दोन दिवस पूर्ण आराम करून मग विचार करावा असा साधा विचार तिच्या मनाने केला होता. पण..

शरीर थोडेच ऐकणार. त्याला तर रोजच्या धावपळीची सवय झाली होती. तिच्या प्रत्येक श्वासाला, प्रत्येक अवयवाला जणू मशीनच लावले होते. यंत्रवत सगळी कामे केली जात होती. तिचे मन त्या कामांना थांबवायचा प्रयत्न करीत होते पण शरीर ऐकत नव्हते. तिला गादीवर लोळायचा कंटाळा आला आणि ती उठून ब्रश करून सवयीने स्वयंपाकघरात गेली. मस्तपैकी आले घालून केलेला वाफाळता चहा तिने कपात ओतला. चहाची वाफ तिच्या नाकात गेली. क्षणभर डोळे बंद करून तिने तो वास मनात साठवून ठेवला. आवडत्या खिडकीशी ती जाऊन बसली. वर ढगाळलेले आकाश, जमिनीवर उगवलेले इवले इवले कोंब, कडूलिंबाच्या झाडाला फुटलेली हिरवट तपकिरी पालवी तिचे मन मोहरून टाकत होते. दोनतीन दिवस पाऊस पडून सगळी धरती धुवून निघाली होती जणू. तिच्या मनाप्रमाणेच सगळा परिसर जळमटे निघून स्वच्छ झालाय. अतिशय प्रसन्न मनाने तिने चहाचा कप तोंडाला लावला, पहिला घोट घेतला. आपसूकच तिचे डोळे बंद होऊन ‘आहाहा!’ उद्गार तिच्या तोंडातून बाहेर पडला. आज पहिल्यांदाच तिला इतके निवांत वाटत होते. डोके हलके वाटत होते. त्याला कारणही तसेच होते..

मागच्याच आठवड्यात मेघनाचा वाढदिवस झाला. ऑफिसमध्ये सर्वांनी अनपेक्षित आश्चर्य दिले होते. खरं तर इतक्या वर्षात तिने कोणालाच आपली जन्मतारीख सांगितली नव्हती. कळू दिली नव्हती. दोनतीन वेळा कोणी विचारायचा प्रयत्न केला तर ती तो विषय टाळायची. मग तिला फारसे कोणी विचारीत नसे. इतरांचा वाढदिवस असेल त्यादिवशी काहीतरी कारण काढून ती ऑफिसमधून लवकर पळायची. आताशा सगळ्यांना तिच्या या तुसड्या वागण्याची सवय होऊन गेली होती. घराबद्दल, जवळच्या कोणाबद्दलच मेघना काही बोलत नसे. हाती दिलेले काम मात्र मन लावून करत असे. त्यामुळे सगळेच तिला मान देत असत. अचानक एक दिवस तिच्या बॉसची बदली झाली. एक खडूस, खत्रुड बॉस निघून जातोय म्हणून ऑफिसमध्ये सर्वजण खुश झाले होते. महिन्याच्या एक तारखेपासून नवीन बॉस कामावर रुजू झाला.

 

“सर, सर, कोण पाहिजे तुम्हाला? कुणाला भेटायचे आहे का? आत्ता नाही भेटू शकत. अजून आमचे साहेब आले नाहीत. तुम्ही थोड्या वेळाने या.” फिकट गुलाबी रेघांचा शर्ट, त्याला साजेशी गडद रंगाची पॅंट आणि चकचकीत पॉलिश केलेले बूट घालून एक तिशीतला तरुण ऑफिसमध्ये शिरत असतांना प्रकाश चौकीदाराने त्याला अडवले होते. मनातल्या मनात स्मितहास्य करत गौतमने आपली ओळख सांगितली. हेच आपले नवीन साहेब कळताच प्रकाशचा तोंडाचा ‘आ' वासलेला बंद व्हायला जरा वेळच लागला. “नमस्ते सर, गुड मॉर्निंग सर." प्रकाश गडबडला. “चला मी तुम्हाला तुमची केबिन दाखवतो."

“नाही. आधी मला सगळ्यांशी ओळख करून घ्यायचीय. मगच मी माझी केबिन बघेन."

