top of page

 

य श स्वी  क्री डा प्रवा सा चा  का न मं त्र 

निमिष वा. पाटगांवकर 

क्रिकेट विश्वचषकाच्या निमित्ताने यावर्षी पुन्हा एकदा क्रिकेटपटूंच्या जवळ वावरण्याचा योग आला. गेली काही वर्षे स्तंभलेखनाच्या निमित्ताने क्रिकेट आणि क्रिकेटपटू अगदी जवळून पहायच्या बऱ्याच संधी मिळाल्या आणि त्यातून पहिली गोष्ट प्रकर्षाने जाणवली असेल ती म्हणजे हा एक निव्वळ खेळ आहे आणि क्रिकेटपटूही हाडामांसाची माणसेच असतात. आपण टीव्हीवर जेव्हा क्रिकेट बघतो तेव्हा त्या खेळाला प्रतिस्पर्ध्यानुरूप बदला, युद्ध वगैरे नावे देत त्याचा सिनेमा बनवला जातो. मुळातल्या साध्या साध्या गोष्टी अतिरंजित करून दाखवल्या जातात. विश्वचषकाचा दौरा आटपून लंडनहून जेव्हा मी मुंबईला परत आलो तेव्हा विमानतळावर उतरल्यावर आपल्या देशबांधवांची गर्दी पाहून पहिल्यांदा काय जाणवले असेल ते म्हणजे इतक्या लोकांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन आपल्या खेळाडूंना खेळावे लागते. अर्थात विमानतळावरची गर्दी ही प्रातिनिधिकच म्हणायला हवी पण करोडो लोकांच्या अपेक्षा, मिडीयाने तिखटमीठ लावून बनवलेल्या सामन्याचा मसालेदार, चटकदार आस्वाद घेत आपली मतप्रदर्शने करणाऱ्या या जनसमुदायाच्या अपेक्षा पूर्ण करणे म्हणजे सोपे नाही. 

 

जसं पु.लं.नी मुंबईकरांच्या बाबतीत म्हटले आहे तसे मुंबईकरच काय समस्त भारतवासीयांसाठी क्रिकेट हा खेळण्यापेक्षा बोलण्याचा विषय आहे. तेव्हा एखाद्या सामन्यात खराब खेळल्यावर किंवा विश्वचषकातला पराभव स्वीकारल्यावर आपण आयुष्यात कधी बॅट किंवा बॉल हातात धरला नसताना अनेक विद्वान आपली मते पाजळत असतात. त्यात सर्वात उबग येणारे मत म्हणजे या क्रिकेटपटूंना पैशाशिवाय काही दुसरे काही दिसत नाही. हे मत प्रदर्शित करणारे साधारण फक्त टीव्हीवर जे दिसते त्यातूनच मत बनवणारे असतात.

 

टीव्हीवर सामन्यात खेळणाऱ्या एखाद्या क्रिकेटपटूची एक खेळाडू म्हणून जडणघडण व्हायला सुरुवात होते ती साधारण शालेय क्रिकेटमध्ये म्हणजे १२ ते १४ वर्षे वयाचा असताना. त्यात गुणवत्ता बहरत गेली आणि मुख्य म्हणजे योग्य वेळी योग्य संधी मिळत गेली तर त्याची क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द टिकते ते साधारण पस्तीस वर्षापर्यंत. कुणी धोनी किंवा तेंडुलकर सारखा अपवाद चाळिशीपर्यंत आपली कारकीर्द खेचू शकतो. वय वर्षे ३५ काय किंवा ४० काय या क्रिकेटपटूंच्या निवृत्तीच्या वयात बाकीच्या क्षेत्रात कारकीर्द बहरास येत असते आणि पुढची वीस वर्षे ती बहरत राहणार असते. क्रिकेटपटूला मात्र निवृत्तीनंतर पुढचे आयुष्य या खेळाडू म्हणून काढलेल्या कारकिर्दीवरच काढायचे असते. बरं या पंधरा वीस वर्षात क्रिकेटपटूला सर्वात जास्त कशाला सामोरे जावे लागत असेल तर एकाच गोष्टीला ते म्हणजे बदल. 

