top of page

 

स्व दे श  

 

लेखक: प्रिया साठे 

चित्र: शैलेश देशपांडे 

मी बारा गावचं पाणी प्यायलेली आहे. म्हणजे तशी मोजली तर आणखी छत्तीसएक गावं/शहरं असतील पण वास्तव्य म्हणाल तर बारा गावं झाली. जन्मल्यापासून माझ्या पायाला भिंगरीच लागलेली होती. वडील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये होते त्यामुळे त्यांची दर अडीच तीन वर्षांनी भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात बदली व्हायची. दर तीन वर्षांनी नवीन शहर, नवीन घर, नवीन शेजारी, नवीन शाळा, नवीन मित्रमैत्रिणी, सगळंच नवीन. बदली झाल्यावर पहिलं वर्ष त्या नव्या ठिकाणी रुजण्यात जायचं आणि दुसऱ्या वर्षी जरा फांद्या पसरुन स्थिरस्थावर झालं की तिसऱ्या वर्षी तिथून उपटून दुसरीकडे! 

 

लग्न होऊन अमेरिकेला गेले तर तिथे नवऱ्यालाही माझा संसर्ग झाला आणि वर्षभरातच त्याला दुसऱ्या शहरात स्थलांतर करायची वेळ आली. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत हे चालूच राहिलं. ठिकाण बदलण्याची, जुनं मनात साठवून नव्याला आपलंसं करण्याची जणू सवयच झाली होती. प्रत्येक गाव मला थोडं बदलायचं आणि ते सोडून जाईपर्यंत तेही माझ्यासाठी बदललेलं असायचं. ह्या सवयीमुळे सात वर्ष अमेरिकेत राहून जेव्हा कायमचं भारतात यायचा निर्णय घेतला तेव्हा त्याचं काहीच विशेष वाटलं नाही मला. मी तर वाटच बघत होते मायदेशी परतण्याची. अमेरिकेत खूप चांगले लोक भेटले, खूप सुंदर अनुभव आले, तसं पाहिलं तर आम्ही छान रुळलो होतो तिथे पण तो देश मला कधी 'माझा' वाटला नाही. आपण भारतीय आहोत आणि इथे कितीही वर्ष राहिलो तरी इथले होऊ शकणार नाही ही भावना मनातून काहीही केल्या जात नव्हती. 'आपले' सगळे लोक तिकडेच आहेत आणि त्यांच्या जवळ आपणही असायला हवं हे डोक्यात फिट्ट बसलं होतं. शिवाय मुलीचा जन्म झाल्यावर तिला भारतातच वाढवायची इच्छा होती. परतलो तर ती दोन तीन वर्षांची असेपर्यंत नाहीतर नाही असं आधीच ठरवलं होतं. तिला थोडं समजायला लागल्यावर तिला जरा जड गेलं असतं भारतात जाऊन कायमचं राहायला असं वाटायचं. त्यामुळे भारतात परतण्याची पहिली संधी मिळाल्या मिळाल्या लगेच ठरवलं की जायचं आता परत. 

 

ओळखीच्या बऱ्याच लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं, आम्ही आता भारतात परत जाऊन राहू शकणार नाही, वैतागून परत येऊ त्यामुळे सामान स्टोरेजमध्ये टाकून जावं असा सल्ला अनेकांनी दिला. नवरा चौदा आणि मी सात वर्ष तिकडे राहिलो होतो, तिथे उच्च शिक्षण झालं होतं, उत्तम नोकऱ्या होत्या त्यामुळे आता परत भारतात रमणं अशक्य आहे असं काहींनी सांगितलं. तिथलं सगळं वेगळं आहे, वर्क कल्चरही झेपण्यासारखं नाही असंही सांगत होते लोक. मला गंमतच वाटायची. लहानाचे मोठे ज्या देशात झालो तिथे न रुळायला झालंय काय? दर वर्षी जायचो तेव्हा तर कधी वाटलं नाही की फार बदल झालाय किंवा तिथे राहणं अवघड आहे! आईवडील, सासू सासरे आणि भावंडांना विचारलं तेव्हा संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. शेवटी निर्णय आम्हीच घ्यायचा होता आणि तो आम्ही घेतलाच. 