“ओके सर. सांगतो सगळ्यांना."

“तू नको सांगूस. तू तुझे काम कर. माझा मी जाईन प्रत्येकाजवळ.”

प्रकाश धास्तावून आपल्या जागेवर उभा राहिला. तसे ऑफिसमध्ये भरपूर काम असल्याने चहा, जेवणाच्या वेळेशिवाय कोणी कोणाशी फारसे बोलायला जात नसे. त्यामुळे प्रत्येकजण कामात गढलेला.

“हॅलो everybody. Good morning. मी गौतम तुमचा नवीन सहकारी आणि बॉस सुद्धा." सगळेजण काम सोडून वर बघत धडपडत उभे राहिले. कोणाच्या हातातून पेन पडले तर कोणाच्या टेबलवरचे कागद पडले. एकाचा तर पाण्याचा ग्लास पडला पण नशिबाने त्यात पाणी नव्हते. नेहमीची सवय, आपल्या टेबलावरची रिंग वाजली की बॉसच्या केबिनमध्ये जायचे. बॉस सांगेल ते काम करायचे. त्यांना कधी उठून आलेले बघितलेच नव्हते. फारच रुक्ष वातावरण होते ते. त्याची सवय झाल्याने, हसत हसत समोर उभा असलेला प्रसन्न चेहर्‍याचा, उठावदार रंगाचे कपडे घातलेला एक तरुण आपला बॉस म्हणून आला हे कित्येकांच्या पचनी पडत नव्हते.

“चला चला, आपापली ओळख करून द्या आता मला. आणि तुमच्या कामाचे स्वरूप देखील कळूद्या मला. म्हणजे मला माझे काम करायला सोपे जाईल.”

“मी समीर...  मी शिल्पा...  मी सागर...  मी गौरी...  मी.....” आणि सर्वात शेवटी “मी मेघना. आर्किटेक्ट.”

“मेघना? आर्किटेक्ट? बस इतकीच ओळख? पुढे काहीच नाही?”

“सर इथे काम करायला इतकेच पुरेसे आहे की."

“अस्स. बरं. बोलू या परत. कामाला लागा मित्रांनो. काही अडचण असेल तर या भेटायला."               

एक तिशीतला उत्साही, हसरा, उमदा तरुण आपल्या हुशारीवर कंपनीत एकदम इतक्या मोठ्या पदावर पोहोचलेला प्रथमच पहात होते सगळे. हळूहळू ऑफिसचे गढूळ वातावरण बदलू लागले. सगळ्यांना काम करायला स्फूर्ती येत होती. मोकळेपणाने एकमेकांशी संवाद होऊ लागला होत. अपवाद मात्र मेघनाचा होता. ती कामात कोणतीच कुचराई होऊ देत नव्हती. ‘आपले काम बरे की आपण बरे’ हे तिचे तत्व गौतमला पटत नव्हते. ‘नक्कीच कोणत्यातरी संकटाला सामोरी गेलेली, पोळलेली मुलगी असावी ही,’ असेच सारखे वाटायचे त्याला. ‘हिला बोलते कसे करावे? आनंदी कसे करावे?’ 

एक दिवस त्याने सगळ्यांची वैयक्तिक माहितीची फाइल मागवली. प्रत्येकाच्या घरचा पत्ता, अवलंबून असलेल्या व्यक्ती सगळे पहात गेला. त्याची नजर थबकली ती मेघनाच्या फाइलवर. घराचा पत्ता आणि जन्मतारीख सोडून काहीच माहिती त्याला त्यात दिसली नाही. जन्मतारीख मात्र लगेचच्याच पुढच्या आठवड्यातील बुधवारची होती.

