top of page

ते दि स ता त म ला
माधवी कुंटे
मी चंद्रकांत सरंजामे! आता ऐशी वर्षांचा आहे.
मुलांना वाटतं की मी कधीकधी गोष्टी विसरतो. किंवा असंबद्ध बोलतो. माझी मुलगी मानसशास्त्रज्ञ आहे. तिचं असं म्हणणं आहे की मी जुन्या आठवणी सांगताना वास्तव आणि कल्पना यांची सरमिसळ करून सांगतो. पण माझा मेंदू आणि शरीर दोन्ही अगदी ठणठणीत आहे. मी इहवादी माणूस आहे. ज्ञानेंद्रियांनी जे अनुभव घेतो, त्यावरच विश्वास ठेवतो. तेच इतरांना सांगतो. पण मुलंच आता असं म्हणायला लागल्यामुळे मी अलीकडे जुन्या आठवणी सांगतच नाही. आज आत्तासुद्धा आरामखुर्चीत बसल्याबसल्या मला ती जुनी आठवण आलीय आणि भीतीचा थंडगार स्पर्श जाणवतोय. भीती उगाचच निर्माण होते. ती आपली संरक्षक प्रेरणा असते ना! पण त्या त्या आठवणीबरोबर आपण तेवढा वेळ तो अनुभव पुन्हा घेत असतो ना? जरासं काही धोक्याचं असं जाणवलं की भीती वाटतेच! तशी तेव्हा ती वाटली होती.
तेंव्हा मी असेन चोवीस-पंचवीस वर्षांचा! चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून एका फर्ममधे नोकरीला लागलो होतो. एक मध्यम उत्पन्नाची कंपनी आमची क्लायंट होती. तिची एका नव्याने विकसित होत असलेल्या शहरात शाखा होती. तिथे हिशेब तपासायचे होते. वार्षिक ताळेबंद योग्य असल्याचं प्रमाणित करायचं होतं. कंपनी मध्यमच! त्यामुळे विमानाचं तिकीट दिलं नसतं. नि तसाही त्या शहरात विमानतळ काही नव्हता. त्यांनी रात्रीच्या एका गाडीत माझं रिझर्वेशन 'कुपे' मधे केलं होतं. उतरायची व्यवस्थाही बऱ्यापैकी हॉटेलमधे केली होती. मला रेल्वे प्रवास आवडतो. कुपेमधे चांगल्या सोयी असतात नि रात्री खूप माणसंही नसतात. शिवाय त्याला जोडून टॉयलेटची व्यवस्था असते. त्यामुळे मी आनंदाने जायचं मान्य केलं.
गाडी चांगली होती, शिवाय कुपेमधे माझ्याशिवाय इतर कुणी प्रवासी नव्हता. माझा मी राजा होतो. सामान फारसं नव्हतंच. आरामात बसलो. गाडी सुरु झाली की आपण थोडेसे झोके घेतल्यासारखे हलत असतो. गाडी अशी आपल्याला मांडीवर खेळवत असते ते खूप छान वाटतं. आईनं हाताचा पाळणा करून जोजवावं तसं वाटतं. त्या लयबद्ध वेगाची हलकीशी नशा चढते. ती अनुभवत मी मस्त खिडकीशी बसलो होतो. हळूहळू अंधार पडत होता. तरी सावळा अगदी मंदावलेला पुसट प्रकाश रेंगाळत होता. टीसी येऊन माझं तिकीट तपासून गेला. मी जरा सैलावलो. थोड्यावेळाने जेवण येणार होतं. तोवर थोडं वाचावं म्हणून पुस्तक काढलं. मला गूढ कथा वाचायला आवडतात. माझा भूत बीत यावर विश्वास नाही. पण काही माणसांमधे विशेष मानसिक शक्ती असते हे मात्र निःसंशय! तर हे कल्पना आणि वास्तव यांची भन्नाट सरमिसळ असलेलं रसायन खूप मनोरंजक असतं. प्रवासात असं वाचन करणं बरं! वेळ चांगला जातो. सांगायचं काय, तर मी माझं पुस्तक काढलं. त्याच्या मुखपृष्ठावर धुरकट विचित्र आकृत्या, त्यात कुठे कुठे डोळ्यांच्या खाचा, दात नसलेली पण विचकलेली तोंडाची बोळकी होती.
