top of page

 

मागील पानावरुन 

मग नवाच डाव, थेट अमेरिका गाठली! एरी लेकच्या काठावर दूरवर कोणी भारतीय नसलेल्या छोट्या गावात गेलो,ओहायोला. अख्या गावात एक आठवड्यातून तीन दिवस उघडणारे भारतीय वाणसामानाचे दुकान. बाकी काहीच नाही! इथे मी लपू किंवा लपवू शकत नव्हते माझं बोर्नव्हिटापण ...तरी मी तशीच इरेला पेटलेली... इथला अर्ध्या वर्षाचा हिवाळा आणि बर्फ तसा पथ्यावर पडला... मी इथे रुजणे शक्यच नव्हते!

मी इथे लपलेलीच राहिले. जरा मैत्र रुजू लागलं ओहायोत आणि तडकाफडकी मला संधी मिळाली बॉस्टनला निसटून जायची! पुन्हा सगळी बांधाबांध आणि आवराआवर...तोवर मी अमेरिकेतली साधारण १७ राज्य बघून घेतली होती... म्हणजे एका वर्षात मी किती ट्रिपा करून घेतल्या हा हिशेब मांडा. त्यामुळे शेजाऱ्यांसाठी मी होते आणि नव्हते पण. बॉस्टन गाठलं ऐन हिवाळ्यात आणि बर्फ वितळायच्या आतच मी पावणेतीन वर्षांच्या लेकीला घेऊन जर्मनीला एकटीच रवाना झाले. तिथून भारतात आणि पुण्यात परतले. एक खोल श्वास घेतला खरा, तरी आता मी पुण्याची देखील राहिले नव्हते. मी मुंबई पुण्यात फिरत राहिले, अनोळखी तरी ओळखीच्या जागांना भेटून आले, येत राहिले, तरी आता देखील प्रत्येक जागेसाठी मी अनोळखी, धूसर अशीच होते. आयुष्याची सात वर्ष सरली होती तरी हा शिरा पुरीचा खेळ अजून सुरूच होता!

pjimage (5).jpg

बॉस्टन, क्लीव्हलँड, पिट्सबर्ग येथील घरं 

 

दीड वर्ष पुण्यात राहिले, दुसऱ्यांदा मातृत्व अनुभवलं आणि पाच वर्षाखालील  दोन लेकींना घेऊन पुन्हा अमेरिका गाठली , पाऊल ठेवलं तेच मुळी निराळ्या राज्यात, भलत्याच शहरात! पिट्सबर्गहुन तीस एक मैलावर असलेले अतिशय फाटके शहर! आमच्या घराच्या प्रत्येक खोलीतून स्मशान दिसे! संध्याकाळी काजवे बघायला मुलींना घेऊन फेरफटका मारायला ही निवांत बाग होती जणू! पुन्हा मी अंधुक, धुक्यासारखी आणि अधांतरी!

बॉस्टनच्या एका हिमवादळात मात्र काहीतरी बदललं होतं....जीवावर बेतेल असे वाटल्यावर एक क्षण खोल गात्रांपर्यंत गहिवरणारी भीती जाणवली! जर इथे मेलो तर ओळखणार कोण आहे आपल्याला? मराठी बोलणारी लेक जेव्हा विचारते मावशी म्हणजे कोण? काका कोणाला म्हणतात? टीव्ही काय असतो? वर्तमानपत्र काय असते? तेव्हा समजलं की काय विचित्र खेळ आरंभला आहे आपण! सुरवात हेक्याने केली खरी तरी शेवट कोण आणि कसा करणार होते कोणास ठाऊक! पिट्सबर्गमध्ये गणपती आले आणि सरले, तेव्हा घरातला शुकशुकाट अगदी अंगावर येऊन गेला...डोक्यात पुण्याचे मानाचे गणपती फेर धरू लागले...दिवसरात्र आरत्या आठवत राहिल्या...आणि काही रात्री लेकीला चक्क अर्थवशीर्ष पुटपुटत झोपवले! लघुरुद्र करावे का? का सत्यनारायण? मला रुपालीतली कॉफी हवीच होती आणि पर्वतीपायथ्यापासून उलटे चालून तळजाईला जायचे होते...मला पुन्हा रुजायचे होते पण आता लक्षात आले की माझ्या मुळांना मी इतके आक्रसून करकचून बांधून घातले आहे, पुण्याची मूठभर माती, टीचभर माज आणि फाजील आत्मविश्वास ओतून, त्यावर उगीच मैत्रीचा शिडकावा घालून ह्या नादिष्टपणाच्या गोणपाठात स्वतःला कोंबून बांधून घातले आहे...गेली आठ वर्ष!!!