वरिष्ठ पदावर काम करण्यापूर्वी झालेल्या प्रशिक्षणात मानवी नातेसंबंध कसे जपावेत याचेही प्रशिक्षण मिळाल्यामुळे गौतमने मेघनाला तिच्या वलयातून बाहेर काढायचे ठरवले. समीर, शिल्पा, सागरची मदत घेऊन मेघनाचा वाढदिवस साजरा करायचा गुप्तपणे कट रचला गेला. बुधवारी लवकरच येऊन सगळ्यांनी तयारी केली. केक आणला. तिचे टेबल सजवले. सगळेजण येऊन तिची वाट बघत राहिले. नेहमीच्यावेळी मेघना येऊन कामाला लागणार तोच सगळ्यांनी “Happy Birthday to you मेघना" म्हणत तिला आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या कित्येक वर्षात साजरा होत असलेला हा तिचा पहिलाच वाढदिवस होता. आजकाल तिला तिची जन्मतारीख देखील विसरायला झाली होती. लक्षात ठेवून तरी कोणाबरोबर साजरा करणार हा प्रश्नच होता. त्यापेक्षा उगवलेला प्रत्येक दिवस सारखाच समजायची ती. सर्वांच्या आग्रहाखातर तिने केक कापला. सगळ्यांनी दिलेल्या भेटवस्तू स्वीकारल्या. बाकीच्यांनी लाल गुलाबाची फुले तिला दिली पण गौतमने मात्र पिवळा टपोरा गुलाब लावून एक पुस्तक तिला भेट म्हणून दिले. आनंद की दुःख अशा दोलायमान स्थितीत ती काम संपवून घरी आली.

 

डब्यातून राहिलेला केक ती मोतीसाठी घेऊन आली होती. मोती आज खूप वर्षांनी केक आवडीने खात होता. अगदी लहानपणी कधीतरी त्याने त्याची चव बघितली होती. जिभेने केक चाटून त्याने मेघनाकडे ऊं ऊं करीत अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि पुन्हा आवडीने केक खायला सुरुवात केली. त्याचा तो कटाक्ष मेघनाचे काळीज चिरत गेला. तिचा बांध फुटला आणि ती ढसाढसा रडू लागली. खूप वेळ रडत राहिली मग आपोआपच डोळ्यातील अश्रू वाहून गेल्याची जाणीव झाली आणि ती शांत झाली. हे असं किती दिवस जगायचं? का जगायचं? कोणासाठी? कोणत्याच प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे नव्हती. जुन्या आठवणींनी मनात गर्दी करायला सुरुवात केली होती. गेले कित्येक वर्षे ती कटाक्षाने जुन्या आठवणींना दूर सारत आली होती.

 

तिला चौदा वर्षांपूर्वीचा तिचा वाढदिवस आठवला. सगळ्या मित्रमैत्रिणींना नवीन बंगल्यात बोलावून आई बाबांनी साजरा केलेला तो दिवस. तिच्याप्रमाणेच तिच्या घराला आनंदाचे उधाण आले होते. मित्रपरिवाराबरोबर, लहानग्या तिच्या भावाबरोबर उत्साहात तिचा खास दिवस साजरा केल्यावर दोनच दिवसांनी तिला गुरुकुलमध्ये रहायला जायचे होते. आई बाबांची लगबग सुरू होतीच. मेघनाला खाऊ, कपडे, अभ्यासाचे साहित्य, बिछाना सगळे काही आठवून आठवून एकेक भरले जात होते. नवीन शाळेत जायचे म्हणून मेघना थोडी घाबरलेलीच होती. पण शिक्षणाचे महत्त्व आणि शाळेतील हसत खेळत अभ्यास तिला खुणावत देखील होता. तिच्या लाडक्या मावशीकडून तिला या शाळेची माहिती कळली होती तेव्हापासून तिला या शाळेत जायची ओढ लागली होती. पाचगणीच्या शाळेत सामानासहित मेघनाला सोडून येतांना तिच्या आईचा पाय निघत नव्हता. ‘कशी राहील एकटी माझी बाहुली इथे?’ असा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. तिची ही अवस्था बघून मेघनाच्या वडिलांनी आपली गाडी महाबळेश्वरकडे वळवली. दोन दिवस महाबळेश्वरला निसर्गाच्या सान्निध्यात राहून मजा करून आईचे मन वळवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत राहिले. अखेर परत जाताना एकदा मेघनाला भेटून मगच परत आपल्या गावी जाऊ असा विश्वास त्यांनी दिला. तेव्हा कुठे आईचे मन थोडे शांत झाले. पण...