मला गंमत वाटली. मी वाचायला सुरुवात केली. इतक्यात कुपेच्या दारावर टकटक झाली. त्या शांततेत थोडं दचकवणारी होती ती. मी वर पाहिलं, मध्यमवयीन, रुबाबदार, उंच गृहस्थ उंची सुटकेस घेऊन आत शिरले. आता मधेच हा सहप्रवासी कुठून उपटला? अशा अर्थी मी पाहिलं असावं. तो हसून म्हणाला "तुम्हाला आश्चर्य वाटलेलं दिसतंय. बरोबरच आहे. मी मधेच आलो. पण झालं काय की ओळखीचे एक वृद्ध गृहस्थ आणि त्यांची पत्नी याच गाडीने मागच्या डब्यातून प्रवास करताहेत. त्यांची सोय लावून दिली. थोडावेळ त्यांच्याशी बोलत बसलो आणि मग इकडे आलो."
मी नुसताच हसलो. परत टकटक झाली. आता माझं जेवण घेऊन भोजनयानामधला कर्मचारी आला होता. समोरच्या कोलॅप्सीबल टेबलवर त्यानं पॅक केलेलं जेवण ठेवलं आणि तो गेला. मी त्या सहप्रवाशाला म्हटलं..
"जेवणार का थोडेसे माझ्याबरोबर?"
तो हसून म्हणाला "मी प्रवासात रात्रीचं काही खात-पीत नाही. तुम्ही चालू द्या. तुमचं जेवण होऊ दे निवांत."
आता मी त्याच्याकडे नीट पाहिलं. त्याचा चेहरा थोडा सुजलेला, डोळ्याखाली माराचे काळे व्रण आणि कानाखाली लालसर जखमेसारखं काही दिसलं. त्याचं माझ्याकडे लक्ष नसावं. तो माझ्या पालथ्या घातलेल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बारकाईने बघत होता. मग माझ्याकडे बघत म्हणाला.
"तुमची हरकत नसेल तर हे पुस्तक मी जरा बघू का?"
मी म्हटलं "अवश्य, तसंही मी आता काही फार वेळ वाचणार नाही"
माझं जेवण झालं. मी हात धुवून ब्रश करून बाहेर आलो. पुस्तक माझ्या हाती परत देत तो म्हणाला.
"चंद्रकांतजी, व्हेरी इंटरेस्टींग. तुमचा विश्वास आहे या गोष्टीवर? म्हणजे मानवेतर अस्तित्वावर?"
मी थोडा चमकलो. म्हटलं "तुम्हाला माझं नाव कसं कळलं?"
तो म्हणाला "तुमच्या बॅगवर ठळक लिहिलंय. सहज लक्ष गेलं"
मी थोडा सैलावलो. तरीही अस्वस्थ होतो. त्याची नजर वेगळीच होती. अतिशय थंड!
सहाजण अंतःप्रेरणेच भय जागृत करणारी. माझा अस्वस्थपणा लक्षात आल्यासारखा हसून तो म्हणाला "माझं नाव मनोहर. मी पहाटे चार वाजता येणारी नजमपूरला उतरणार आहे. तुम्ही कुठे जाणार?"
"अगदी शेवटी. पहाटे सहा वाजता अंतिम स्थानकावर"
"अच्छा, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवता?"
त्याने पुस्तकाकडे बोट दाखवत विचारलं.
मी म्हटलं "ही अशी पुस्तक रंजक आणि काल्पनिक असतात. प्रवासात वाचायला ठीक! अशा मानवेतर अस्तित्वांवर, पिशाच्च, आत्मे इत्यादींवर माझा अजिबात विश्वास नाही. अहो देह संपल्यावर मेंदू, हृदय स्थगित झाल्यावर त्या अस्तित्वातील भावना, वासना, स्मृती इत्यादी कसं शिल्लक राहील? ते करणी, भानामती, पछाडणं, मंत्र-तंत्र इत्यादी गोष्टी अगदी काल्पनिक असतात."