जन्मभर आधी कधीच न बघितलेल्या शहरात जाऊन रुजण्याचा सराव असताना परिचयाच्या आणि 'आपल्या' भारतातल्या मातीत रुजायला वेळ लागणार नाही अशी नुसती आशा नाही तर खात्रीच होती. इथल्या पाण्याची, हवेची, तापमानाची, वातावरणाची सवयच होती की! इथल्या मातीत तर आमची मुळं होती, इथेच तर आमची रोपटी वाढली होती. पण दुरून डोंगर साजरे असतात तसा दुरून भारत रम्य असतो ह्याची इकडे आल्यावर लगेचच जाणीव झाली. सुरुवातीचे दिवस रोज नवीन आव्हान घेऊन उजाडायचे. अमेरिकेत नुसता एक फोन केल्यावर होणाऱ्या कामांसाठी इथे शंभरवेळा खेपा घालाव्या लागत होत्या. गॅस सिलिंडर, केबल टीव्ही, लँडलाईन फोन ते इंटरनेट कनेक्शनपर्यंत काहीही मिळवायला पन्नास प्रकारचे फॉर्म, पुरावे, फोटो, ऑफिसेस अशी वरात काढल्यावर दिरंगाई सोसावी लागत होती. वीज जाणे, पाणी जाणे, फसवणूक होणे, अस्वच्छता, अप्रामाणिकपणा, अशा प्रकारांची आता सवय मोडली आहे असंही लक्षात आलं. ह्या सगळ्यातून वाट काढत थोडं बस्तान बसलं. मुंबईत धाकट्या बहिणीचं घर अगदी जवळ होतं आणि तिचा आणि तिच्या सासूबाईंचा सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रचंड आधार होता. नवऱ्याची सतत फिरती असलेली नोकरी आणि दीड वर्षाची मुलगी असल्याने तेव्हा त्या आधाराची अतोनात आवश्यकताही होती. 

 

आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपण लांब असलो की आपल्याला खूप जास्त ओढ वाटते सगळ्यांची. "आपण तिकडे सर्वांमध्ये असायला हवं होतं" असं सतत वाटत राहतं. इथे सर्वांमध्ये आल्यावर कधीकधी जाणवतं की सर्व स्वतःमध्ये गुंतलेले आहेत. अमेरिकेत रहात असताना सुट्टीसाठी भारतात आलं की सगळी मंडळी अवतीभोवती फिरत असतात आपण एखादं व्ही.आय.पी असल्यासारखं. आपण कायमचे आल्यावर ते चित्र अर्थातच बदलतं आणि ते साहजिकही आहे. पण ते चित्र आपल्या कल्पनेपेक्षा थोडं जास्तच बदलतं. कल्पना आणि सत्य ह्यातली दरी जास्त खोल होते. बरेच वेळा असंही जाणवलं की लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून गेला आहे. "परदेशात" राहून आलेल्या लोकांकडे बघण्यासाठी एक वेगळा चष्मा मिळत असावा इथे. तुम्हाला तिथलं वारं लागल्यामुळे तुम्ही अमुक एक प्रकारे वागत असाल, तुमच्यात आता बराच बदल झालेला असेल, तुमचा ऍटीट्यूडच वेगळा असेल असं गृहीत धरलं जातं. हा पूर्वग्रह काढायला तारेवरची कसरत करावी लागली.

 

अमेरिकेत राहताना सर्वच प्रकारच्या स्वातंत्र्याची सवय झालेली असते. भारतात आल्यावर ते स्वातंत्र्य काही प्रमाणात कमी झालं. रोजच्या आयुष्यातले निर्णय घेतानाही त्याचं समर्थन करायची उगाचच गरज वाटायची. प्रत्येक लहान गोष्टीसाठी सतत कुणाला तरी उत्तरदायी असण्याचा डोक्यावर नकळत भार असायचा. मला तर "फिशबोल"मध्ये राहिल्या सारखं वाटायचं कधीकधी. जणूकाही चोहीकडून लोक लक्ष ठेवून आहेत की कधी चूक होते आणि कधी त्यांना काही म्हणायची संधी मिळते. 

 

नवीन ठिकाणची सवय व्हायला, त्याने आपल्याला आपलं मानायला दोन वर्ष लागतात असा लहानपणापासूनचा अनेकवेळा आलेला अनुभव होताच. भारत आमच्यासाठी नवीन नसूनही तेवढाच अवधी लागला. अखेर आमच्या मुळांनी परत एकदा इथल्या मातीत घट्ट पकड घेतली आणि आम्ही आमच्या पूर्वीच्या वाफ्यात रुळलो. एकोणीस वर्ष झाली आता परत येऊन. अमेरिका सोडून आलो हे बरोबर केलं की चूक हे सापेक्ष आहे, पण आमच्या मते आम्ही योग्यच निर्णय घेतला. ज्या कारणांमुळे घेतला ती मात्र थोडी मागेच पडली हे नक्की. 

प्रिया साठे

priya sathe.jpg

पुण्यात वास्तव्य. लहानपणी इंग्लिश आणि हिंदीमध्ये छंद म्हणून लिहिलं जायचं. काही वर्षांपूर्वी कवितांचा ब्लॉगही सुरू केला. वॉटरकलरमधले आघाडीचे कलाकार मिलिंद मुळीक यांच्याबरोबर एक पुस्तक लिहायची संधी मिळाली. दुसऱ्या पुस्तकावर सध्या काम चालू आहे. मामबोची सभासद झाल्यापासून मराठीत लिहायचं पहिल्यांदा धाडस केलं आणि आता मराठीत लिहायलाच सर्वात जास्त आवडू लागलं आहे. टॅक्स आकाऊंटिंगचं शिक्षण घेऊन सी.पी.ए. झाल्यावर काही वर्ष प्राईस वॉटरहाऊस कूपर्समध्ये नोकरी केली. आता फक्त भावनांचा हिशोब शब्दांत मांडते.

bottom of page