दैव काही वेगळेच सांगत होते. मनातले विचार, मुलीचा विरह, मुलाचे ताईबद्दलचे प्रश्न, बायकोची अस्वस्थता त्यांना त्यांच्या गाडी चालवण्यावरचा ताबा सुटायला पुरेसा झाला. समोरून येणार्‍या ट्रकला वाचवण्याच्या नादात गाडी जावळीच्या खोल दरीत भेलकांडत नाहीशी झाली. घनदाट जावळीच्या जंगलात काहीवेळाने फक्त आगीच्या ज्वाळा बाहेर येताना लोकांनी पाहिल्या. ट्रकवाल्याने तत्काल पोलिसांना बातमी दिली पण पोलिस पोहोचेपर्यंत गाडी बरोबरच तिघेही जळून खाक झाले होते. एक तर घनदाट जंगलात शोध घेणे कठीण होते. महाबळेश्वरचा चप्पा चप्पा शोधून झाला होता. हॉटेलमधील राहून गेलेल्या प्रत्येक प्रवाशाची माहिती घेतली गेली होती. पण नेमकी कोणती गाडी, कोणाची गाडी दरीत गेली ते कळायला वेळ लागत होता. कोणाचीच गायब झाल्याची तक्रार कुठल्याही पोलिस स्टेशनमध्ये आली नव्हती.

मेघना दोन दिवसांनी आई बाबा भेटणार, त्यांना शाळेतील गमती जमती सांगायच्या म्हणून उत्साहात वाट पहात होती. क्षणाक्षणाला तिची नजर शाळेच्या गेट कडे जात होती. दोनाचे चार दिवस झाले पण आई बाबा आले नाहीत म्हणून हिरमुसली झाली होती. घरी फोन करा म्हणून बाईंना विनवू लागली. अखेर बाईंनी घरी लॅंडलाइन नंबर फिरवला. एकदा, दोनदा, तीनदा.... दहादा...  पण रिंग वाजत होती आणि फोन कोणी उचलत नव्हते. दोन तीन दिवस गेले. कळायला काहीच मार्ग नव्हता. अखेर तिची अस्वस्थता बघून तिच्या पालकत्वाची जबाबदारी घेऊन एक शिक्षक तिला घेऊन तिच्या घरी आले. पाहतात तर काय, कंपाऊंडचे गेट उघडून आत जातांना कुंडीतली सगळी झाडं पाण्याविना सुकून गेलेली दिसत होती. मोठ्या झाडाचा पाचोळा आजूबाजूला पसरलेला. आठ दिवसात कोणीच इकडे आल्याच्या खुणा नव्हत्या. नाही म्हणायला घरचा पत्रांचा बॉक्स भरून गेला होता. मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. घराला कुलूप पाहून मेघनाला आपल्या भावना काबूत ठेवणे अवघड गेले आणि ती दारातच बसून मुसमुसायला लागली.

 

नवीन बंगल्यात रहायला येऊन जेमतेम पंधरा दिवसच झाले होते त्यामुळे आजूबाजूचे कोणीच ओळखीचे नव्हते. नाही म्हणायला घरात कामाला असलेली गंगू जवळच रहात होती. मेघना सरांना घेऊन गंगू कडे गेली. मेघनाला लगेचच आलेली पाहून गंगूला वाटले की शाळा आवडली नाही म्हणून मेघनाला घेऊन परत सगळे घरी आले. परिस्थितीचे गांभीर्य गंगूला कळायला वेळ जावा लागला. आता काय करायचे? कोणाला सांगायचे? ना कोणाचा फोन नंबर माहीत ना पत्ता. घरातला फोन मात्र सारखा वाजत होता. बाबांचे ऑफिसचे पण सारखे फोन येत असतील. इतके दिवस कधीच कुठे न सांगता जात नाहीत. आता कुठे असतील? अखेर संध्याकाळ होऊ लागली. सरांनी पोलिसांना सांगून दरवाज्याचे कुलूप तोडायला लावले. दार उघडताच मावशीचा, काकांचा फोन आला. हकीकत कळताच दोघेही घरी पोहोचले. विचारविनिमय करून पोलिसात तिघांच्या गायब झाल्याची तक्रार नोंदवली गेली. ‘पोलिस त्यांचे काम करतील. आपण शाळेत परत जाऊ’, म्हणून सर मेघनाला घेऊन शाळेत परतले. दिवसामागे दिवस जात होते. पण तिघांचा पत्ता काही लागत नव्हता. मेघनाच्या गाडीचा घरातील फोटो ट्रक ड्रायव्हरला दाखवून गाडीची खात्री करून घेतली. अखेर गाडी पेटल्यामुळे तिघांचा अंत झाल्याचे निष्पन्न झाले.