"पण विचार, भावना, वासना या ही एका अर्थी अमूर्त नसतात. आपल्या आत ती विद्युतचुंबकीय घडामोड प्रत्यक्षात घडते आणि एकदा निर्माण झालेली वस्तू रुप बदलते पण नष्ट होत नाही असं म्हणतात. देह मृतिकेच्या रुपात राहतो तशा त्या भावना, वासना कशावरुन राहत नसतील? काहीतरी जडत्व धारण करत नसतील?"
"हे थोडंसं स्यूडो सायन्स सारखं बोलता आहात. मला काही याचा अनुभव नाही तोवर कसा विश्वास ठेवणार?"
"तुम्हाला अनुभव नाही किंवा तुमच्या ज्ञानेंद्रियांनी काही ग्रहण केलं नाही ह्या तुमच्या मर्यादा असू शकतात. तुमच्या ज्ञानेंद्रियांना ज्याचा अनुभव येत नाही अशा कित्येक गोष्टी अस्तित्वात असतात."
"हो. तसं असेल पण जोवर मला अनुभव नाही तोवर मी कसा विश्वास ठेवावा? असं कधी काही जाणवलं नाही. तुम्हाला आहेत असे अनुभव?"
"हो. मला अगदी स्वत:ला याचा अनुभव आहे." हे ठामपणे म्हणत त्याने माझ्याकडे असं रोखून बघितलं की माझी नजर त्याच्या नजरेशी जणू बांधली गेली. भयाची बारीक शिरशिरी अंगावर उमटली. मग मी प्रयत्नपूर्वक नजर सोडवली.
तो म्हणाला,
"अहो, या ट्रॅकवर धावणार्या सर्व गाड्यांमध्ये असं अमानवी अस्तित्व अनेक प्रवाशांना जाणवलं आहे. ती हकीगत तुम्ही कधी ऐकली नाही?"
"नाही. मी या भागात, या रेल्वेलाईनवर पहिल्यांदाच प्रवास करतो आहे. अशी काय हकीगत आहे?"
"एक मध्यमवयीन गृहस्थ याच गाडीने प्रवास करत होता. त्या काळी रेल्वेत चोर - दरोडेखोरांचा सुळसुळाट झाला होता. लुटालूट करायचे आणि प्राणही घ्यायचे. लोक जीव मुठीत धरुन प्रवास करायचे. प्रवासी शक्त्यतो बरेचजण एकत्र असत. शस्त्रही बाळगत. दरोडेखोर तसे हुषार! योग्य सावज गाठायचे. तर हा गृहस्थ त्याच गावी निघाला होता जिथे मी आता जातोय. त्या गावी त्याच्या बायकोचं माहेर होतं. बायको आणि मुलगी तिथे होत्या. त्यांना भेटायला निघाला होता. त्या दोघींसाठी खूप भेटवस्तू घेतल्या होत्या. असाच कुपेमध्ये बसला होता" असं म्हणून त्यानं माझ्याकडे रोखून पाहिलं. मला हसू आलं. असल्या गोष्टींना मी घाबरणार का? तो पुढे काय सांगणार त्याचा मला अंदाज आला होता पण म्हटलं बघू या भाकडकथा कशी खुलवतोय हा गृहस्थ.
तो म्हणाला, "तुम्हाला अंदाज आलाच असेल, पुढे काय झालं त्याचा. तरीपण सांगतो. त्याला कुपेत गाठून दरोडेखोरांनी लुटायला सुरुवात केली. त्याने प्रतिकार करताच मारहाण सुरु केली. अखेरीस गळा आवळून त्याचा प्राण घेतला. तेव्हापासून त्याचं भूत या ट्रकवरच्या गाड्यांमध्ये दिसतं. अनेकदा त्यानं चोर - दरोडेखोरांपासून प्रवाशांची सुटकाही केली आहे... सर्व भुतं काही दुष्ट नसतात."
