top of page

(मि नी)  रा ई ट र्स  (मे गा)  ब्लॉ क 

मधुराणी सप्रे

मी काही लेखिका नाही. छंद म्हणून जमेल, सुचेल तसं मी अधून मधून लिहिते. पण लिखाणातून मला आनंद मिळतो. या दिवाळी अंकासाठी काहीतरी छान लिहायचंय हे गेले कित्येक दिवस सतत पार्श्वसंगीतासारखं डोक्यात वाजत होतं. पण लिखाण काही होत नव्हतं. माझ्या हातून लिखाण का होत नाही याची १०० कारणं मी देऊ शकते. वेळ नाही हे सर्वात पहिलं आणि सर्वात खोटं कारण. (फेसबुक किंवा युट्यूबवर एका निरर्थक व्हिडिओवरून दुसऱ्या अधिक निरर्थक व्हिडिओकडे अलगद वाहत जाताना मी कित्येक वेळा स्वतःला पकडलं आहे. तेव्हा वेळच वेळ असतो.) दुसरं परवलीचं, पण खरं कारण म्हणजे सुचत नाही. सुचण्याची वाट पहात दिवस जातात. रुटीन चालू राहतं. पण ते मघाचं पार्श्वसंगीत टोचत राहतं.

 

असं का होतं? कधी सुचतं, कधी नाही. कधी 'हे सांगायलाच हवं' अशा प्रकारचं सुचतं आणि मग वेळ काळ न बघता झपाटल्यासारखं लिखाण होतं. कधी महिनेच्या महिने कोरडे रुक्ष जातात. याला 'राईटर्स ब्लॉक' म्हणणं म्हणजे मोठा शब्द होईल. कारण एकतर मी 'राईटर' नाही; आणि 'ब्लॉक' झालाय म्हणण्याएवढा मुळात प्रवाहच नाही. तरीही आपल्याला असं जे होतं, त्याचं कारण शोधण्याचा जरा प्रयत्न केला. थोडं वाचून, थोडा अनुभवांचा आढावा घेऊन. त्यात जे हाती लागलं तेच इथे मांडते आहे. सुचत नाही, तर म्हंटलं 'न सुचणे' या विषयावरच लिहू. हाय काय, नाय काय.   

 

भीती:

आपल्या सगळ्यांच्याच मनात कधीतरी अधून मधून वीज चमकल्यासारख्या कल्पना येत असतात आणि विरून जात असतात. या कल्पनेचं बीज खूप नाजूक असतं. अगदी कोवळेपणी त्याला समीक्षा, सूज्ञतेचं भाजणारं ऊन दाखवलं की ते कोमेजून जातं. हे लोकांना आवडेल का? लोक यावर हसतील का? कुणाच्या भावना दुखावल्या जातील का? लोकांना हे पटेल का? यांपैकी प्रत्येक प्रश्नात कल्पनेचा जीव घेण्याची क्षमता आहे. लिहून आपली कलाकृती लोकांसमोर ठेवायला हिंमत लागते. हा अडथळा पार करण्याची पहिली आणि मोठी पायरी म्हणजे भीती हा अडथळा आहे हे कळणं. एखादी कल्पना डोक्यात, मनात मुरू दिली की ती तग धरते. 

 

शिवाय एकदा लिहून झालं की 'आता हे आपलं नाही' अशा स्वरूपाचं अंतर लागतं. तरच लोकांच्या प्रतिक्रिया, समीक्षा सकारात्मकतेने घेता येतात, त्यांच्यावर तटस्थपणे विचार करता येतो. आपल्या कलाकृतीपासून हे अंतर ठेवणं हे एक अतिशय अवघड काम आहे. अर्थात हे इतरही अनेक कलाप्रकारांना लागू आहे.

 

प्रेरणा:

मोठ्या लेखकांची पुस्तकं वाचल्यावर, 'आपल्याला असं समर्थ, भावनाप्रधान, स्तिमित करणारं लिहिता येणं शक्यच नाही' अशा भावनेमुळे, त्यातून प्रचंड आनंद / ज्ञान / माहिती मिळाली, तरी लिहिण्यासाठीची प्रेरणा मिळत नाही. पण नियमित लेखन करणारे आपल्यातलेच सशक्त लेखक वाचले की हुरूप येतो. नियमित लेखन करणे ही आपल्या टप्प्यातली गोष्ट वाटू लागते. त्याने जास्त प्रेरणा मिळते. 

 

प्रेरणेच्या अभावाचं अजून एक कारण म्हणजे जाणिवा खुल्या न ठेवणं. रोजच्या कंटाळवाण्या गोष्टींमधूनच प्रेरणा मिळत असतात; पण डोळे, कान, नाक उघडं हवं. मन संस्कारक्षम हवं. आजकाल आपल्याला भावनाच जाणवत नाहीत. दर दोन तासांनी चरल्यावर सपाटून भूक लागत नाही. पण खूप वेळ.. अख्खा दिवस काही खाल्लं नाही, तर शेवटी कडकडून भूक लागते. अश्या अवस्थेत काहीही अवीट लागतं. तसंच हे. जर भावना कडकडून स्पर्शच करत नसतील हृदयाला, तर कसं आणि कुठून येईल ते कागदावर तरी? 