त्या दिवसापासून मेघना एकदम शांत झाली. तिचे बालमन तो धक्का पचवू शकले नव्हते. रात्री डोळ्यातल्या पाण्याने उशी ओली झाली की कधीतरी झोप लागत असे. तिला शाळेत सोडून जातानाचे, “खूप शिकून मोठी हो बेटा” हे बाबांचे बोल तिला जगण्याची उम्मीद देत होते. “पिलु, सांभाळून रहा हं. कोणाची खोडी काढून कोणाला दुखवू नकोस बरं." हे आईचे मायेचे बोल आणि आईने मारलेल्या मिठीची ऊब तिला आठवत रहायची. हळू हळू गुरुकुलातील प्रेमळ वातावरणात मेघना रुळायला लागली. बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि आर्किटेक्चर कॉलेजला प्रवेश घेतला. वयाच्या मानाने खूपच विचारी, समजूतदार असल्याने मेघनाने शिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण केले. लवकरच तिच्याच गावात एका मोठ्या कंपनीत जुनियर आर्किटेक्ट म्हणून कामाला सुरुवात केली.

 

आता तिचे हॉस्टेलचे दिवस संपले होते. हॉस्टेलमध्ये दिवसरात्र मैत्रिणी सोबतीला असायच्या त्यामुळे एकटेपणा जाणवत नव्हता. नोकरी लागल्यावर आपला, बाबांनी बांधलेला बंगला उघडून तिथे रहायला तिने सुरुवात केली होती. दिवस कसाही कामात जायचा पण संध्याकाळी घरी आली की एकाकीपणा जाणवायचा. जुने दिवस अस्वस्थ करायचे. हळू हळू मेघना जास्तच एकलकोंडी होऊ लागली होती. तिला कशातच रस वाटत नव्हता. ‘आपले काम बरे की आपण बरे’ असे वाटत राहायचे. गंगू मोलकरीण आता थोडी थकली होती पण जुनी माया आठवून तिच्याकडे कामाला येईन म्हणाली. इतक्या दिवसांपासून तिनेच मोतीला, तिच्या कुत्र्याला सांभाळले होते. गंगू आता एकटीच राहिली होती. तिची झोपडी देखील मोडकळीस आली होती. मेघनाने तिला बंगल्यातलीच मागची खोली रहायला दिली होती. गंगू बंगल्यातली साफसफाई करायची आणि जेवण बनवायची.

चार वर्षे अशीच कामात गेली. मेघना दिवसा घरात असली की, बागेत फेरफटका मारून झाडे वेलींशी गप्पा मारायची. त्यांची प्रेमाने हात फिरवून विचारपूस करायची. जोडीला तिचा सहाय्यक मोती असायचाच. तो तिला कधीच एकटे ठेवायचा नाही. सगळं ठीक सुरू होते आणि अचानक तिच्या ऑफिसमध्ये गौतमने प्रवेश केला. का कोण जाणे तिच्या काळजात एक ठोका वाढलाच. प्रयत्नपूर्वक ती गौतमशी बोलणे टाळायची. त्याचे जवळीक साधणे तिला, तिच्या अंतर्मुख मनाला पटत नव्हते पण एकीकडे थोडेसे वेगळे पण वाटत होते. नाती, मित्र यांच्यापासून ती हेतुपूरस्सर दूर रहायची. तिला आपले रडगाणे ऐकून कोणी कीव केलेली आवडत नव्हती. कधीतरी तिला भेटायला मावशी काका येत असत. ते दोन दिवस तिला थोडे बरे जात असत.