"त्या गृहस्थाच्या बायको मुलांना त्यानं भुताच्या अवतारात काही मदत केली की नाही?" मी विचारलं.
"त्याच्या बायकोमुलांना पुढच्या आयुष्यात कसलीही ददात पडली नाही असं म्हणतात."
"ते एक बरं झालं! पण तेव्हापासून अजूनपर्यंत ते भूत वावरतंय हे कसं काय? आत्तापर्यंत अनेकांना मदत केल्यावर त्याच्या भावना वासनांचा क्षय झाला नाही हे कसं?" त्याला डिवचत मी थोडं पुढे म्हटलं,"तुमच्या म्हणण्याप्रमाणे भावना वासनांच्या ऊर्जेने काही एक विरळ वस्तुमान धारण केलं. ते काही हेतूने घडलं. तो हेतू पूर्णत्वाला गेला. आता त्या वस्तुमानाचे परत ऊर्जेत रूपांतर होऊन ती ऊर्जा जगाच्या ऊर्जाप्रवाहात सामील व्हायला नको का?"
तो हसला. त्याचे डोळे वेगळ्याच तऱ्हेने चमकले. माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. मी मनाला बजावलं उगाच कल्पनेचे खेळ नकोत. तो म्हणाला,"अहो, जसं प्रत्येक मानवाचं आयुष्य ठरलेलं असतं तसं प्रत्येक भुताचंही ठरलेलं असतं. आता काहीवेळा काही भुतं दुष्ट शक्तीच्या आधीन होतात. त्यांना नको असलं तरी अपराध करावे लागतात. पण त्यांना त्यापासून मुक्ती मिळण्याची योजनाही त्यांच्या शास्त्याने आखलेली असते."
"मनोहर, तुमचा त्या बाबतीत अनुभव जबरदस्तच आहे असं दिसतंय" मी थोड्या उपरोधिकपणे म्हटलं. त्यावर तो नुसता हसला.
थोड्यावेळाने म्हणाला, "मी थोडं बहुत संशोधन केलंय त्यावरून काही गोष्टी निश्चित सांगू शकतो." तो बाथरूममध्ये गेला त्याचवेळी अटेंडंट आला. हवं नकोची चौकशी केली. मी म्हटलं,"मला तरी काही नको. पण माझ्याबरोबरचे गृहस्थ बाथरूममध्ये गेले आहेत. त्यांना काही हवं असलं तर माहित नाही." अटेंडंटने माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं. मी काही तरी अतार्किक बोलतो आहे असा काहीसा भाव त्याच्या डोळ्यात होता. पण तो काहीच न बोलता इकडे तिकडे बघून निघाला. आश्चर्य म्हणजे कसा कुणास ठाऊक कुपेमध्ये व्हिस्कीचा वास पसरला होता. मनोहरने आतमध्ये 'चढवली' असावी. अटेंडंटला वाटलं असेल मीच 'घेतली' असावी. तो दार बंद करून गेला. आणि व्हिस्कीचा दरवळ नाहीसा झाला. हा काय चमत्कार! की त्या अटेंडंटनेच चढवली होती? पण तो आला तेव्हा तर असा वास नव्हता आला. मी मान हलवली. उगाचच भ्रमल्यासारखं झालंय.
मनोहर बाहेर आला. मी ही जाऊन आलो आणि दोघंही झोपलो.

रात्री जाग आली ती दोघांनी माझा गळा धरल्याने. एकाने म्हटले, "पाकीट काढ. आवाज करू नको" दुसऱ्याने कानाखाली सुरा धरला. तिथून खाली उतरवला. मी मुकाट्याने पाकीट दिलं. दुसऱ्याने डाव्या हाताने साखळी हिसकली. मनात म्हणत होतो, "देवा! ह्या मनोहरला जाग येऊ दे. काहीतरी मदत मिळू दे." पहिल्या चोरट्याने माझी बॅग काढून उचकायला सुरुवात केली होती. मला बर्थच्या अगदी कडेला खेचून नेलं होतं. आवाज करण्याची सोय नव्हती.