 

खेळाचे नियम, डावपेच, खेळातून मिळणारे मानधन ते बाह्य बदलांना तर खेळाडूला सामोरे जावे लागतेच पण एखाद्या खेळाडूची कारकीर्द यशस्वीपणे प्रदीर्घ होते जेव्हा तो त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात होणाऱ्या बदलांना कसे सामोरे जातो त्यावरून. आयुष्य हे भारतीओहोटी असते हा सर्वमान्य नियम एक माणूस म्हणून खेळाडूसही लागू असतो. तेव्हा मला खेळाडू एक व्यक्ती म्हणून त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील चढ-उताराबद्दल बोलायचे नाही पण खेळाडूचे सर्वात प्रमुख अस्त्र असते ते त्याचा फिटनेस. या फिटनेसला धक्का लागेल असे बदल त्याच्या आयुष्यात घडतो त्याला कोण कसा सामोरा जातो यावरून तो खेळाडू किती श्रेष्ठ आहे हे ठरते. गेल्या दोन दशकातील भारतीय खेळाडूंचा विचार केला तर प्रामुख्याने तीन नावे समोर येतात ती म्हणजे टेनिसमधील लिअँडर पेस आणि क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग. यातल्या प्रत्येकाला जो प्रकृतीने धक्का दिला होता तो कुणा दुसऱ्याला बसला असता तर खचून गेला असता पण ज्या जिद्दीने त्यांनी मात केली त्याला तोड नाही. यशाच्या शिखरावर असताना या बदलांना त्यांना सामोरे जावे लागले पण काही काळ त्या यशाच्या शिखरावरून खाली उतरून परिस्थितीनुसार आपल्या खेळात बदल करत त्यांनी पुन्हा यशाचे शिखर गाठले. परिस्थितीचा गुलाम होण्यापेक्षा आपल्याला बदलून त्यांनी परिस्थितीचा लगाम आपल्या हातात ठेवला. 

भारतीय टेनिसचे गुणगान गाताना आपण एकेकाळी जागतिक टेनिसमध्ये एबीसी म्हणजे अमृतराज, बोर्ग आणि कॉनर्स हे अभिमानाने सांगायचो पण विजय अमृतराज ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून दूरच राहिला. लिअँडर पेस हे नाव सुरवातीला जरा विचित्र वाटायचे आणि वृत्तपत्रे तर त्याचे वाटेल तसे नामकरण करायचे. १९९२ च्या ऑलिंपिकमध्ये रमेश कृष्णनबरोबर दुहेरीत त्यांनी उपउपांत्य फेरी गाठली पण लिअँडर पेस हे नाव सर्वांच्या तोंडात बसले ते १९९६च्या अटलांटा ऑलिंपिकनंतर. १९५२ नंतर वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवायला आपल्याला १९९६ सालापर्यंत वाट बघावी लागली. उपांत्य सामन्यात ज्या जिद्दीने त्याने आंद्रे अगासीला झुंजवले त्यावरूनच टेनिसमधील नवीन ताऱ्याचा उदय जाणवला होता. यानंतर पेस-भूपती जोडीने दुहेरीत सत्ता गाजवली. अचानक २००३ साली त्याच्या मेंदूत एक गाठीसदृश्य गोष्ट आढळली आणि पुढचे काही महिने टेनिस विसरून फक्त उपचार करावे लागले. या सर्वातून बाहेर पडून लिअँडर पुन्हा कोर्टावर आला आणि स्पर्धा जिंकू लागला. एका मोठ्या दुखण्यातून बाहेर आल्यावर मुख्य बदल झालेला असतो तो फिटनेसमध्ये. स्पर्धात्मक फिटनेस पुन्हा मिळवायला संपूर्ण जीवनमानात बदल करावा लागतो. या आघातानंतर दरम्यान त्याचे कॊटुंबिक संबंध बिघडले. या बदलाने विचलित न होता त्याने त्याची कारकीर्द यशस्वीपुढे नेली. वैयक्तिक कामगिरीत तर त्याने नवीन शिखर गाठलेच पण १९९२ पासून प्रत्येक ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत अनोखा विक्रमही केला.

tennis-player-leander-pais_c074a17fb9100

 

क्रिकेटमध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जेव्हा सचिन तेंडुलकरने पदापर्ण केले तेव्हाच त्याने आपण इथे अनेक वर्षे मुक्कामाला आलो आहोत हे आपल्या गुणवत्तेतून दाखवून दिले. आपल्या आक्रमक फलंदाजीने विशेषतः एक दिवसीय सामन्याची समीकरणे त्याने बदलून टाकली. सचिन तेंडुलकर खेळायला लागला की मैदाने भरायची आणि तो बाद झाला की मैदाने ओस पडायची. सचिन बाद झाला की आता आपल्या संघाचे काय होणार अशी अवस्था प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींची व्हायची. २००४ साल उजाडले आणि घणाघाती फलंदाजीच्या या बादशहाला ज्या बॅटने त्याने जगातील उत्तमोत्तम गोलंदाजांना फटकावले ती बॅट साधी उचलायलाही त्रास व्हायला लागला. टेनिस एल्बो नावाचा कुठचा आजार असतो हे तोपर्यंत आपल्याकडे कुणाला माहीतही नव्हते. सुरवातीला या त्रासाचे निदानच नीट झाले नव्हते आणि जेव्हा झाले तेव्हा १५ वर्षे क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या या महान खेळाडूची झोप उडाली.