 

बुधवारी तिचा वाढदिवस गौतमच्या सांगण्यावरून केला कळल्यावर तिला आजिबात आता त्या ऑफिसमध्ये रहायचे नव्हते. पण नाइलाजाने जात राहिली. शनिवारी सुट्टी होती म्हणून, नक्की कसले पुस्तक दिले आहे गौतमने ते पाहू या तरी म्हणून तिने त्यावरचे वाळलेले फूल अलगद बाजूला करून पुस्तक उघडले. पहिले पान वाचले.. दुसरे वाचले.. आणि वाचतच गेली.. गौतमने अंदाजे विचार करून एक आदर्श पुस्तक भेट दिले होते. पुस्तकातील एकेक घटना अलगद तिच्या मनावरचे मळभ दूर करीत गेल्या. एका बैठकीत तिने ते पुस्तक वाचून काढले. पुन्हा पुन्हा वाचत राहिली. दोन दिवसात किमान चारवेळा तरी ते पुस्तक वाचून काढले. पुस्तकातील कथेतील छोटा मुलगा आनंद, त्याच्यावर ओढवलेले वाईट प्रसंग, त्यातून त्याने शोधलेले मार्ग वाचता वाचता मेघनाला आपल्याच आयुष्याचा नवीन मार्ग दिसत राहिला. चुंबकाप्रमाणे ती पुन्हा पुन्हा छोट्या आनंदावर बेतलेल्या प्रसंगांची उजळणी करीत रहायची आणि त्याच्या साहसाचे कौतुक. त्यानंतर तिला तिचे आयुष्य अगदीच सरधोपट वाटायला लागले. काहीतरी नवीन करायची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती.

आणि एक दिवस पुढचा मागचा विचार न करता ती सरळ राजीनामा देऊन घरात बसली होती. कितीक वेळ झाला असेल. हातातला कप आणि कपातला चहा गार होऊन गेला होता. मेघनाची नजर खिडकीबाहेर होतीच पण नजरेत इतक्या वेळात गेली चौदा वर्षे तरळून गेली होती. केव्हापासून दाराची बेल वाजत होती, तिला ती ऐकू येत नव्हती. गंगूने हातातले काम सोडून दार उघडले. दारात मावशी काका उभे.

“का ग? मेघना, बरी आहेस ना? नाही आज कामाला गेली नाहीस म्हणून विचारले."

“मावशी मला आता काम करायचाच कंटाळा आलाय. कोणासाठी काम करू? मस्त आराम करून मला माझा आनंद शोधायचाय.”

“कोण आनंद ग? एखादा मुलगा बघितलास की काय? आम्हाला तरी दाखव."

“नाही ग. मुलगा नाही कोणी. जीवनातला आनंद. जगण्यातली मजा. सुखासीन आयुष्य म्हणजे काय याचा अनुभव घ्यावा म्हणतेय. खूप वर्षे तणावाखाली काढली. निष्पन्न काहीच झाले नाही ग. गेलेले आई बाबा परत भेटण्याच्या आशेवर जगत राहिले. कुढत राहिले. आता बास. आनंदी राहायचे मला. पण जमेल का ग मला असे बहरायला?”

“कोणाची तरी साथ असेल तर फुलशील बघ हवी तशी. भेटलय का कोणी तसे?”

“नाही ग. असे काहीच नाही."

“बेल वाजते आहे बघ कोण आलय ते.”

मेघना दरवाजा उघडते. समोर गौतम दारात उभा. “सर, तुम्ही इथे?”

“हो. काय करणार? तू राजीनामा देऊन अशी इथे घरात बसलीस. विचार केला, बघू या. कारण तरी काय आहे तुझ्या राजीनाम्याचे? माझे वागणे काही चुकले का? तुला काही खटकले का?”

“नाही हो सर. तुमच्या या पुस्तकातील आनंदने मला असे करावयास भाग पाडले."

“मेघना, तुला एक सांगू? गेले दहा मिंनिटांपासून मी बाहेर उभा राहून तुमच्या गप्पा ऐकतोय. मावशी नमस्कार. मी गौतम, मेघनाचा बॉस."

“नमस्कार गौतम, बसा ना."