 

आनंद, दुःख, संताप, कंटाळा, वेदना, कृतज्ञता, मत्सर, लोभ, ममता, आपुलकी.. सगळं अनोळखी वाटू लागलंय हल्ली.  भावना जाणवण्यासाठी स्वतःच्या आत डोकावून बघावं लागतं. भावना जगाव्या लागतात. त्यांच्यात थांबावं लागतं. आजकाल आपल्याला काहीतरी वाटतंय असं कळेपर्यंत वेगळंच काहीतरी वाटू लागलेलं असतं. स्वतःमध्ये २ क्षण केंद्रित होणं दुरापास्त झालंय. सतत काहीतरी प्रलोभनं विचलित करतात. काहीतरी लक्ष्य वेधून घेतं. कुणीतरी फास्ट फॉरवर्ड केल्यासारखं आयुष्य गर्रर्रर्र पुढे चाललंय. ऋतू झर झर बदलतात. अंगणातल्या झाडांची पानं रंग बदलतात, गळतात, नवी येतात. त्यांना निरखणं राहून जातं. पोरं कालच जन्माला आली असं वाटावं इतकी भराभर मोठी होतात. ताडमाड उंच होतात. त्यांचं बालपण अनुभवायचं राहून जातं. एवढा वेळ आपण कुठे होतो असं वाटतं. 

 

आजकाल सोशल मीडियावर साहित्यिक मालाचा जोरदार मारा असतो. यात लेख, कविता, कथा आणि इतर बऱ्याच कलाप्रकारांची फेकाफेकी होते. संक्रांतीच्या वाणासारखा हा माल 'आला पदरात की पुढे पाठव' अशा वृत्तीने फिरत राहतो. 'माल' हा शब्दच इथे संकल्पित आहे. कारण यात मोठ्या प्रमाणात कचरा असतो. एखादा हिरा निसटून जाऊ नये म्हणून हा सगळा कचरा आपण उपसतो. आणि हा कचरा ऍडिक्टिव्ह असतो. त्यात आपली खूप ऊर्जा, वेळ तर वाया जातोच, शिवाय जाणिवा बोथट होतात. माहितीच्या प्रदूषणात आपली वाट अंधूक होते. एवढ्या सगळ्या जमा झालेल्या डेटाचं विश्लेषण होत नाही. 

 

ताण: 

ताण हे हल्लीच्या साधारण सगळ्या जीवनशैलीशी निगडित समस्यांचं कारण म्हणून गणता येईल. त्यातलीच एक म्हणजे क्रिएटिव्हिटीचा अभाव. कारण सृजनाला डेडलाईन मानवत नाही. याचं शास्त्रीय (विकिपीडियावरून साभार) कारण असं आहे म्हणे: कुठल्याही प्रकारच्या तणावाखाली आपला मेंदू नियंत्रणाचं काम सेरेब्रल कॉर्टेक्स कडून काढून लिम्बिक सिस्टिमकडे देतो. थोडक्यात आणिबाणी जाहीर होते. नव्या सरकारच्या प्राधान्यक्रमात सृजनाचा ढोक नंबर लागतो. त्यामुळे निर्मितीच्या कामात अडथळे येतात. 

 

आळस:

हा अनुक्रमाने शेवटचा मुद्दा असला तरी माझ्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी अगदी कबूल करते की एखादी कल्पना डोक्यात आलेली असताना फोन, कागद, कॉम्पुटर जवळ नसेल तर मी उठून ते घेऊन येत नाही. टायपिंग करायच्या कंटाळ्याने माझ्या अनेक लेखांचा जन्माला यायच्या आधीच घात केला आहे. हा आळशीपणा कथा, नाटक वगैरे सबुरीनं बाळंतपण करावे लागणारे प्रकार माझ्या जवळपास फिरकू देत नाही. एखाद्या कल्पनेच्या विस्तारासाठी थोडं वाचन, संशोधन करावं लागणार असेल तर तिथेच ते विषय गारद होतात. वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील, पण या आळशीपणावर मात करण्याचं काम मात्र सगळ्यात अवघड. झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं उठवणार? स्वयंशिस्त हाच त्याचा उपाय. सरावाला कुठेही शॉर्टकट नाही.

 

आणखीही खरी खोटी अनेक कारणं असली तरी, ज्यांना उपाय शोधावा अशी एवढीच. एखाद्या समस्येचं मूळ शोधून काढणे ही समस्या सोडविण्याची पहिली  पायरी असते म्हणतात. त्या न्यायाने आता मी अर्धी पायरी तरी चढले आहे. आणखी अख्खा गड (वजा अर्धी पायरी) शिल्लक आहे. पाहूयात कधी सर होतो!

 

तळटीप: बंद पडलेल्या डोक्याला चालना देण्याचा अजून एक उपाय म्हणजे सुपीक डोक्याच्या सर्जनशील लोकांच्या संपर्कात राहणे. मला या लेखाची कल्पना सुचवल्याबद्दल गौतम पंगू यांचे धन्यवाद!

मधुराणी सप्रे

unnamed.jpg

सध्या मिलपिटास, कॅलिफोर्नियामध्ये राहते. नवरा आणि ६ वर्षांची मुलगी असं माझं कुटुंब आहे. मी ऍपल मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. लेखन, नाटक हे माझे छंद आहेत. घर, ॲाफीस आणि छंद यांच्यात समतोल राखणे हे माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचं आणि सर्वांत अवघड काम आहे.

bottom of page