TH02_SACHIN.jpg

 

अचानक आयुष्यात आलेला हा बदल तो कसा पचवतो यावर त्याची पुढची कारकीर्द अवलंबून होती. कित्येकवेळा त्याला रात्र रात्र आपल्या भविष्यच्या चिंतेने झोप लागायची नाही. गाडी काढून तो मित्रांना भेटायला जायचा आणि चर्चा करत बसायचा. अखेर हा बदल त्याने स्वीकारला. कारकिर्दीतील उमेदीची त्याची जवळपास दोन वर्षे या आजारात वाया गेली. आजारातून बरे झाल्यावर त्याला पहिले जाणवले ते म्हणजे त्याच्या फलंदाजीत करावा लागणारा बदल. जड वजनाची बॅट वापरायची सवयही त्याला बदलावी लागणार होती, त्याची फलंदाजीची पद्धत, फटके सर्व काही बदलणार होते. त्याच्या हातावर जास्त भार न पडता त्याला खेळायचे होते. त्याच्या नैसर्गिक फलंदाजीत बदल करून सचिन तेंडुलकरचा नवा अवतार टेनिस एल्बो नंतरच्या कालखंडात बघायला मिळाला. पूर्वीचा आक्रमक सचिन अभावानेच दिसायला लागला पण हा नवा बदलही संघाच्या दृष्टीने आश्वासक वाटायला लागला. या बदलामुळेच त्याची कारकीर्द लांबली.

सचिन तेंडुलकर बाद झाला की जी जीवाची घालमेल व्हायची ती कमी होण्यासाठी त्या मधल्या फळीत तितकाच आक्रमक फलंदाज जन्माला येणे गरजेचे होते. ती उणीव भरून काढली ती युवराज सिंगने. 

२००० साली चॅम्पियन्स ट्रॉफीतच त्याने त्याची आक्रमकता दाखवायला सुरवात केली पण आठवतंय ते २००२ साल. मुंबईहून नॅटवेस्ट ट्रॉफीचा अंतिम सामना पाहायला मी लॉर्ड्सला लंडनला गेलो होतो. लॉर्ड्सला जाताना लंडनच्या ट्यूबमध्ये सामन्यालाच चाललेल्या एका वयस्कर ब्रिटिश माणसाशी गप्पा मारत होतो. भारत इंग्लंड अंतिम सामना असल्याने त्याचे मत विचारत होतो. "जर आम्ही तेंडुलकरला ४०च्या आत बाद केले तर सामना आमचाच असेल" हे त्याचे मत ऐकून तेंडुलकरच्या कीर्तीचा दबदबा किती होता हेच दिसत होते. पण प्रत्यक्षात भारताची वाताहत लागल्यावर तो अविस्मरणीय सामना जिंकून दिला तो युवराज सिंग आणि कैफने. युवराज सिंगचे मैदानातील वर्तन कुणाला बेफिकीर वृत्तीचे वाटू शकेल पण या खेळाडूने या स्तरावर पोहोचण्यात काय मेहनत घेतली आहे हे डॉ. मकरंद वायंगणकर यांनी लिहिलेल्या "युवी" पुस्तकातून कळते. डॉ. वायंगणकारांच्या आणि माझ्या बऱ्याच गप्पा होत असतात आणि युवराजची जी माहिती मिळते त्यावरून त्याच्याविषयी आदर वाढत गेला. मुलाने क्रिकेटपटू होण्याच्या वडिलांच्या ध्यासाने लहान वयातच युवराजला सामान्य लहान मुलापेक्षा वेगळे आयुष्य जगावे लागले. केवळ वडिलांच्या इच्छेपोटी हा बदल कोवळ्या युवराजने स्वीकारला. पुढे मुंबईला आल्यावर चंदीगडचे सुखासीन आयुष्य सोडून मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात मोठी किटबॅग सांभाळत रोज अंधेरी ते चर्चगेट लोकल प्रवासाचा बदल त्याला अंगवळणी पाडून घ्यावा लागला. युवराज सिंग अशाच अनेक बदलातून झालेल्या जडणघडणीतून भारताला मिळालेला एक उकृष्ट अष्टपैलू या पदापर्यंत पोहोचला. जेव्हा २०११ चा विश्वचषक भारताने जिंकला आणि समस्त भारत जल्लोषात नाहून निघाला तेव्हा या स्पर्धेचा मालिकावीर युवराज सिंग मात्र एका वेगळ्याच बदलाला सामोरे जाणार होता. मैदानावरच्या या चपळ खेळाडूला चक्क कॅन्सर असल्याचे  निदान झाले.