पुढचे सहा एक महिने मला झपाटले होते, एकाच हेक्याने, मला आता परत कुठेतरी रुजायचे होते...मला माझी हक्काची माती हवी होती, हक्काची नाती हवी होती...आभासी जगातले आवाज आणि निळे नाचरे अंगठे मला अजिबात पुरवठी पडत नव्हते...मला माझे गणगोत हवे होते! माझं असं सेटिंग असलेला, छोट्या मंदिरातला, अगदी कम्युनिस्ट भासावा असा बाप्पा हवा होता! मी काहीही न मागता मला शांतपण आणि सद्बुद्धी देणारा! मला प्रत्येक ऋतूत बदलणारी सृष्टी हवी होती  आणि एकांत भेदून उब देणारा हिवाळा हवा होता! मी चाचपणी करायचे आरंभले! महिनाभर न्यू जर्सी, डॅलस, ऑस्टिन, शिकागो, कोलोरॅडो, कॅलिफोर्निया आणि सरतेशेवटी ओहायो...सगळे आजमावून बघितले! एक दिवस पुन्हा पिट्सबर्ग विमानतळावर उतरताना डोक्यात अटलांटा शिरले आणि इथे आले! तीन महिने एक एक करत वीकएंड इथे एकटीच येऊन राहिले...आणि इथे एकदम शांत वाटले! अगदी पुण्यातल्या नाही तर पुण्याजवळच्या माझ्या गावी, निगडीला वाटते तसे शांत! घर भाड्याने घेतलंच नाही, सरळ विकत घेऊन धाडदिशी खड्डा खणून घेतला आर्थिक, सामाजिक आणि एकंदरच!

My Post (11).jpg

सध्याचे अटलांटा येथील राहते घर 

 

गेली  दोन वर्ष, जिवाच्या आकांताने इथे रुजू पाहत आहे...बागेत मोगरा मरवा लावून, कडुनिंब, डाळिंब लावून! कढीपत्त्याच्या झाडाला पातळ आंबूस ताक घालून वाढवत आहे! घरात सकाळी पुणे आकाशवाणी जशी जेवढी आठवेल तशी अवतरत आहे, गाण्यांच्या रूपाने, भक्तिगीतांतून आणि अभंगवाणीतून...देव्हारा आता सजला आहे, देव डब्यातून एकदाचे देव्हाऱ्यात विराजमान झाले आहेत...अबोली हातावर विणून घेते आहे अनेक वर्षांनी  आणि उन्हाळ्यात कोल्हापुरी घालून गाडीत उगी माज करत आहे! हळूहळूच नवीन मैत्री दारापाशी येते तेव्हा दार उघडून तिला घरात घेते आहे आणि शेजारणीला घरातले नवे पदार्थ, विरजण पोचते करत आहे! लेकींना आमच्याच गल्लीत सायकल शिकवताना कौतुकाने बघणाऱ्या म्हाताऱ्या जोडप्याला हात हलवून दाखवत आहे आणि इथली होत आहे. हळूहळू अटलांटाचे रस्ते, वळणं आणि गल्लीबोळ परिचित होऊ लागले आहेत. इथल्या कचरागाडीचे लोक ओळखीचे होऊ लागले आहेत....मी इथे स्वतःला रुजवते आहे, इथल्या वस्तीत मी हळूहळू रुजते आहे!

