top of page

 

र स्ते  न वे जु ने  

 

गौतम पंगू  

यंदाच्या ४ जुलैच्या लाँग वीकेंडची गोष्ट. अमेरिकेच्या उत्तर-पूर्व सीमेवरच्या व्हरमॉंट या राज्यात आम्ही फिरायला गेलो होतो. नेहमीच्या जागांना असलेली लॉंग वीकेंडची गर्दी टाळण्यासाठी व्हरमॉंटचा काहीसा आतला, दुर्गम पण अतिशय निसर्गरम्य भाग निवडला होता. दोन्ही बाजूला हिरवेजर्द डोंगर, त्यांमधून वाहणारा विशाल 'लेक विलोबी' आणि त्याच्या काठाला वसलेलं एक छोटंसं देखणं गाव. गावात पर्यटकांची मोजकीच गर्दी, जवळचं ‘चेन रेस्टॉरंट’ किंवा ग्रोसरी स्टोअर किमान अर्ध्या तासावर. सेलफोनला सिग्नलही जेमतेमच. ही शांतता, बाहेरच्या जगापासून काहीसं तुटून असणं आवडत होतं. सुट्टीतल्या एका दिवशी सहकुटुंब हाईक करायला निघालो. ट्रेलच्या पायथ्याशी गाडी पार्क केली, अंगाला सनस्क्रीन चोपडलं, किडे चावू नयेत म्हणून ‘बग स्प्रे’ मारला, बरोबर पाण्याच्या बाटल्या आणि स्नॅक्स घेतले आणि ट्रेलकडं निघालो, इतक्यात मागून कुणीतरी म्हणालं,” इतक्या सुंदर ठिकाणाहून परत घरी जायला तुम्हांला त्रास होईल ना?” चमकून मागं पाहिलं तर एक माणूस आमच्याशीच बोलत होता. 

 

“घरी? म्हणजे कुठं?” मी क्षणभर गोंधळलो.

 

“न्यू जर्सी होऊन आलात ना तुम्ही? मग इथून परत न्यू जर्सीला जायला अवघड जाईल ना?” आमच्या गाडीवरच्या न्यू जर्सीच्या लायसन्स प्लेटकडं बोट दाखवत तो म्हणाला.

 

“हो, खरंय तुझं!” आम्ही म्हणालो, आणि समोर खुणावणारा माउंट पिसगा चढायला लागलो. पण त्या माणसाचा प्रश्न माझ्या डोक्यातून जात नव्हता.

 

आपण एखाद्या जागेला ‘घर’ कशावरून समजायला लागतो? आपण जिथं जन्मलो, वाढलो ती जागा सोडून द्या, पण नंतर जगण्याच्या प्रवासात जिथं जिथं पथारी पसरायचे योग येतात, त्यातल्या किती जागा ‘घर’ म्हणवू शकतात? एखाद्या जागी आपण रहातो, नोकरी करतो, आपल्याला त्या पत्त्यावर पत्रं येतात, ड्रायविंग लायसन्सवर तो पत्ता असतो, लायसन्स प्लेटवर त्या राज्याचं नाव असतं म्हणून ते लगेच घर होतं का? की यापलीकडं जाऊन ते ठिकाण आपल्याला तिथं रुजण्यासाठी, वसण्यासाठी साद घालतं आणि आपलंसं करून घेतं तेव्हाच ते घर वाटू लागतं? आणि मग अशा ठिकाणी राहून जमा केलेल्या आठवणी जरी ती जागा सोडून जावं लागलं तरी पुढं आयुष्यभर आपल्या मनाशी ताज्या राहतात?

 

व्हरमॉंटला भेटलेला माणूस लायसन्स प्लेटकडं बघून न्यू जर्सीला आमचं घर समजला होता. या हिशेबानं अमेरिकेत आल्यापासून चार राज्यं बदलली, म्हणजे चार घरं झाली असं म्हटलं पाहिजे. पत्ते तर जवळजवळ पंधरासोळावेळा बदलले. पण यातल्या सगळ्याच जागा ‘घर’ नाही झाल्या. यांपैकी काही ठिकाणांची अगदी पहिल्या भेटीतच खूणगाठ जुळली, काही ठिकाणं हळूहळू मनात मुरत गेली तर काही ठिकाणांची अगदी वर्षभर राहूनही मनापासून ओळख झाली असं वाटलंच नाही, त्या जागा शेवटपर्यंत उपऱ्याच राहिल्या. 