maxresdefault (2)_edited.jpg

युवराज सिंग या घटनेने पुरता हबकून गेला होता पण सुरवातीचा धक्का ओसरल्यावर त्याने जणू काही त्या नॅटवेस्ट ट्रॉफीसारखीच आपली इनिंग बांधली. सर्व जबाबदारी त्याच्याच खांद्यावर असताना बरे व्हायचे लक्ष्य खूप मोठे होते पण केमोथेरपी सारख्या त्रासदायक उपचारांना तो जणू काही एखाद्या जलदगती गोलंदाजाच्या माऱ्याचा निडरपणे सामना करावा तसा समोरा गेला. युवराज सिंगने ही कॅन्सरविरुद्धची लढाईही जिंकली आणि तो मैदानात पुन्हा अवतरला. एक खेळाडू म्हणून त्याच्या आयुष्यात या घटनेने अमूलाग्र बदल घडवून आणला. मूळचा आक्रमक युवराज जीवनातील या अस्थिरतेने जास्त संयमी झाला. क्रिकेटकडे आणि जीवनाकडे बघायचा त्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. या आजारातून बरे होऊन पुन्हा सर्वोच्च पातळीवर खेळायची जिद्द ठेवायला मुळात वाघाचे काळीज असावे लागते आणि परिस्थितीप्रमाणे बदल करायची लवचिकता. युवराज सिंगने ते दोन्ही उत्तम रीतीने दाखवले.

 

बदल ही एकच गोष्ट जगात शाश्वत आहे हे एक क्रिकेटपटू किंवा एकंदरीतच खेळाडूच्या आयुष्यात जितके सत्य असते तितके कदाचित बाकीच्यांच्या आयुष्यात नसेल. खेळाडूंच्या नशिबात ९ ते ५ नोकरी, १-२ लंच आणि निवृत्तीनंतर प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन नसते तर क्रीडा आयुष्यातील दर पावलाला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या असंख्य बदलातून त्याला मार्ग काढायचा असतो. कुठच्याही क्रीडापटूची निवृत्ती केव्हा निवृत्त होणार प्रश्नापेक्षा का निवृत्त झाला या प्रश्नाने लक्षात राहिली तर ती योग्य निवृत्ती मानतात. हा "का निवृत्त झाला?" प्रश्नाचा क्षण यायला जी मेहनत करून कारकीर्द लांबवावी लागते त्यासाठी वेळोवेळी तुम्ही बदलांना कसे सामोरे जाता यावर अवलंबून असते.

निमिष वा. पाटगांवकर 

61985210_10213598754313581_4473994563828

श्री. निमिष पाटगांवकर हे अमेरिकेतून उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर गेली वीसहून अधिक वर्षे विविध जागतिक स्तरावरच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यात दूरसंचार, मिडीया आणि एंटरटेनमेंट विषयाचे वरिष्ठ तंत्रज्ञान सल्लागार म्हणून काम करत आहेत. सध्या ते आयबीएम सारख्या या क्षेत्रातल्या प्रतिष्ठित कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञान सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. क्रिकेट, इतर खेळ आणि तंत्रज्ञान यावरील त्यांचे लेख अनेक नामवंत प्रकाशनात प्रसिद्ध झाले आहेत. मुंबई क्रिकेटवर डॉ. मकरंद वायंगणकर यांनी लिहिलेल्या "अ मिलियन ब्रोकन विंडोज" या पुस्तकाचे ते अनुवादक आहेत. अमेरिकन विद्यार्थी जीवनावर त्यांनी लिहिलेल्या "एफ-वन स्टोरी" या पुस्तकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.भारत सरकारने सुरु केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आणि परीक्षण करण्यासाठी विविध कार्यक्रमातून तज्ञ म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते. आपल्याकामानिमित्त आणि इतर कारणांनी अनेक ठिकाणाचा प्रवास केल्यामुळे निव्वळ क्रिकेटसामनेच नव्हे नव्हे तर जिथे सामने खेळले जात आहेत त्या त्या ठिकाणाचा वेधही त्यांच्या लेखनातून घेतलेला दिसतो. दैनिक पुढारीसाठी श्री. निमिष पाटगांवकर  २०१५ च्या विश्वचषकापासून नियमित स्तंभलेखन करत आहेत. २०१७ च्या चँपियन्स ट्रॉफी आणि २०१८ च्या भारत इंग्लंड कसोटी मालिकेसाठी आणि २०१९च्या विश्वचषक स्पर्धेसाठी ही त्यांनी पुढारीसाठी थेट इंग्लंडहून लेखन केले होते.

bottom of page