“मावशी, माझी कथा देखील मेघना पेक्षा काही वेगळी नाही. मी मेघनाला भेट म्हणून दिलेल्या पुस्तकातला आनंद माझ्या अगदी जवळचा वाटतो मला. त्यानेच मला आयुष्य कसं जगायचं, दुःखे कशी विरघळून टाकायची ते शिकवले. माझ्या अंगातच भिनलाय जणू तो आनंद आणि त्यामुळेच मी आताशा नेहमीच आशावादी आणि उत्साही दिसतो. मी पहिल्यांदा जेव्हा मेघनाला बघितले ना त्याचवेळी माझ्या लक्षात आले की आपल्यासारखेच मेघनाला सुद्धा या आनंदाची गरज आहे. पण प्रश्न पडला की तिला ते पुस्तक कोणत्या निमित्ताने द्यावे? आणि नशीब बघा कसे असते. त्याचवेळी तिचा वाढदिवस यावा न मला तिला ते पुस्तक भेट देता यावे.”

“गौतम तुम्ही अगदी योग्यवेळी भेटत आहात एकमेकांना. मेघनाची आता आम्हाला काळजी वाटणार नाही. गेल्या चौदा वर्षांपासून आम्हाला मेघनाची खूप काळजी वाटायची. खरे तर तिला भेटून घरी गेलो की आमची अस्वस्थता जास्तच वाढायची. कसे समजावायचे या मुलीला हा प्रश्न नेहमीच सतावत रहायचा. पण आता तुम्ही भेटलात आणि आमची चिंता मिटली असेच वाटते.”

“मावशी, मी अजून मेघनाचा राजीनामा स्वीकारला नाहीये. तिला काही दिवस घरी राहून स्वतःला गोशातून बाहेर काढायचे असेल तर राहू दे. तिला थोडा वेळ द्या. दुःख नेहमीच अकस्मात येते पण सुख शोधावे लागते. त्यासाठी स्वतःला सुखाकडे झोकून द्यावे लागते. तिला एकदम तिच्या नेहमीच्या बांधील स्वभावातून बाहेर पडणे शक्य होणार नाही पण ती प्रयत्न करत आहे तर आपण तिला सहकार्य करू ना. आहे का तयारी तुमची?”

“हो गौतम. पटले तुमचे म्हणणे. काय करूया आता ते सांगा तुम्हीच."

“मेघना, तुला काय वाटते? काय करायचेय?”

“मला ना आता असे जाणवते की.... त्या खिडकीबाहेरच्या जलधारा मला खुणावत आहेत. आम्ही  तुझ्याभेटीसाठी आलोय. तू लवकर बाहेर ये. तुला अंतर्बाह्य भिजवून कोरं करायचेय... एक नवीन आयुष्य रेखाटण्यासाठी. येऊ देत नवीन कोंब. येऊ देत नवा बहर. फुलत रहा.. उमलत रहा..”

राजेश्वरी  किशोर 

Rajeshwari_Kishor.png

सहा सात वर्षांपासून मनातले कागदावर उतरायची सवय लागली होती. पण त्याला फारशी प्रसिद्धी मिळावी म्हणून प्रयत्न केले नव्हते. दोन वर्षांपूर्वी ‘मामबो' मध्ये सामील झाल्यानंतर लिखाणाला गती येऊ लागली. विशेषतः लेखावर मिळालेल्या प्रतिक्रिया वाचून लिहिण्यासाठी ऊर्जा मिळत गेली. आत्तापर्यंत सकाळ पेपर मध्ये दोन लेख आणि साप्ताहिक सकाळ मध्ये एक मुलाखत छापून आली. सध्या ‘निकोबार बेटं' या भारतातीलच पण  बर्‍याचजणांना अनभिज्ञ असलेल्या बेटांबद्दल आणि बहुतेक मराठीतील पहिल्या पुस्तकाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहे. नवरा संरक्षण खात्यात मुलकी अधिकारी असल्याने बदलीच्या निमित्ताने भारतभर भ्रमंती होत असते. प्रत्येक ठिकाणचे रीतिरिवाज, अनुभव गाठीशी येत असल्याने माझे जास्त लिखाण त्या अनुभवांवरच होत असते. सध्या वास्तव्य पुण्यात आहे.  

bottom of page