top of page

सारा सर्ला कार
अनिल परांजपे
चित्र : सियोना बेंजामिन*
तिला मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. अर्थात हायफातल्या इंटेलच्या कॅफेटेरियात अन्नाच्या मांडणीपलिकडे पांढरे लॅबकोट्स घालून, डोक्याला शेफच्या जाळ्या गुंडाळून, कुणाला काय हवं नको ते पाहणाऱ्या त्या अन्नपहारेकऱ्यांकडे लक्ष जाण्याचं कधी कारणही उद्भवलं नव्हतं म्हणा. दरवेळी लंचला कुणी ना कुणीतरी बरोबर असायचंच. त्यांच्याशी बोलता बोलता प्लेटमधे आपण काय वाढून घेतोय याकडेही माझं कित्येकदा लक्ष नसायचं. तिथे त्या अन्नापलिकडचे दाते (म्हणजे अन्नदाते या अर्थानं. हे कोणी खानावळवाले दाते नव्हेत!) कोण पाहणार?
त्यादिवशी मात्र जेवणाची वेळ संपता संपता कॅफेटेरियात पोचलो. शेफिंग डिशेस् मधे डावांचा खडखडाट ऐकू यायची वेळ आलेली होती. आत पडलेली चिकन, मासे, बीफ वगैरेंची तुरळक कलेवरं काही फारशी ऍपेटायझिंग दिसत नव्हती. स्वतःच्याच वाफेत झपाट्यानं मरतुकडी होत असलेली गाजरं, हिरवागार रंग जाऊन शेवाळी टक्कल पडत चालेली ब्रॉकोली, फासळ्या पसरलेला कोबी, काहीच प्लेटमधे घ्यावंसं वाटेना. पानीपत झालं होतं अन्नाचं तिथं. माझ्या पोटातही तसंच काहीसं व्हायची वेळ आली होती. नाही म्हणायला अनेक पीटा ब्रेडचे चतकोर एकरंगी कॅलिडोस्कोपिक वेडेवाकडे पडलेले होते. त्यातलेच काही गपचुप उचलून मी हुमुस कुठं मिळेल ते शोधता शोधता स्वतःलाच चक्क मराठीत रंगात येऊन शिव्या घालत होतो:
“परांजपे, खावा आता कंदमुळं आणि पडा चिप (पुल!). कंदमुळं तरी कुठली बोंबलायला तिच्या आयला. आता गिळा 'पीटा' आणि मरा भुकेनं. पिटा आता छाती ‘पीटा पीटा’ करत.” वगैरे वगैरे.
त्या शेफिंग डिशेसच्या मागून ती एकदम गर्रकन् वळली आणि मला सामोरी आली. डोळे विस्फारलेले. चेहऱ्यावर अतिशय गोंधळलेलं हसू म्हणता येणार नाही असं हसू.
“तुम्ही मराठी आहात?” अस्खलित मराठीत तिनं विचारलं.
मी घशात पीट्याचा दाठरा बसल्यासारखा तिच्याकडे पहात राहिलो. १९९३ च्या त्या सुमाराला त्यावेळी इंटेल इस्रायलमधे मराठीच काय दुसरा कोणीही देशबंधूही नव्हता (किंवा भगिनीसुद्धा). ही खरंच बोलली की काय मराठी? दिसायला तशी आपल्या सारखीच दिसतीये पण इस्रायलमधे अठरापगड देशांतले ज्य़ू आलेत त्यामुळे कळत काही नाही. तिच्या छातीवरची नेमप्लेट पाहिली: ‘सारा सर्लाकार’. नावावरून काहीच कळेना. सव्वापाच फुटांची उंची. काळेपांढरे दिसणारे केस. त्यावर ती शेफची बारीक जाळीची टोपी. अंगात लॅबकोट. चेहरा उन्हातला रापलेला. नाक थोडंसं ज्यूइश लांब पण इतकं थोडंसंच की कदाचित भासही होत असेल लांब नाकाचा. वय असेल पन्नास पंचावनचं. ही खरंच मराठी बोलली? माझ्या घशात पीटा, तिचे डोळे पीट्याएवढे. कोणीच पटकन् बोलेना.
“हो.” मी सरतेशेवटी लॉगजॅम तोडला. “तुम्हाला कसं कळलं?” काय येडबंबूसारखा प्रश्न होता! मी लगेच सावरलो.
“तुम्ही पण मराठी दिसताय!” वा वा, सावरलो म्हणेपर्यंत अजून एक येडबंबूसारखं ऑब्व्हिअस अनुमान माझं.