मी मनोहरकडे बघत होतो. त्याने डोळे उघडले आणि माझ्या तोंडून एक किंचाळी बाहेर पडली. मनोहरचे डोळे अंधारात हिंस्त्र जनावरासारखे चमकत होते. त्याहून अधिक प्रखर! बुबुळं नव्हती. त्याने मानेखाली घातलेले दोन्ही हात काढले. ते हात लांब लांब होत गेले. पोलादासारखे कडक प्रचंड मोठे हात! चोरटे आ वासून बघत राहिले. त्यांच्या हातून माझं पाकीट साखळी गळून पडलं. त्या हातांनी एका चोराचा गळा आवळला. त्या चोराची जीभ बाहेर आली. दुसऱ्याने किंचाळी मारली. त्याच्या तोंडावर ढोसा बसला. त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडलं. अजस्त्र देहाचा, दाहक डोळ्याचा मनोहर सावकाश उठला. त्याच्याकडे बघता बघता माझी शुद्ध हरपली.
मी रेल्वे इस्पितळात शुद्धीवर आलो. मला डॉक्टर म्हणाले "अहो दोन भयंकर दरोडेखोरांशी शौर्याने लढलात, त्यांना पकडलं आहे, ते पोलिसांना हवेच होते. तुम्ही मात्र श्रमामुळे बेशुद्ध झालात. आता ठीक वाटत आहे ना?" मी अशक्तपणे मान हलवली. मी मनोहरबद्दल सांगितले असते तर कोण विश्वास ठेवणार होतं? माझ्याबद्दल चार दोन बातम्या छापून आल्या. पोलिसांनी छोटासा सत्कार केला. माझी साखळी आणि पाकीट नीटपणे त्या कोलॅप्सीबल टेबलवर ठेवलेलं मिळालं.
खरं सांगतो तुम्हाला.. त्यानंतर मनोहर सारखी आणखी इतर अस्तित्वेही भेटत गेली. कधीकाळी हे मुलीला सांगितलं तर म्हणते मी वास्तव आणि कल्पना याची सरमिसळ करतोय.
आता तुमच्यासारख्या लोकांना "ते कुणी" दिसत नाहीत त्याला मी काय करू!
माधवी कुंटे

सत्तर पुस्तके प्रसिद्ध. कथा, कादंबऱ्या, ललित लेखसंग्रह, तत्वज्ञान, कविता, सकारात्मक जीवनदृष्टी वरील अनेक लेखसंग्रह, स्त्रीविषयक लेखसंग्रह,सुधृढ मानसिकतेसाठी हा मानसशास्त्रविषयक लेखसंग्रह, हिंसाचार ते दहशतवाद हे मुलाखती, शब्दांकन, लेखन, व संपादन केलेले पुस्तक, सागरी झेप हे शब्दांकन केलेले पुस्तक, निसर्गायन हा कवितासंग्रह, अनुवादित पुस्तके, बालवाङमयाची अनेक पुस्तके, असे विविधांगी लेखन. प्रियंवदा मासिकाचे आठ वर्षे सहसंपादन, चारचौघी मासिकाची काही वर्षे कार्यकारी संपादिका नंतर सल्लागार संपादिका, लॉलीपॉप, लाडोबा, ई. बालामासिकांचे काही वर्षे सहसम्पादन, अक्षरभारत या साप्ताहिकात मुलें व महिलांच्या विभागाचे अडीच वर्षे संपादन, जिची तिची कथा या कथाक्लबच्या लेखिकांच्या कथासंग्रहाचे संपादन,मराठी विश्वकोशाच्या कन्याकोश या अंधासाठी काढलेल्या सी. डी. स्वरूपातील कोशाची समन्वयक व नोंद लेखक, लेखनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरस्कारांसाहित अनेक पुरस्कार.
bottom of page