 

आता मला वेध लागले आहेत मागल्या दारी चाफा, केळ आणि पीच लावण्याचे...ती झाडे गर्भार होऊन, त्यांची फळं लेकींनी खावीत...इथे आमचं कुत्रं असावं किंवा दोन मांजरी चालतील...अगदी पुण्याला सात मांजरी होत्या तेवढ्या नको तरी दोन ठीक आहेत ...लॉकरचे दागिने आणावे का आता इथे? आणि लग्नातल्या साड्या? आईच्या कपाटात मिटून राहिलेली पैठणी तरी आणावी म्हणते ह्या खेपेत...लेकींचे नवे पैंजण इथूनच घ्यावे का आता? इथली एक मैत्रीण छान विठ्ठलाची मूर्ती देणार आहे, घरातला एक कोनाडा नव्याने उजळेल वाटतो...आणि इथल्या घराच्या दोन भिंती चितारून झाल्या आहेत,आता हे फिरंगाचे घर वाटत नाही, माझाच म्याडछाप वाडा भासतोय...इथल्या मित्र मैत्रिणींच्या घरून गप्पांची भूक भागवून येते मी  आताशा...इथल्या उन्हाळ्याच्या कळा आणि झळा सुपरिचित झाल्या आहेत...कोणत्या दिवसात पट्ट्यांच्या चपला घालून उन्हात जायचं नाही ते पक्के उमगले आहे! इथल्या ग्रंथालयातली पुस्तकं वाचून संपत अली आहेत...दुकानाच्या रांगेत लोक ओळखीचे हसू फाकतात आता . डॉक्टर लेकींना नावांनी ओळखतात आणि मुलींनी गेली दोन वर्ष चक्क एकाच जागी वाढदिवस साजरा केला आहे! तेच थोडे मोठे झालेले चेहरे घरी येऊन खिदळून दोन वर्ष वाढदिवसाचे केक खाऊन गेले आहेत ...रुजले की काय इथे?

 

इथल्या गणपतीत गेली दोन वर्ष नाच सादर करत आहे, झाले का काय इथली आता? पुन्हा ओळख ठाशीव होऊ लागली आहे, पुन्हा धुक्यातून बाहेर येऊन माझी ओळख दृढ होते आहे... मी पुन्हा नव्याने घडत आहे, उलगडत आहे! मी इथल्या मातीत रुटबॉल सारखी मिटून आले होते, आता एवढ्या मोठ्या खड्ड्यात बसून, मी ओळखीच्या मातीतून बाहेर निघून सर्वत्र माझ्या नव्या जाणिवांची, संवेदनांची मुळे खुपसून वाढत आहे, रुजत आहे. मी स्वतःच्या गोणपाटाच्या गुंडाळीतून मुक्त होऊन रुजले आहे, एकवटलेल्या मूळांपाशी असलेली जुन्या संस्कारांची, विचारांची माती सोडून, नव्या अस्तित्वाच्या नव्याच काळपट लाल मातीशी हातमिळवणी करत, घट्ट उभी राहत आहे. मी पुन्हा एका दशकानंतर स्वच्छेने रुजत आहे. एका गावात, तिथल्या मातीत भिनत, इथला वारा मनात भिनवत, इथल्या देशीच्या नव्या कविता नव्याच सुरावटीत मांडत, मी इथली होत आहे...

माझा प्राजक्त आता अटलांटाच्या मातीत छान उभारला आहे, रुजला आहे. आता किती रात्री गंधाळत आणि किती पहाट सडे आंथरत हा इथेच उभा राहणार आहे...ते माझ्या मंत्रचाळी, अधीर मनालाच ठाऊक...

अंगणातल्या पीचला फुले आली की जर गहिवरून आले तर राहीन कदाचित त्या मोहात गुरफटून...

प्राजक्ता पाडगावकर

PP.jpg

कमिंग अटलांटा येते वास्तव्य. रियल इस्टेट क्षेत्रात कार्यरत. गेली पाच वर्षे विविध वर्तमानपत्रे, मासिके ह्यात सातत्याने लिखाण. प्रवास, छायाचित्रकला, चित्रकला अशा विविध गोष्टींमध्ये स्वारस्य. सहा भाषांत पारंगत. त्यावरील लेखमाला लोकप्रभा मासिकातून साल 2017 रोजी प्रकाशित. अन्नपदार्थ आणि त्यांचे मूळ ह्यावरील संशोधक मालिका लोकप्रभात साल 2018 साली प्रकाशित. वृद्ध संगोपन ह्या विषयाचे गेली 10 वर्ष संशोधन. या विषयावरील पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर.

bottom of page