“हो. तुम्ही कुठून आलात? नाव काय तुमचं? इकडं इस्रायलमधे काय करताय? कधी आलात? किती दिवस आहात?” सारानं सारा गोळा करायला बसल्यासारखं माझं इंटरॉगेशन सुरू केलं.
“मी अनिल परांजपे” मी सुरवात केली.
“पुण्याचे?” च्यायला इथेपण आपण उठून दिसतो?!
“हो. पण हल्ली पोर्टलंडला असतो. अमेरिकेत. शनिवारी आलो. पण तुम्ही कशा इथं? आणि मराठी कशा काय तुम्ही?” मी अजून सारा सर्लाकार नावाचा मराठी संदर्भ लावण्यात सपशेल हरलेलाच होतो.
“मी मूळची सांगली साईडची. खूप वर्षांपूर्वी इथे आले इथली सिटिझनशिप घेऊन. आता हायफातच असते. नुकतीच इथं इंटेलच्या कॅफेटेरियात नोकरीला लागलीये". बाई सांगलीतून निघाली असली तरी सांगली तिच्यातच अजून आहे हे कळत होतं.
“काय सांगता? मी तुमचं आडनाव ‘सर्लाकार’ असं वाचत होतो. ते ‘सर्लाकर’ असं असणारे असं वाटलं पण नाही. टिपिकल मराठी आडनावासारखंच आहे, शेवटी कर जोडणारं, पण कधी ऐकलं नाहीये” माझ्या डोक्यातला प्रकाश मी तिच्यावर पाडला.
“मूळचं ‘सरलष्कर’ आडनाव आमचं. मग इकडं आल्यावर नवा पासपोर्ट काढताना कोणीतरी चुकून पोटफोड्या ष चं पोट फोडून त्याला मारलं आणि आता एवढंच राहिलंय” ती हसून म्हणाली. “हा आमच्या हायफातल्या मराठी लोकांचा विनोद आहे जुना”.
सरलष्कर?! हायफातले मराठी लोक? अरे काय चाललंय काय? कुठं नेऊन ठेवलाय इस्रायल माझा?!
“मराठी लोक? किती आहेत अजून इथं?”
“खूप आहेत. दोनचार बिल्डिंगी भरून आहेत. आम्ही आपापसात अजूनही मराठीच बोलतो जुनी लोकं. आमच्या मुलांना नाही येत. कळतं थोडं थोडं पण येत नाही. आम्ही मात्र जमतो एकत्र. दिवाळी गणपती वगैरे साजरी करतो.” मला अमेरिकेतलं माझं मराठी आयुष्य डोळ्यांसमोर आलं. तसंच दिसतंय इथंपण. साराची ती मूळची मराठी असूनही आता मराठी नसलेली पोरं समोर नसली तरी मला नीट कळून गेली. अमेरिकेत जन्मलेल्यांना एबीसीडी (अमेरिकन बॉर्न कन्फ्यूज्ड देसी) म्हणायचो तशी ही आयबीसीडी पिढी.
“भारतात कधी गेला होतात परत भेटायला?” मी विचारलं. का कोण जाणे पण कुठलीतरी खपली काढतोय हे जाणवूनही.
“नाही.” ती मलूलसं हसली. “फार महाग पडतं जायला. आधी कुठंतरी युरोपला उलटं जा आणि मग तिथून मुंबईला. खूप वाटतं जावंसं पण परवडायला पाहिजे ना?” तिच्या पेशावरून मला अंदाज यायला पाहिजे होता. मला वाईट वाटलं नकळत तिला दुखवल्याचं.
“ठीक आहे हो. जाल केव्हातरी. पण इथंतर खुष आहात ना? छान आहे हा देश. मला फार आवडतो. हायफातर माझं आवडतं शहर आहे” मी मनापासून फुंकर मारली. खरंही होतं सगळं म्हणा.
“ते आहेच. पण खूप आठवण येते. अजूनही सगळं आठवतं. कसं असेल सगळं आता असं वाटत राहतं. तसा महाराष्ट्रात काही प्रश्न नव्हता आम्हाला. ज्यू म्हणून कुणी काही वाईट वागवलं असं कधी मला आठवत नाही. आम्हीपण दिवाळी, गणपती सगळं साजरं करायचो. इथली काही मराठी लोकं अजून गणपतीही बसवतात. आता तसे आम्ही इथलेच. हाच देश आमचा. पण म्हणून ‘तो देश आमचा नाही’ असं अजून म्हणवत नाही. निदान मलातरी नाही. इथे तसे सुखात आहोत खाऊन पिऊन. यजमान गेले माझे गेल्या वर्षी (तिनं चक्क यजमान हा शब्द वापरला!) मुलगा आयडीएफमधे असतो” भरभरून बोलली ती. आयडीएफ म्हणजे इस्रायल डिफेन्स फोर्स. इस्रायली मिल्ट्री. त्या भरभरून बोलण्यात थोडं रितेपणही जाणवत होतं.