 

‘अप इन द एअर’ या चित्रपटातला एक प्रसंग मला फार आवडतो. त्यातला रायन बिंगहॅम हा नायक नोकरीच्या निमित्तानं सारखा विमानप्रवास करत असतो. त्याच्या कुटुंबाला भेटायला तो कित्येक वर्षांत घरी गेलेला नसतो. भाड्यानं घेतलेल्या आणि अगदी कमीत कमी सामान असलेल्या अपार्टमेंटमध्ये महिन्यातून मोजून एखादा दिवस तो पायधूळ झाडत असतो. एका फ्लाईटमध्ये असताना एक कोटी मैल विमानप्रवास पूर्ण केला म्हणून एअरलाईन्सचा स्टाफ विमानातच त्याचा छोटासा सत्कार करतो, तेव्हा पायलट त्याला विचारतो “ तू मूळचा कुठला?”. रायन आजूबाजूला बघत म्हणतो,” मी इथलाच!”  स्वतःच्या घरापेक्षा त्याची सूटकेस, ती विमानं, विमानतळं आणि विमानतळावरची हॉटेल्स ही त्याला जास्त आपलीशी वाटत असतात. तेच त्याचं खरं जग असतं आणि तिथंच तो मनापासून रमलेला असतो! हे असे ऋणानुबंध नक्की कोणत्या जागांशी, कधी आणि कसे जुळतील, हे कुणी सांगावं? 

89a6ee4e-289a-4bf2-a05b-058b76f70d6a.jpg

 

आणि मग बरेचदा आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं की एक निर्णय आपल्यासमोर उभा राहतो:  हे घट्ट जमलेले ऋणानुबंध जोपासत आहे तिथंच रहायचं की सगळा बाडबिस्तरा गुंडाळून, पाळंमुळं उखडून एका नव्या घराच्या शोधात निघायचं?  सुरुवातीला ज्या व्हरमॉंटमधल्या गावाचा उल्लेख केला तिथं बॉब आणि बार्बरा या गप्पिष्ट जोडप्याच्या छोट्याशा टुमदार कॉटेजमध्ये राहिलो होतो. निवृत्तीनंतर बोस्टनमधलं धकाधकीचं जीवन सोडून शांततेच्या शोधात ते दोघं तिथं रहायला आले होते. एका संध्याकाळी त्यांना काहीतरी विचारायला गेलो तेव्हा ते दोघं हिरवळीवर खुर्च्या टाकून निवांत बसले होते. त्यांनी मलाही बसवून घेतलं आणि गप्पा मारायला सुरुवात केली. बोलताबोलता रॉबर्ट फ्रॉस्ट या प्रसिद्ध अमेरिकन कवीचा विषय निघाला. आयुष्याची जवळजवळ चाळीस वर्षं व्हरमॉंटमध्ये घालवलेल्या या कवीबद्दल बार्बरा विशेष आपुलकीनं बोलत होती.

 

व्यवसायानं शेतकरी असलेल्या रॉबर्ट फ्रॉस्टच्या अनेक कवितांना व्हरमॉंटच्या हवामानाची, तिथं वाढणाऱ्या खास वृक्षसंपदेची आणि डोंगराळ भूप्रदेशाची पार्श्वभूमी आहे.  त्याची बरीचशी रुपकं आणि प्रतिमाही निसर्गाशी संबंधित असतात. बॉब आणि बार्बराच्या घरातल्या लायब्ररीमध्ये फ्रॉस्टच्या कवितांचं एक पुस्तक होतं. बार्बरा लगेच ते घेऊन आली. त्या पुस्तकात फ्रॉस्टची ‘ The Road Not Taken’ नावाची प्रसिद्ध कविता होती. कित्येक वर्षांपूर्वी शाळेत असताना वाचलेली ही कविता त्या संध्याकाळी पुन्हा वाचली. त्यातल्या कवीला जंगलात चालताना समोर दोन वेगवेगळे रस्ते फुटलेले दिसतात. त्यांपैकी जो रुळलेला, मळलेला रस्ता असतो त्यावर पुन्हा कधीतरी चालू असं म्हणून तो दुसरा, नवीन, फारशा पाऊलखुणा न उमटलेला रस्ता निवडतो आणि त्यावर चालायला सुरुवात करतो, पण पुढं त्या रस्त्याला अजून रस्ते फुटत जातात आणि त्याला लक्षात येतं की आता परत पहिल्या रस्त्यावर येणं त्याला जमणार नाही. या कवितेचं शेवटचं कडवं माझ्या विशेष आवडीचं आहे: 

 

I shall be telling this with a sigh

Somewhere ages and ages hence:

Two roads diverged in a wood, and I

I took the one less traveled by,

And that has made all the difference.

 

अमेरिकन साहित्यात अतिशय गाजलेल्या या छोट्याशा कवितेचा अर्थ वरवर वाटतो तितका साधा नाही. पण यात अधोरेखित होणारी न चोखाळलेली वाट चालून बघायची मानवी प्रवृत्ती मात्र आदिम आहे. कधी हा निर्णय स्वतःहून  घेतला जातो, कधी परिस्थिती हा निर्णय घ्यायला भाग पाडते. यामागची कारणं शैक्षणिक, कौटुंबिक, आर्थिक, व्यावहारिक अशी काहीही असू शकतात, पण यामागं कुठं ना कुठंतरी असते ती माणसाची चाकोरी सोडायची तळमळ, न पाहिलेल्या विश्वाचे अनुभव घ्यायचं कुतूहल आणि क्षितिजं विस्तारायची जिद्द! 