“अरे वा, छान आहे की मग. इथलाच तो आता आणि तुम्ही सुद्धा” मी उगाचच सांत्वन केल्यासारखं म्हणालो.
“हो. आता इथलेच. पण काही वेळा फार आठवण येते. अजूनही इथे सगळी सत्ता गोऱ्या यूरोपियन ज्यूजच्या हातात आहे. थोडं उपरं अजूनही वाटतं आम्हा जुन्या लोकांना” ज्यू तेतुका मेळवावा हे इस्रायलचं औपचारिक धोरण सगळ्या इस्रायल्यांच्या पचनी पडायचंय हे मला तेव्हा पहिल्यांदा कळलं. पुढे नव्यानं आलेल्या सोवियत ज्यूंकडूनही हे ऐकलं तेव्हा तितकंसं आश्चर्य वाटलं नाही.
“तुम्ही कधी जाता की नाही भारतात?” तिनं अचानक विचारलं.
“हो, म्हणजे काय? दरवर्षीच जातो डिसेंबरला. पण आता मात्र इथून मी आधी पुण्याला जाणारे. आईवडलांना भेटायला. मग तिथूनच परत अमेरिकेला” मी परत एकदा विचार न करता बोलून गेलो. पण खोटं तरी कसं बोलणार? तिच्या चेहऱ्यावर परत एक म्लान हसू येऊन गेलं.
“लकी आहात. घरी कोण कोण? बायको? मुलं?” मी उर्मिलाबद्दल सांगितलं. संस्कृती अजून भविष्यातच होती.
“मुलं झाली की त्यांना निश्चित घेऊन जा. त्यांना सगळं दाखवा. गणपतीत जा नक्की”. मी तिला तसं आश्वासन दिलं. मनापासून पटलं म्हणून.
मीटिंगची वेळ झाली होती. मी इतका वेळ बसून पीटा आणि हुमुस खात होतो. ती ड्यूटीवर असल्यामुळं उभं राहूनच बोलत होती. माझं घड्याळ पाहणं बघून तिलाही एकदम माझं जेवण संपत आल्याचा साक्षात्कार झाला. ती झरझर चालत आत गेली आणि येताना दह्याच्या प्लॅस्टिकच्या डब्यातून लिंबाचं लोणचं घेऊन आली!
“सॉरी, विसरूनच गेले. तुम्ही नुसताच पीटा आणि हुमुस खाताय इतका वेळ. हे घ्या. घरी केलंय मी” गोड लिंबाच्या लोणच्यानंही डोळ्यातनं पाणी आलं थोडंसं.
“आता पुण्याला जाल तेव्हा माझा एक नमस्कार गणपतीला जास्तीचा घाला”, ती अचानक भाबडून म्हणाली. त्या अनपेक्षिततेनं चमकून मला भडभडून आलं. तिला कुठं सांगू की मी कित्येक वर्षांत गणपतीला नमस्कार बिमस्कार काही केला नाहीये म्हणून.
“नक्की घालीन. खुष होईल गणपती एवढ्या लांबून खास इस्रायलहून नमस्कार आलाय म्हणून. पण त्याचे वडील भोळेबिळे असले तरी तो भोळा नाहीये. आशिर्वाद हवा असेल तर एकवीस शेकेलची दक्षिणा द्यावी लागेल”, मी वातावरण हलकं करायला नेहमीसारखा एक आचरट जोक केला. मला वाटलं ती हसेल.
पण ती काही न बोलता परत आत पळत गेली. आली ती हातात एकवीस शेकेल घेऊनच. माझ्यासमोर ते ठेवून मला म्हणाली..
“आता चालेल?” माझं भरलं पोटही कालवलं. मला ते शेकेल घेववेनात. एकवीस शेकेल ही काही फार मोठी रक्कम नव्हती. पण तिची ती भाबडी श्रद्धा योग्यस्थानी पोचवण्याची माझी लायकी नव्हती.