 

अमेरिकेत किंवा एकूणच परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी येण्यात सध्या तसं काहीही नावीन्य उरलेलं नाही. आमच्या पिढीला अमेरिकेत येऊनही आता जवळजवळ वीस वर्षं होत आली. वीस वर्षांपूर्वीही गोष्टी फार काही अवघड होत्या असं म्हणता येणार नाही.  पण मला थक्क करतात त्या पन्नाससाठ वर्षांपूर्वी अमेरिकेत आलेल्या सुशिक्षित भारतीयांच्या पहिल्या पिढीच्या गोष्टी!

 

कसलंही आर्थिक पाठबळ नाही; इथल्या संस्कृतीचा, समाजाचा आणि राहणीमानाचा परिचय नाही; इथं काही ‘सपोर्ट सिस्टीम’ नाही, असं असताना हे लोक इथं आले, असंख्य अडीअडचणींना तोंड देत राहिले, इथल्या वातावरणाशी जुळवून घेताना स्वतःच्या अनेक स्तरांवरच्या अस्तित्वाला जाणता-अजाणता नवीन पैलू पाडत गेले, बऱ्यावाईट गोष्टींसकट या देशाला आपलं मानून हळूहळू पाळंमुळं रोवत गेले आणि आमच्यासारख्या पुढच्या पिढयांना अशा स्थलांतराचा मार्ग सोपा करून दिला.  कित्येक शतकांपूर्वी एका अगस्त्य ऋषींनी दक्षिणेला प्रवास केला होता आणि त्यांच्या मागून एका नवीन संस्कृतीची सुरुवात झाली होती. तसा हा पश्चिमेचा प्रवास करणाऱ्या असंख्य अज्ञात अगस्त्यांचं आमची स्थलांतरित पिढी फार मोठं देणं लागते. 

 

आणि म्हणूनच आमचा वैयक्तिक प्रवास अगदीच सामान्य असला तरी काहीवेळा हे सगळे संदर्भ डोळ्यांसमोर ठेवून मागं  पाहिलं की कुठंतरी नवल वाटून जातं आणि हे सगळं कसं काय झालं याचा अचंबा वाटतो. अशावेळी मला झुंपा लाहिरीच्या एका गोष्टीतलं वाक्य आठवतं. आपल्या भारत-इंग्लंड-अमेरिका अशा वाटचालीबद्दल बोलताना शेवटी या गोष्टीचा प्रातिनिधिक नायक म्हणतो: 

 

"I know that my achievement is quite ordinary. I am not the only man to seek his fortune far from home, and certainly I am not the first.  Still, there are times I am bewildered by each mile I have traveled, each meal I have eaten, each person I have known, each room in which I have slept. As ordinary as it all appears, there are times when it is beyond my imagination"

 

आपला देश सोडून परदेशात वसायचा हा अनुभव वैयक्तिक ओळखीचा असल्यानं थोडा अधिक जवळचा वाटत असला, तरी वास्तवात ‘नव्यानं रुजण्या’ चे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रवास माणूस करत असतो. यातल्या प्रत्येक प्रवासाच्या प्रेरणा वेगळ्या, परिमाणं वेगळी आणि आयाम वेगळे. प्रत्येक प्रवासाच्या यशापयशाच्या व्याख्या वेगळ्या. प्रवासात स्वतःमध्ये कराव्या लागणाऱ्या बेरजावाजाबाक्यांचं गणित निराळं आणि मिळणाऱ्या कडूगोड अनुभवांची संगतही वेगवेगळी… पण शेवटी असे हे प्रवासच आपली आपल्याला नव्यानं ओळख घडवून आणतात आणि आपल्या आयुष्याला एक वेगळी मिती प्राप्त करून देऊन आयुष्य समृद्ध करून जातात! 

गौतम पंगू  

GP_edited.jpg

गौतम पंगू हा रसायन अभियांत्रिकी मध्ये डॉक्टरेट पदवीधारक असून तो सध्या अमेरिकेत औषधनिर्माण व्यवसायात संशोधन करतो. मराठी/ इंग्रजी लेखन हा त्याचा छंद आहे आणि इमिग्रंट लोकांच्या आयुष्याचे विविध पैलू त्याला त्याच्या लेखनातून मांडायला आवडतात. त्याचे लेख/कथा साप्ताहिक सकाळ, लोकमत, अंतर्नाद, पुरुष उवाच, कालनिर्णय, ऐसी अक्षरे, बृहन्महाराष्ट्र वृत्त इ. नियतकालिकांतून प्रकाशित झालेले आहेत. त्याच्या ‘बदल’ या कथेला २०१० साली ‘साप्ताहिक सकाळ’ ने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता. ‘Shank’s’ आणि DNA या अमेरिकेत निर्मित झालेल्या मराठी चित्रपटांचं त्यानं लेखन केलं आहे.

bottom of page