“गंमत केली मी सारा. गणपतीला शेकेल चालणार नाहीत कारण त्याचा काही तिथल्या पुजाऱ्यांना उपयोग नाही. मी तुमच्यासाठी एकवीस रुपये निश्चित ठेवीन” मी म्हणालो. तिच्या गरीबीची मी दया करतोय की काय ही भीती मनात बाळगत बाळगत.
पण ती समजूतदारपणे आश्वासक हसली. त्या एकवीस शेकेल्समधला एक शेकेल उचलत मी म्हणालो..
“हा एक ठेवीन मी. अगदीच माझ्याकडनं आलेत पैसे असं नको गणपतीला वाटायला” ती पुन्हा हसली.
“आता उद्या वेळच्या वेळी या जेवायला; म्हणजे परत असा हुमुसपीटा खायला लागणार नाही” ती डोळे मिचकावत म्हणाली.
“आणि उद्या मी माझ्या मैत्रिणीकडे जाणारे, नाहीतर तुम्हाला घरी बोलावलं असतं. पण पुढच्या वेळी आलात की नक्की या”
कुठली कोण सारा? केवळ मराठी असल्याचा आमचा एक समान धागा, तिनंच बांधला म्हणून अजून टिकून राहिलाय मनात.
पुण्याला पोचलो. खिशातले सगळे उरलेसुरले शेकेल रिकामे करून बॅगेत ठेवले. त्यातला तिचा शेकेल कुठला ते ओळखता आलं नाही म्हणून त्यातलाच एक वेगळा ठेवला तिच्या नावानं. आणि मग बाहेर पडल्यावर दिसेल त्या गणपतीसमोर एकवीस रूपये ठेवून आलो. कधी नव्हे ते बाप्पाला गळ घातली,
“बाप्पा, हे तुमचे एकवीस रुपये. तिचा शेकेल माझ्याकडेच ठेवलाय आठवणीसाठी. हे रूपये साराकडूनच आलेत असं म्हणून गोड मानून घ्या. काय?!”
अनिल परांजपे
*अग्रभागी प्रस्तुत केलेलं चित्र हे प्रसिद्ध चित्रकार सियोना बेंजामिन यांच्या कुंचल्यातून साकारलेलं 'Finding Home' मालिकेतील एक अतिशय सुंदर चित्र आहे. यहुदी संस्कृतीमधील मेनोरा, किप्पा आणि हिंदू संस्कृतीतील आरतीची थाळी आणि त्यायोगे दिसणारा यहुदी-हिंदू संस्कृतीचा सुंदर मेळ इथं अभिप्रेत आहे. अनिलच्या लेखामधल्या 'सारा सर्लाकरचं' आयुष्यही असंच यहुदी आणि हिंदू संस्कृतीचा मध्य बिंदू आहे. साराची आपली मराठी संस्कृती जपण्याची धडपड आणि त्याचवेळी इस्राएलमध्ये असल्यामुळे तिथल्या यहुदी प्रथेत मिसळण्याची आस याचं हे चित्र प्रतीक वाटल्यानं इथं डकवलं आहे. अर्थात माननीय सियोना बेंजामिन यांच्या परवानगीनंच.

जन्म दिल्लीचा तरी पुण्याच्या सदाशिव पेठेच्या पाण्यावर वाढलो. शैक्षणिक प्रवास पेरूगेट भावेस्कूल, फर्ग्युसन, वाडिया, सारख्या अस्सल मराठी संस्थांपासून टेक्सस् (ऑस्टिन), व्हार्टन अशा अमराठी वातावरणापर्यंत झाला. कार्यक्षेत्र पोर्टलंडच्या इंटेल पासून जे चालू झालंय ते सध्या भारतात दोन व्हेंचर कॅपिटल फंडांचा पार्टनर, लायटिंगच्या क्षेत्रातली एक स्वतःची कंपनी आणि काही कंपन्यांच्या संचालक बोर्डांवर सदस्यत्व इथे येऊन स्थिरावले आहे. लहानपणापासून भाषा, लेखन, आणि वाचनाची आवड! कविता, निबंध, प्रवासवर्णनं हे माझे आवडीचे विषय पण कथा (त्यातही जास्त शास्त्रीय कथा) लिहिण्याचा मानस आहे. मुलीच्या जन्मापासून मी तिला माझ्या आयुष्याचं केंद्र मानलं. तिला माझा कंटाळा येईल इतका वेळ दिल्यावर उरलेल्या वेळात लेखन, वाचन जोपासलं याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे.
bottom of page